– आशीष पाडलेकर, सौरभ करंदीकर

आजची लहान मुले आणि तरुण पिढी एकतर वाचत नाही किंवा चित्रकादंबऱ्या म्हणजेच ग्राफिक नॉव्हेलला पसंती देते. इंग्रजी माध्यमांत असलेली मराठी कुटुंबातील मुले ‘ग्राफिक नॉव्हेल’च्या जगाशी केव्हाच परिचित झाली. आता ती जपानी कॉमिक्स ‘मंगा’लाही कवटाळत आहेत. गेल्या दशकभरपासून मराठी बालसाहित्यामध्ये झालेला सर्वांत मोठा बदल चित्रपुस्तकांद्वारे समोर आला, पण नवा वाचक तयार करण्याची क्षमता त्यात खरेच आहे काय? ग्राफिक नॉव्हेल या नव्या माध्यमावर चर्चा करताना ग्राफिक डिझायनर्स, इंग्रजीतून ग्राफिक नॉव्हेल लिहिणारा मराठी लेखक आणि लहान मुले अधिकाधिक पुस्तकांकडे वळावीत याची तगमग असलेला चित्रकार या सगळ्यांना आपल्या मराठी पालकांना काय सांगायचे आहे?

नव्या पिढीचा प्रवास वाचनाकडून पाहण्याकडे चाललेला आहे. याला कारण काय असेल, तर ‘दृश्यांकित विचार’- हा पचायला सर्वात सोपा. कल्पनाशक्तीला अजिबात त्रास न देणारा. म्हणून तो चटकन् आपलासा केला जातो. आज मोबाइलवर मेसेजदेखील इमोजीविना पाठवले जात नाहीत. (सिरी-अलेक्साच्या संवादांमध्ये आपण लिखित शब्द वापरायची ताकद गमावून बसू अशी परिस्थिती आहे.) सध्या दृक्-श्राव्य माध्यमांनी आपण चहुबाजूंनी घेरलो आहोत. रस्त्यावरची होर्डिंग्ससुद्धा आपल्यासाठी ‘स्क्रीन’ बनली आहेत. म्हणजे जाहिरातीचे शीर्षकदेखील वाचायचे कष्ट कुणी घ्यायला नकोत अशी परिस्थिती. शिक्षणदेखील युट्युब / व्हिडीओज आणि अॅनिमेटेड अॅप्स यांच्या साहाय्याने नवे स्वरूप मांडत आहे. या साऱ्या वातावरणात ‘ग्राफिक नॉव्हेल्स’ची संस्कृती विस्तारली नाही तरच नवल.

हेही वाचा – केवळ योगायोग…!

दृश्य संदेश अक्षरांपेक्षा अधिक खोलवर परिणाम करतात, तर शब्द प्रत्येक वाचकाच्या मनात एक वेगळे दृश्य घडवू शकतात. परंतु प्रत्येक मनुष्य दृश्य-विचार करतो / करू शकतो असे नाही. एकानंतर एक येणारी, विशिष्ट कथानक सादर करणारी चित्रे, म्हणजेच ‘सिक्वेशियल आर्ट’ याचा इतिहास मोठा आहे. गुहेतील भित्तिचित्रांपासून, ईजिप्शियन हेरोग्लिफ्स, पुरातन मंदिरातील देवदेवतांच्या कथा सांगणारी शिल्पे आदींना ग्राफिक नॉव्हेल्सचे पूर्वज म्हणावे लागेल.

