Ireland’s first historic win in Test cricket : आयर्लंडसाठी एक मार्चचा दिवस त्यांच्या क्रिकेट इतिहासात अतिशय संस्मरणीय ठरला. आयरिश संघाने अबुधाबी येथील मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध एक सामन्याची कसोटी मालिका ६ गडी राखून जिंकली, ज्यामध्ये कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने संघाला लक्ष्याचा पाठलाग करण्यात आणि विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आयर्लंडचा कसोटी क्रिकेटमधला हा पहिलाच विजय आहे. याआधी संघ ७ कसोटी सामने खेळला आहे आणि त्या सर्व सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ५४.५ षटकांत इब्राहिम झाद्रानच्या अर्धशतकाच्या जोरावर १५५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयरिश संघाने ८३.४ षटकांत स्टर्लिगच्या २६३ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ७५.४ षटकांत २१८ धावा केल्या होत्या. यानंतर आयरिश संघाने ३१.३ षटकांत ४ गडी गमावून १११ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला.

अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिश संघाने एकवेळ १३ धावा होईपर्यंत ३ विकेट गमावल्या होत्या. इथून कर्णधार अँड्र्यू बालबिर्नीने एका बाजूने डाव सांभाळत प्रथम पॉल स्टर्लिंगसोबत चौथ्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर लॉर्कन टकरसोबत पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची मॅचविनिंग भागीदारी करत संघाला ६ विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवून परतला. आयरिश कर्णधाराने या डावात ९६ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. आयर्लंड संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नाही, म्हणूनच बहुतेक प्रसंगी तो फक्त एका सामन्यांची कसोटी मालिका खेळू शकतो, आतापर्यंत संघाने एकदाच श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे.

गोलंदाजीत मार्क अडायरची कमाल –

या सामन्यात आयर्लंड संघाच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली, ज्यात वेगवान गोलंदाज मार्क अडायरने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर दुसऱ्या डावातही तो ३ विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे दोन्ही डावातील फलंदाजांची अत्यंत खराब कामगिरी. या सामन्यात अफगाणिस्तान संघाला पहिल्या डावात केवळ १५५ धावा करता आल्या, तर दुसऱ्या डावात २१८ धावांपर्यंत मजल मारता आली.