सिडनी : सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेचा (नाबाद ९२) तडाखा आणि मिचेल सँटनरची प्रभावी फिरकी गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘अव्वल १२’ फेरीत सलामीलाच गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. न्यूझीलंडने हा सामना ८९ धावांनी जिंकला.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २०० धावा केल्या. कॉन्वेने ५८ चेंडूंत नाबाद ९२ धावांची खेळी करताना सात चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याचा सलामीचा साथीदार फिन ॲलननेही १६ चेंडूंत ४२ धावांची झंझावती खेळी केली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव १७.१ षटकांत १११ धावांत आटोपला. टीम साऊदी (६ धावांत ३ बळी) आणि सँटनर (३१ धावांत ३ बळी) यांच्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही.
न्यूझीलंडने अनुभवी मार्टिन गप्टिलला संघाबाहेर ठेवत ॲलनला संधी दिली. ॲलनने या संधीचे सोने करताना १६ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने ४२ धावा करून न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याचसह कॉन्वेने सलामीला येऊन पूर्ण २० षटके खेळपट्टीवर टिकणे न्यूझीलंडसाठी निर्णायक ठरले. कॉन्वेला कर्णधार केन विल्यम्सन (२३ चेंडूंत २३) आणि जेम्स नीशम (१३ चेंडूंत नाबाद २६) यांची चांगली साथ लाभली.

आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच गडी गमावले. ग्लेन मॅक्सवेल (२८) आणि पॅट कमिन्स (२१) यांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज २० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. त्यातच ग्लेन फिलिप्सने हवेत झेपावत घेतलेला मार्कस स्टोइनिसचा झेल लक्षवेधी ठरला.

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ३ बाद २०० (डेव्हॉन कॉन्वे नाबाद ९२, फिन ॲलन ४२; जोश हेझलवूड २/४१) विजयी
वि. ऑस्ट्रेलिया : १७.१ षटकांत सर्वबाद १११ (ग्लेन मॅक्सवेल २८; टीम साऊदी ३/६, मिचेल सँटनर ३/३१)
१ या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कुठल्याही क्रिकेट प्रकारात मायदेशात २०११पासून न्यूझीलंडकडून पहिला पराभव पत्करला.