प्रत्येक कलाप्रकाराला स्वत:चे व्याकरण आहे. ग्राफिक नॉव्हेल्समधले पॅनेल्स, ध्वनी मोठ्या अक्षरात दर्शवण्याची पद्धत, इतकेच नाही तर उलट्या दिशेने वाचायची जपानी ‘मांगा’कॉमिक्स. या गोष्टी आजच्या पिढीला सवयीच्या झाल्या आहेत. ‘मांगा’ तर पौर्वात्य संस्कृतीचा आपल्या भारतीय मनावर घाला आहे. आता शहरात कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात गेलात तर ग्राफिक नॉव्हेल्सच्या खणात झालेले हे आक्रमण सहज दिसून येईल. ‘कॉमिक कॉन’ या वार्षिक मेळाव्यामध्येदेखील हेच चित्र दिसून येते. कुठे गेले पारंपरिक सुपरहिरो? कुठे गेले भारतीय सुपरहिरो? बहादूर, चाचा चौधरी आणि साबू आजच्या पिढीला रुचणार नाहीत, पण दुधाची तहान त्यांनी जॅपनीज ‘ताका’वर का भागवावी?

ग्राफिक नॉव्हेलमुळे शब्दांबरोबर चित्रेही वाचायची असतात, याची जाणीव झालेला वाचकवर्ग तयार झाला. वादग्रस्त नर्मदा धरण बांधकामा- भोवतीच्या सामाजिक, राजकीय व पर्यावरणविषययक समस्यांवर भाष्य करणारे ओर्जित सेन यांचे ‘रिवर ऑफ स्टोरीज्’ (१९९४) हे भारतातील पहिले ग्राफिक नोव्हेल मानले जाते. सारनाथ बॅनर्जी यांची ‘कॉरिडॉर’ (२००४) हे गाजलेले पहिले भारतीय ग्राफिक नॉव्हेल. त्यानंतर हा साहित्यप्रकार भारतीय मातीत रुजविण्यासाठी इथल्या कलाकारांचे अनेक प्रयत्न झाले, पण ते यशस्वी झाले नाहीत. आधीची कॉमिक्ससंस्कृती ही आपल्या वाचनपरिघात नव्वदच्या दशकानंतर वाढायला वाव असतानाही वाढली नाही. पण पुढे टीव्ही वाहिन्यांचे जागतिकीकरण आणि ‘ओटीटी’ने केलेल्या दृश्यसाक्षरतेने तसेच ग्राफिक नॉव्हेल्सवरच्या गाजलेल्या चित्रपट- मालिकांमुळे तरुण वर्ग या चित्रकादंबऱ्यांकडे आकर्षित झाला.

