औरंगाबादमधील तेजस शिरसेने महाराष्ट्राच्या मुकुटावर जागतिक तुरा खोवला आहे. बुधवारी झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजर स्तरीय स्पर्धा मोटोनेट जीपी मालिकेत त्याने सुवर्णपदक जिंकून पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. दि प्रिंटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

२०१७ मध्ये सिद्धांत थिंगल्यने १३.४८ सेकंदांचा विक्रम केला होता, त्याचा हा रेकॉर्ड आता तेजस शिरसेने मोडून १३.४१ सेकंदाचा नवा विक्रम केला आहे. तेजसने ९ मे रोजी नेदरलँड्समध्ये १३.५६ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती.

शिरसेने कोणतेही आंतरराष्ट्रीय पदक जिंकलेले नाही. परंतु पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत तो अव्वल भारतीय आहे. त्याने गेल्या वर्षी फेडरेशन कप, राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिप आणि नॅशनल ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. परदेशात प्रशिक्षण आणि स्पर्धा करत असल्याने त्याने यंदाच्या फेडरेशन कपमध्ये भाग घेतला नाही.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीसाठी स्वयंचलित पात्रता गुण १३.२७ सेकंद आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत ४० खेळाडू भाग घेतील. यातील निम्मे जागतिक क्रमवारीत स्थान मिळवतील.

हेही वाचा >> कोहलीला पर्याय नाहीच -पॉन्टिंग

कोण आहे तेजस शिरसे?

अॅथेलेटिक्स या क्रिडा प्रकारात धावण्यासोबतंच उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी आणि बांबू उडी असे प्रकार असतात. यामध्ये अडथळा शर्यत हा प्रमुख प्रकार शर्यतीमध्ये असतो. तेजस हा सध्या अडथळा शर्यतीतील उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू आहे. तेजस अशोक शिरसे (२१) हा देवगाव रंगारी येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक शिरसे यांचा मुलगा. 

दौलताबाद येथे महाराष्ट्र पब्लिक स्कूलमधे इयत्ता १०वी चे शिक्षण घेताना त्या शाळेतील क्रिडा प्रशिक्षक शासकीय क्रिडा प्रबोधिनीचे प्रथम पदक मिळवलेल्या पूनम राठोड यांनी तेजसमधले धावपटूचे गुण ओळखले. त्यांनी केंद्रशासनाच्या साई क्रिडा प्रबोधिनीकडे त्याला पुढील सरावासाठी जाण्याचा सल्ला दिला. पण तेजसच्या दुर्देवाने साई क्रिडा प्रबोधिनीत त्याला शिकण्यासाठी तेथील शिक्षकांनी महिना ५ हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकाराने खजील झालेल्या तेजस ला पूनम राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रशिक्षणासाठी पाठवले.

या विद्यापीठात सर्व प्रकारच्या खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. विद्यापीठाचे क्रिडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी ही सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याठिकाणचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांनी तेजस मधील गुण ओळखून तेजसला प्रोत्साहित केले. त्याचा सर्व खर्च उचलून तेजस कडून सराव करुन घेताच ११०मीटर्स धावण्याच्या शर्यतीत १४सेकंद ३६ सेकंदात त्याने २०१६मधे दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमधे सुवर्णपदक मिळवले.