शिन्जियांग, किंघाई, गान्सू, युनान हे चीनमधील मुस्लिम बहुल प्रांत आहेत. या पैकी शिन्जियांग प्रांत सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्येचा प्रदेश आहे. या भागातील मुस्लीम ‘उइघर/उइगर’ म्हणून ओळखले जातात. चीनकडून राबविण्यात येणाऱ्या मुस्लिमविरोधी धोरणांचा अंमल या भागात तीव्र आहे. 

काश्गर  बाहेरील वाळवंटात शिन्जियांगच्या सुदूर-पश्चिम भागात एक प्राचीन बौद्ध स्तूप आहे. या स्तूपाचा आकार शंकूसारखा असल्यामुळे या भागात या स्तुपाला मोएर/Mo’er म्हणून ओळखले जाते, मोएर या शब्दाचा अर्थ मूळ उइघर लोकांच्या भाषेत ‘चिमणी’ असा आहे. हा स्तूप आणि त्यापुढील मंदिर हे सुमारे १,७०० वर्षांपूर्वी बांधले गेले असे मानले जाते. कालांतराने या दोन्ही वास्तू दुर्लक्षित राहिल्या. चिनी पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी २०१९ साली येथे उत्खनन सुरू केले. या उत्खननात त्यांना दगडी हत्यारे, तांब्याची नाणी आणि बुद्ध मूर्तीचे अवशेष सापडले. यावरूनच शिन्जियांग हा प्रांत प्राचीन काळापासून चीनचा भाग असल्याचे स्पष्ट पुरावे सापडल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?

इतकेच नाही तर या मोएर मंदिरात सापडलेल्या कलाकृती आणि या ठिकाणापासून हजारो मैल दूर असलेल्या चीनचा वांशिक गट हान यांच्या कलाकृतींत साम्य असल्यचे निष्कर्ष त्यांनी मांडले. मंदिराचे काही भाग ‘हान बौद्ध’ शैलीत बांधले गेले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या मंदिराला ह्युएन-त्सांग नावाच्या प्रसिद्ध चीनी बौद्ध भिक्षूने ७ व्या शतकात भेट दिली होती असेही सांगण्यात येत आहे. ह्युएन-त्सांग हे चीन मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी ओळखले जातात. हे सर्व दावे प्रथमदर्शनी शैक्षणिक वाटले तरी चीनचे सरकार शिन्जियांगवरील आपल्या क्रूर शासनाचे समर्थन करण्यासाठी त्यांचा वापर करत आहे. २०१८ -१९ साली चीन सरकारने  सुरक्षा मोहिमेच्या अंतर्गत एक दशलक्ष उइघर आणि शिन्जियांगमधील इतर मुस्लिम रहिवास्यांना शिबिरात डांबले. त्यांना हान चीनी संस्कृती जबरदस्तीने आत्मसात करायला भाग पाडले. त्यामुळेच टीकाकार चीनवर सांस्कृतिक नरसंहाराचा आरोप करतात.

गेल्या महिन्यात चीनने काश्गर येथे एका परिषदेचे आयोजन केले होते, ज्यात मोएर मंदिर आणि इतर स्थळांवर झालेल्या संशोधनावर भाष्य करण्यात आले. या परिषदेत शिन्जियांगची संस्कृती आणि चिनी संस्कृतीमध्ये कोणताही फरक नाही, असे राज्याचे वांशिक व्यवहार आयोगाचे प्रमुख पॅन यू यांनी म्हटले. जे लोक या प्रदेशातील चीनच्या धोरणांवर टीका करतात ते त्यांचे ‘इतिहासाचे अज्ञान’ प्रकट करतात आणि ‘निराधार तथ्य’ मांडतात असेही ते म्हणाले.

अधिक वाचा: विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?

जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीचे जेम्स मिलवर्ड म्हणतात की, चीनच्या प्राचीन राजवंशांचा सध्याच्या शिन्जियांगमध्ये ८  व्या शतकापासून ते १८ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत फारसा प्रभाव नव्हता. १७५९ साली चीनच्या अंतिम राजघराण्याने, म्हणजेच किंगने हा प्रदेश जिंकला आणि १९४९ साली सत्तेवर आल्यावर कम्युनिस्ट पक्षाला तोच वारसा मिळाला. मोएर मंदिरासारखी ठिकाणे आकर्षक आहेत, परंतु चीनच्या दाव्यांना ते बळकटी देत नाही. या मंदिराच्या परिसरातील पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे चीनला मध्य आशिया आणि युरोपशी जोडणाऱ्या प्राचीन रेशीम व्यापारी मार्गाविषयी आणि त्याच्या जागतिक प्रभावाविषयी माहिती मिळते. या मार्गाला व्यापारी महत्त्व होते. बौद्धधर्माचा प्रसार याच मार्गावरून झाला. उइगरांचे अनेक पूर्वज बौद्ध होते. एकूणच ते राजकीयदृष्ट्या चीनी संस्कृतीचे भाग नव्हते. शेवटी, बौद्ध धर्म मूळचा भारतातून आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ व्या शतकापासून बहुतेक उइगरांनी इस्लामचे पालन केले आहे. चीन तेच खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अलिकडच्या वर्षांत त्यांनी शिन्जियांग मधील शेकडो मशिदी नष्ट केल्या. काश्गरमधील संग्रहालयात इस्लामचा क्वचितच संदर्भ आढळतो. सध्या या ठिकाणच्या अनेक वास्तूंना चीनी हान संस्कृतीच्या स्थापत्य शैलीत परिवर्तीत करण्यात आलेले आहे. उतार असलेल्या छतावरील फरशा आणि लाल दरवाजे असलेल्या इमारती असे काहीसे. एका पत्रकाराने एका कामगाराला याबद्दल विचारले असता हीच शैली योग्य आहे, असे एका हान बांधकाम कामगाराने सांगितले. बौद्ध संस्कृती हा हान संस्कृतीचा भाग आहे, असा दावा त्यांनी केला आणि शिन्जियांग हा हजारो वर्षांपासून चीनचा भाग आहे.