सध्या रस्त्यावरच्या पुस्तकदालनांतही जपानी मंगाचे (कॉमिक बुक) इंग्रजी अनुवादांसह आगमन झाले आहे. शिवाय लहान मुलांमध्ये वाचनरुची निर्माण करण्यासाठी अवतरलेल्या प्रादेशिक भाषांतील चित्रमय बालकादंबऱ्यांनी (पिक्चर बुक्स) खऱ्या अर्थाने देशी ‘ग्राफिक नॉव्हेल्स’चा पाया रचायला सुरुवात केली आहे. ग्राफिक नॉव्हेल म्हणजे चित्रांतून अधिकाधिक आणि शब्दांतून कमीत कमी सांगितला जाणारा चित्रचौकटींचा दीर्घ प्रकार. १९७८ मध्ये विल आयस्नरच्या न्यू यॉर्कमधील झोपडपट्टी दाखविणाऱ्या ‘ए कॉण्ट्रॅक्ट विथ गॉड’ नामक पुस्तकाला जगातल्या पहिल्या ग्राफिक नॉव्हेलचा दर्जा मिळाला. आयुष्यभर विल आयस्नर याने स्वत:ला कधी ‘ग्राफिक नॉव्हेलिस्ट’ संबोधले नाही. स्वत:ला तो कॉमिक बुक आर्टिस्ट किंवा कार्टूनिस्ट मानत असे, पण ‘ए कॉण्ट्रॅक्ट विथ गॉड’ हे पुस्तक लिहिताना त्याने आपण कार्टून किंवा कॉमिक बुक लिहित नसून, ‘ग्राफिक नॉव्हेल’च लिहित आहोत हे प्रकाशकाला स्पष्ट केले.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात कॉमिक्सची भरभराट झाली, पण चित्रांनी खच्चून भरलेल्या आणि सर्वत्र सहज मिळणाऱ्या स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन या कॉमिक्सना रंगसंगतीच्या ठरावीक मर्यादा होत्या. त्यातच त्या केल्या आणि छापल्या जात होत्या. ग्राफिक नॉव्हेलने रंगसंगतीपासून त्या काळात असलेल्या कॉमिक्समधील मर्यादांवर मात केली. केवळ लहान, कुमारवयीन मुलांसाठी असलेल्या कॉमिक्सचे स्वरूप ग्राफिक नॉव्हेलनंतर बदलले. प्रौढांसाठीच्या म्हणजेच कथाआकलनाच्या दृष्टीने कठीण विषयांना, वैज्ञानिक संकल्पनांना, ऐतिहासिक घटनांना सचित्र कथांमधून ग्राफिक नॉव्हेलच्या माध्यामातून सादर केले. मग नावे घेतली जावी अशी डझनावर अधिक चित्रकादंबरीकार तयार झाले. फ्रँक मिलर (थ्री हण्ड्रेड, सिन सिटी), अॅलन मूर (फ्रॉम हेल, वॉचमेन, व्ही फॉर वेण्डेटा), मर्जान सत्रापी (पर्सीपोलीस), जोनाथन एण्टविसल (द एण्ड ऑफ द फकिंग वर्ल्ड) या ग्राफिक नॉव्हेल्सवरच्या चित्रपट- मालिकांमुळे त्या चित्रकादंबऱ्यांचा वाचक कलाभोक्ता वर्तुळापुरता उरला नाही, तर सामान्य वाचकांमध्येही या साहित्य प्रकाराबाबत कुतूहल वाढले. निक डनासो हा चित्रकादंबरीकार ‘सॅबरिना’ या चित्रग्रंथासाठी काही वर्षांपूर्वी पारितोषिकासाठी दावेदार ठरत बुकरच्या लघुयादीत दाखल झाला. त्यानंतरही या पुस्तकांना साहित्यिक वलय प्राप्त झाले. अॅड्रियन टोमिना यांच्या पुस्तकांनी आणि न्यू यॉर्करमधील चित्रांमुळे केवळ गोष्टींनाच नाही तर मासिका, साप्ताहिकांच्या वृत्त-लेखांनाही सजविण्यासाठी ग्राफिक नॉव्हेलमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची गरज तयार झाली. सध्या ‘पॅरिस रिव्ह्यू’, ‘ न्यू यॉर्कर’, ‘न्यू यॉर्क टाइम्स’, ‘वायर्ड’, ‘जी क्यू’पासून जगात पोहोचणाऱ्या कित्येक नियतकालिकांमध्ये दीर्घ रिपोर्ताज् या कलाकारांच्या चित्रांमधून सध्या समजावून सांगितला जात आहे. नेटफ्लिक्स क्रांतीमुळे दिवसेंदिवस तो वाढत जाणार आहे.

कॉमिक बुकचा इतिहास पाहायचा झाला तर १८४२ मध्ये स्विस प्राध्यापक रुडॉल्फ टॉफेर याचे ‘द अॅडव्हेंचर ऑफ ओबाडाया ओल्डबक’ हे पहिले कॉमिक बुक मानले जाते. मात्र, पहिली कॉमिक कथा गाजली ती १८९५ मध्ये पुलित्झर जर्नल व ऱ्हट्स जर्नलमध्ये छापून येणारी ‘होगन्स अॅली’(hogan’ s Alley) ही न्यूयॉर्कमधील रस्त्यावर राहणाऱ्या ‘यल्लो किड’ (yellow kid) नामक पात्राची कथा. रिचर्ड औटकोल्ट यांची ही कॉमिक स्ट्रिप इतकी प्रसिद्ध झाली की ती छापणारे दोन्ही जर्नल्स हे ‘यल्लो किड पेपर’ नावाने ओळखले जाऊ लागले. १९३६ मध्ये आलेल्या ‘फॅन्टम’ आणि १९३८ मधील ‘सुपरमॅन’ या चित्रकथांनी या माध्यमाला ऐतिहासिक कलाटणी दिली. पुढे या सुपरहिरोंनी जगभरातील वाचकांना वेड लावले.

