डॉ. संतोष पाठारे

चित्रपट महोत्सव, फिल्म सोसायट्यांचे व्यासपीठ तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीला भवतालातील माणसं आणि त्यांच्या कार्याची नोंद घेण्यासाठी ‘डॉक्युमेण्ट्री’चा मोह झाला. नंतर माहितीपटांची एक साखळी तयार झाली. त्याविषयी…

आपल्या अवतीभोवती असे अनेक विषय, विविध क्षेत्रात कार्य करणारी माणसं आहेत, ज्यांचे योग्य वेळी दस्तावेजीकरण झालं नाही तर त्यांच्या संबंधीची कोणतीच खात्रीलायक माहिती भविष्यात उपलब्ध असणार नाही. असं दस्तावेजीकरण करायचं तर ते लिखित स्वरूपापेक्षा तरुणांना समजणाऱ्या व्हिजुअल भाषेतच करणं गरजेचं आहे, ही जाणीव आपल्याकडे ठळक साधारण केव्हापासून झाली असेल? उदारीकरणानंतरच्या पर्वात खरं तर अनेकांगाने आपली दृश्यिक शिकवणी घडत होती. साधी जाहिरातदेखील तेव्हा कमीत कमी काळात परिणामकारकता साधण्याचा प्रयत्न करीत होती. एमटीव्ही- व्ही चॅनल आले, त्यानंतर भारतीय चित्रपटांची झलकदृश्ये (ट्रेलर) कितीतरी भिन्नपणे सादर व्हायला लागली. विशेषत: दोन हजार सालाच्या दरम्यान डिस्कव्हरी आणि त्यासम वाहिन्यांमधून येणाऱ्या डॉक्युमेण्ट्रीज्चे विषयवैविध्य थक्क करणारे होते. प्राणी-पक्ष्यांबाबत अचंब्याचे तपशील ते माहितीसह जगभरातील लोकांचा रोजच्या जगण्याचा तपशीलही डॉक्युमेण्ट्रीचा विषय होऊ शकतो, हे त्यातून समजूउमजू लागले.

हेही वाचा…‘ईव्हीएम’चा प्रवास वाद आणि प्रवाद…

मी खरे तर रसायनशास्त्राचा प्राध्यापक. लहानपणापासून सिनेमाची आवड असली, तरी प्रत्यक्षात सिनेमाशी संबंध उशिराने आला. प्रभात चित्रमंडळासाठी काम करताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची ओळख झाली. पुढे हा प्रवास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत ज्युरीपर्यंत झाला. आशियाई आणि मामी फिल्म फेस्टिव्हलसाठी फिल्म निवडीचे काम करीत असताना मला डॉक्युमेण्ट्री करण्याचा मोह झाला. दस्तावेजीकरणाचा प्रयत्न म्हणून मी तो करून पाहिला. चित्रपटाला आवश्यक असणारी बांधीव पटकथा हाताशी नसताना, एखाद्या विषयावर केलेलं सखोल संशोधन, त्या विषयातील तज्ज्ञ मंडळीची मतं, आपल्या कॅमेरामन सोबत घेऊन केलेलं प्रकाशचित्रण आणि नंतर संकलकाच्या मदतीने दृश्यांची केलेली मांडणी, यातून एक प्रभावी माहितीपट निर्माण होऊ शकतो याची अनुभूती ‘टेल ऑफ नेटीव्ह्ज’ या माहितीपटाने मला दिली.

एका प्रकल्पावर काम करीत असताना पाठारे क्षत्रिय समाजाची अधिकाधिक माहिती मिळत गेली. मुंबईत शतकानुशतके वास्तव्यास असलेल्या या माझ्या ज्ञातीची संस्कृती, परंपरा, ज्ञाती बांधवांनी मुंबई शहराच्या जडणघडणीत दिलेले योगदान विस्तृतपणे चित्रित करावे हा उद्देश होता. ‘टेल ऑफ नेटीव्ह्ज’ची निर्मिती त्यातून झाली. कथात्म चित्रपटाच्या (feature film) क्षेत्रात रमणाऱ्या माझ्यातील कलावंताला ‘टेल ऑफ नेटीव्ह्ज’ने माहितीपटाच्या दुनियेत खेचून आणलं.

