Plant Repotting Tips: बाल्कनीतील झाडांमुळे घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यास मदत होते. म्हणून बहुतेक जण आवडीने गॅलरीत एक तरी झाड ठेवतात. काहींची तर पूर्ण गॅलरी विविध प्रकारच्या झाडांनी भरलेली असते. पण, एकाचवेळी आपण खूप रोपं तर लावतो पण ती काही दिवसांनी सुकतात. त्यांची नीट वाढ होत नाही, काही रोपांना फुलं येण बंद होतं. पण, हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही कोणतंही रोप कुंडीत लावण्यापूर्वी थोडी काळजी घेतली पाहिजे; नाही तर आपल्या अनेक छोट्या-छोट्या चुकांमुळे चांगली रोपं खराब होतील. त्यामुळे रोपं लावताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोप एका लहान कुंडीतून मोठ्या कुंडीत लावणे किंवा जमिनीतून बाहेर काढणे आणि झाडे एका कुंडीत लावणे हे एक कठीण काम आहे. कारण बऱ्याच वेळा वाढलेली रोपं आपण दुसऱ्या ठिकाणी वाढण्यासाठी लावतो तेव्हा ते सुकते. अशावेळी रोपांच्या निरोगी वाढीसाठी काही विशेष प्रकारची काळजी घ्यावी लागते.

री-पॉटिंग करताना ‘या’ चुका टाळा

री-पॉटिंग करताना अनेकदा रोप कुंडीतून बाहेर काढण्यापूर्वी त्याला भरपूर पाणी घालतो, हीच चूक रोपासाठी हानिकारक ठरू शकते. जेव्हाही तुम्ही पुन्हा रोप रि-पॉटिंग कराल तेव्हा एक ते दोन दिवस आधी थोडे-थोडे पाणी घाला, जेणेकरून रोपाच्या मुळाशी ओलावा राहील.

लहान रोप लावण्यासाठी मोठी कुंडी वापरा

लहान रोप लावताना नेहमी मध्यम किंवा मोठ्या आकाराची कुंडी वापरावी, जेणेकरून त्याला सूर्यप्रकाश सहज मिळू शकेल; तर त्यांना वाढतानाही मोठी जागा असेल.

रिपॉट करण्याची योग्य पद्धत

री-पॉटिंग करताना, रोप पिशवीमधून काढण्याआधी त्यावर न्यूट्रिएंट्सची फवारणी करा. नंतर एका कुंडीत तीन-चार छोटे दगड टाका, त्यानंतर नीट पसरवून घेतलेली थोडी माती टाका, आता रोप कुंडीत उभं करा आणि पुन्हा माती टाका. अशाप्रकारे मुळापासून काही लेव्हल वरपर्यंत माती भरा आणि हलक्या हाताने वरून दाबा.

रिपॉटिंग करण्यापूर्वी करा ‘हे’ काम

अनेकदा रोप लावल्यानंतर ते सुकते, पिवळे पडते, त्याची पानं गळू लागतात, वाढ खुंटते, पाणी आणि खत मिळाल्यानंतरही रोप काही नीट वाढत नाही.

आपण ज्या कुंडीतून रोप काढत आहात त्या कुंडीत पाणी देणे थांबवा. अशा स्थितीत माती कुंडीच्या बाजूंपासून दूर जाऊ लागेल. अशाप्रकारे आपण सहजपणे कुंडीतील मातीसह रोप काढून टाकू शकता आणि दुसऱ्या कुंडीत लावू शकता. रोप काढल्यानंतर त्याच्या मुळावरील माती नीट काढून टाका. तसेच रोपाच्या मुळांवर तयार झालेले मातीचे गठ्ठे हाताने थोपवून काढून टाका. यानंतर रोपांची छाटणी करून ते एका मोठ्या कुंडीत अशा प्रकारे ठेवा की, त्याची मुळे सरळ राहतील.

तसेच रोपांमध्ये माती टाकताना त्यात सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत मिसळावे. त्यानंतरच कुंडीत माती भरा. नंतर हलक्या हाताने माती दाबून पाणी घाला. पहिल्या दिवशी थोडे अधिक पाणी घालावे, म्हणजे माती व्यवस्थित होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diy gardening hacks and ideas plant repotting tips avoid these mistakes during plant repotting sjr