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माणसं आणि काळाचे दस्तावेजीकरण

भारतात १९ व्या शतकात अनेक वर्तमानपत्रे आणि साप्ताहिकातून व्यंगचित्र आणि कॉमिक स्ट्रिप वाचकांपर्यंत पोहोचू लागल्या. १९६० मध्ये भारतीय कॉमिकचे जनक अनंत पै यांच्या ‘अमर चित्रकथा’ ने भारतात कॉमिक बुक व्यवसायाला चालना दिली व हे माध्यम घराघरांत पोहोचवले. १९७१ मध्ये प्राण यांच्या ‘चाचा चौधरी’ने त्यावर कळस चढवला. भारतात मोठ्या प्रमाणात यांचा बाल व तरुण वाचक तयार झाला.

मराठीत पूर्णपणे नव्या ग्राफिक नॉव्हेलबरोबर अनेक प्रसिद्ध कथा, लोककथा, कादंबऱ्या या ग्राफिक नॉव्हेलच्या माध्यमातून पुन्हा प्रकाशित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे कमी वाचन असणाऱ्या मुलांना मराठी साहित्याशी जोडता येऊ शकेल. ‘कुमारस्वर’ आणि ‘किमयागार कार्व्हर’ ही दोन चित्रात्मक पुस्तके गेल्या वर्षी अखेरीस आली. त्यांना मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. ही चित्रपुस्तके (पिक्चर बुक्स) आहेत. परदेशात ज्याप्रमाणे युद्धापासून ते इतिहासापर्यंत, भविष्यात घडणाऱ्या कथानकांपासून ते सामान्य जगण्याच्या व्यवहारापर्यंतचे विषय घेऊन ज्या पद्धतीची ग्राफिक नॉव्हेल सध्या येत आहेत त्यापर्यंत आपल्याला जायला आणखी काही वर्षे जावी लागणार आहेत. सध्या फक्त या माध्यमातील प्रयोग आणि वैविध्य इथले कलाकार समजून घेत आहेत. पण हल्ली लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये सध्या वाढत जाणाऱ्या चित्रांचे प्रमाण पाहता नजिकच्या भविष्यात उन्हाळी-दिवाळी सुट्ट्यांत मुलांचा पारंपरिक पुस्तकांपेक्षा अधिक ग्राफिक नॉव्हेल वाचण्याकडे कल असणार आहे.

मराठीतील पहिलं ग्राफिक नॉव्हेल…

विक्रम पटवर्धन यांची ‘दर्या’ (२०१७) ही कादंबरी मराठीतील पहिली ग्राफिक नॉव्हेल मानली जाते. ‘दर्या’ नामक बेट, त्यावरील कोळ्यांच्या वस्त्या, त्यांचे आयुष्य, माशांच्या विशिष्ट प्रजाती, शांताराम नावाच्या एका व्यक्तिरेखेकडे असलेली दैवीशक्ती आणि त्याचा २१ वर्षांचा प्रवास हे शब्दांबरोबरच चित्रांमधून यात साकारण्यात आले आहे. सध्या दर्या या चित्रकादंबरी त्रयीतील पहिल्या भागावर काम सुरू आहे. तो प्रकाशित झालेल्या दर्याचा पूर्वार्ध असेल, असे विक्रम पटवर्धन यांनी सांगितले.

वाचावीच अशी…

माऊस : आर्ट स्पीगलमन

घोस्ट वर्ल्ड : डॅनिअल क्लाऊस

जो साको : फूटनोट्स इन गाझा

ब्लॅक होल : चार्ल्स बर्न्स

राम व्ही : द मेनी डेथ्स ऑफ लैला स्टार

(लेखक ग्राफिक डिझायनर आहेत)