हेही वाचा…यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा..

रसायनशास्त्राच्या प्राध्यापकीमधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर चित्रपट क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला. ‘मामि’ महोत्सवातील ‘डायमेंशन मुंबई’ या स्पर्धेसाठी अमोल आगलावे या तरुण मित्राला पाच मिनिटे लांबीचा माहितीपट करायचा होता. मुंबईत पाळेमुळे रुजलेल्या माझ्या पाठारे क्षत्रिय ज्ञातीची वैशिष्ट्ये असणाऱ्या पारंपरिक खाद्यापदार्थांचं वैविध्य दाखवणारा माहितीपट करण्यास मी त्याला सुचवले. या निमित्तानं मुंबईतील खाद्यासंस्कृती या विषयावर संशोधन केलं. अमोल आणि अश्विन सुवर्णा यांनी माझ्या या संशोधनावर आधारित ‘लँड लॉर्डस्’ हा माहितीपट निर्माण केला. त्याच दरम्यान एके दिवशी अनंत भावे सरांचा कॉल आला. गप्पांच्या ओघात सुमित्रा भावे या दिग्दर्शिका आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत दुर्लक्षित राहिल्या आहेत, तू त्यांच्यासाठी काहीतरी कर असं सरांनी मला सुचवलं. मी सुमित्रा भावेंच्या चित्रपटांचा महोत्सव करावा किंवा त्यांच्या चित्रपटाचं विश्लेषण करणारा लेख लिहावा अशी त्यांची अपेक्षा असावी. मी मात्र सरांना सुमित्रा भावेंवर एक माहितीपट करतो असं सांगितलं. त्यानंतर सुमित्रा भावे यांच्यावर माहितीपट करण्याचा निर्णय मनात पक्का केला. फार वेळ न दवडता मी सुमित्रा भावेंचा सहदिग्दर्शक सुनील सुकथनकर याच्याशी बोललो. सुनीलला माझी ही कल्पना आवडली. सुमित्रा भावे यांचे अनेक शिष्य चित्रपट माध्यमात कार्यरत असताना त्या मला त्यांच्यावर आधारित माहितीपट करायला परवानगी देतील का, ही शंका मनात होती. मी जरा घाबरत घाबरत त्यांना फोन केला. माझं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि होकार कळवला.

सुमित्रा भावे यांच्या काही मुलाखती आणि त्यांनी स्वत: लिहिलेले लेख वगळता दृक्श्राव्य माध्यमात सुमित्रा भावे यांच्या चित्रपट निर्मितीची प्रक्रिया आणि त्यांचे चित्रपट माध्यमासंबंधीचे विचार उपलब्ध नव्हते.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : निसर्गसंवर्धनाची गाथा

योगेश खांडेकर, प्राची चौघुले, उज्ज्वल मंत्री, विपुल महागावकर, सौरभ नाईक, मंदार कमलापूरकर, अक्षय बापट आणि रोहित मालेकर अशी टीम जमवून सुमित्रा भावेंचे चित्रपट पुन्हा एकदा पाहून काढले. माहितीपटाचं स्वरूप काय असावं याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. सुमित्रा भावे यांच्याकडून कोणते मुद्दे माहितीपटात येणे अपेक्षित आहेत त्याची टिपणं तयार केली. सुमित्रा भावे यांच्याबरोबर काम केलेल्या कलावंतांची एक भली मोठी यादी तयार झाली
माहितीपटाचं प्रत्यक्ष चित्रीकरण करण्याआधी संपूर्ण टीमसहित सुमित्रा मावशींना पुण्यात जाऊन भेटलो. त्यांच्याबरोबर केलेल्या चर्चेत अनेक गोष्टींबाबत स्पष्टता आली. माहितीपटाच्या निर्मितीचा खर्च काही लाखांत जाणार होता. निर्माता शोधण्यात वेळ न घालवता मी आणि माझी पत्नी आरती, आम्हीच निर्मितीचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला.

