IPL 2024, Punjab Kings vs Sunrisers Hyderabad: पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुल्लानपूर येथे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत ९ बाद १८२ धावा केल्या. पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सामन्याच्या सुरूवातीला हा निर्णय अगदी योग्य ठरला. पंजाबने शानदार सुरूवात करत हैदराबादला एकामागून एक धक्के दिले. प्रत्येक विकेट कमाल होती पण राहुल त्रिपाठीच्या विकेटमागे सॅम करनच्या चालाखीची वाहवा केली जात आहे.

– quiz

पंजाब किंग्जकडून वेगवान गोलंदाज हर्षल पटेल सनरायझर्स हैदराबादच्या डावातील १०वे षटक टाकत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुल त्रिपाठी स्ट्राइकवर होता. हर्षलने त्रिपाठीला बाउन्सर टाकला. राहुलला त्या चेंडूवर अप्पर कट मारायचा होता. पण तो चेंडूला वेळ देऊ शकला नाही आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट कीपरच्या हातात गेला. पण गोलंदाजाने कोणतंच अपील केलं नाही. इतर खेळाडूंनीही फारसा रस दाखवला नाही. पण सॅम करनने मात्र इथे मोठी भूमिका बजावली.

सॅम करनने कर्णधार शिखर धवनला त्रिपाठी बाद असल्याचे सांगत रिव्ह्यू घेण्यास सांगितले. गब्बरनेही तेच केले. करनच्या सांगण्यावरून त्याने डीआरएस घेतला. त्यानंतर चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन जितेश शर्माकडे गेल्याचे मोठ्या पडद्यावर स्पष्टपणे दिसले. अशातच करनच्या हुशारीमुळे पंजाबला राहुलची विकेट मिळाली. राहुल त्रिपाठी १४ चेंडूत केवळ ११ धावा करून बाद झाला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या डावाची सुरुवात फारशी चांगली करता आली नाही. संघाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज एकामागून एक माघारी परतले. मात्र यानंतर युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीच्या ३७ चेंडूत ६४ धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर नऊ विकेट्सवर १८२ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. पंजाब किंग्जकडून डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने २९ धावांत चार विकेट घेतले. हर्षल पटेल आणि सॅम करन यांनी प्रत्येकी दोन तर कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली, तरीही सनरायझर्स हैदराबादने स्पर्धात्मक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.