Tips and Tricks To Clean Plastic Tiffin Box : अनेक जण ऑफिस आणि शाळेसाठी प्लास्टिकच्या डब्यात अन्नपदार्थ पॅक करून नेतात. इतकेच नाही तर स्वयंपाकघरातही खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी प्लास्टिकचे डबे वापरले जातात. पण, या डब्ब्यांच्या सततच्या वापरामुळे त्यात खाद्यपदार्थांचे डाग पडतात. याचबरोबर दुर्गंधी येऊ लागते. अशावेळी डब्यातील डाग आणि दुर्गंधी घालवणे कठीण होते. अनेकदा डबा स्वच्छ केल्यानंतर आतून स्वच्छ दिसतो, पण त्यातून दुर्गंधी येऊ लागते.

अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला प्लास्टिकचे डबे काही मिनिटांत स्वच्छ करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तेलकट, चिकट आणि दुर्गंधीयुक्त प्लास्टिकचे डबे अगदी नव्यासारखे चमकवू शकता.

प्लास्टिकचे डबे स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त टिप्स

१) बेकिंग सोडा

तुमच्यापैकी अनेक जण स्वयंपाकघरात बेकिंग सोडा वापरतात. याच बेकिंग सोड्याच्या मदतीने तुम्ही प्लास्टिकचा डबा स्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त करू शकता. यासाठी सर्वप्रथम एक लिटर पाणी घ्या, त्यात १-२ चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. आता हे मिश्रण तेलकट प्लास्टिकच्या डब्यात टाका आणि १० मिनिटे असेच राहू द्या, यानंतर क्लिनिंग ब्रशच्या मदतीने घासून स्वच्छ करा.

२) व्हिनेगर

प्लास्टिकचा डबा व्हिनेगर वापरून सहज साफ करता येतो. यासाठी एक ग्लास पाण्यात व्हिनेगर मिसळा आणि ते मिश्रण जेवणाच्या डब्यात टाका, काही वेळ असेच राहू द्या. काही वेळाने टिफिन लिक्विड डिटर्जंटने स्वच्छ करा, यामुळे डबा पूर्णपणे स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त होईल.

3 महिन्यांत दिसेल अभिनेत्रींप्रमाणे एकदम परफेक्ट फिगर; रोज १० मिनिटे करा ऋजुता दिवेकरने सांगितलेला ‘हा’ १ व्यायामप्रकार

३) मीठ आणि लिंबाचा रस

प्लास्टिकच्या डब्यातील डाग आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही मीठ आणि लिंबूदेखील वापरू शकता. यासाठी एक लिटर पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे मीठ घालून चांगले मिसळा. नंतर हे पाणी कोमट करा, आता थोडे थंड झाल्यावर जेवणाचा डबा मिश्रणात भिजवत ठेवा आणि साधारण पाच मिनिटे राहू द्या. यानंतर ब्रशने घासून पाण्याने स्वच्छ करा.

४) कॉफी

प्लास्टिकच्या डब्यातील दुर्गंधी दूर करण्यासाठी कॉफी पावडरचाही वापर करता येतो. यासाठी त्या डब्यात कॉफी पावडर टाकून लिंबाच्या सालीने थोडा वेळ चोळा आणि १५ मिनिटे राहू द्या. यानंतर डबा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे डबा पूर्णपणे दुर्गंधीमुक्त होईल.

५) बोरॅक्स पावडर

बोरॅक्स पावडर कोणत्याही प्लास्टिक, स्टील किंवा ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरली जाऊ शकते. प्लास्टिकचे तेलकट डबे स्वच्छ करण्यासाठी प्रथम एक किंवा दोन कप पाण्यात एक चमचा बोरॅक्स पावडर टाकून चांगली मिसळा. आता या मिश्रणात डबा टाकून ठेवा, तो सुमारे १० मिनिटे राहू द्या. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.