कोविड काळाचा पहिला फेरा संपला होता. त्यादरम्यान मुंबईत फन रिपब्लिकमध्ये माझ्या मित्रांनी ‘कासव’चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं. त्याच ठिकाणी सुनीलची मुलाखत शूट करून माहितीपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली. या मुलाखतीमुळे आत्मविश्वास दुणावला, पण सुमित्रा मावशींच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमुळे शूटिंग दोन महिने लांबणीवर गेलं.

हेही वाचा…भारतचीन नवस्पंदनाचा दस्तावेज

फेब्रुवारी २०२१ मध्ये पुण्यात दोन दिवसांत नियोजनबद्ध शूटिंग केलं. या शूटिंगदरम्यान लक्षात राहिलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट निर्माण करणाऱ्या सुमित्रा भावेंनी माझ्यासारख्या नवख्या दिग्दर्शकाला दृश्य कसं चित्रीत करावं याबद्दल एकही सूचना केली नाही. ‘हे तुमचं बाळ आहे, तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते सांगा आणि तुमच्या मनासारखं शूट करा’, असं सांगून माझ्यासहित संपूर्ण टीमला कोणतंही दडपण जाणवू दिलं नाही.

शूटिंगनंतर आम्ही लगेचच पहिला ड्राफ्ट एडिट केला. दुर्दैवानं हा ड्राफ्ट तयार झाला तेव्हा सुमित्रा मावशींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. १९ एप्रिलला त्यांचं निधन झालं. या माहितीपटात सुमित्रा भावे सेटवर कशा प्रकारे काम करतात, हे चित्रित करणं राहून गेलं. हा माहितीपट पाहून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया मोलाची असणार होती. मी केलेलं काम त्या पाहू शकल्या नाहीत याची खंत कायम राहणार आहे. सुमित्रा मावशी गेल्या त्या दिवशी सकाळीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा फोन आला ‘तू अत्यंत योग्य वेळी माहितीपट पूर्ण केलास, तुझ्या माहितीपटामुळे मावशी कायम जिवंत राहतील.’ त्या शब्दांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी आल्याची जाणीव झाली.

हेही वाचा…निमित्त : काहे जाना परदेस!

सुमित्रा भावे यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर काय वलय होतं याचा अनुभव केरळ, पिफ, एशिअन या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ही फिल्म प्रदर्शित करताना मला आला. ‘सुमित्रा भावे – एक समांतर प्रवास’ या माहितीपटानं मला दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली. चित्रपट निर्मिती प्रक्रियेचं प्रशिक्षण मला या माहितीपटानं दिलं. सुमित्रा भावेंनी चित्रपट निर्मितीची जी तत्त्व सांगितली ती पुढच्या प्रवासात मला उपयोगी पडत आहेत.

हा माहितीपट पाहून स्मिता गांधी यांनी त्या निर्माण करत असलेला ‘मारू जीवन एज मारी वाणी’ हा माहितीपट करण्यासाठी बोलावलं. स्मिता गांधी यांचे वडील दत्ता ऊर्फ आप्पा गांधी आणि आई आशा गांधी हे साने गुरुजींचे अनुयायी. स्वातंत्र्य संग्रामात या दाम्पत्यानं सक्रिय सहभाग घेतला होता. सेवा दलामध्ये कार्यरत असलेल्या आई-आप्पांनी साने गुरुजींनी दिलेल्या आदेशानुसार आयुष्यभर शिक्षकी पेशा स्वीकारून नवीन पिढी घडवण्याचं कार्य केलं. १५ मे २०२२ ला आप्पा वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करणार होते. स्मिता गांधी आणि त्यांची कन्या प्रज्ञा यांची आप्पा आणि आईंचे कर्तृत्व माहितीपटाच्या रूपात कायमस्वरूपी राहावे, अशी इच्छा होती. त्यांनी चौदा तासांचं चित्रीकरण करून ठेवलं होतं मात्र काही तांत्रिक कारणांनी हा प्रकल्प थांबला होता. चौदा तासांचं आधीचं फुटेज आणि माझ्या मनात चित्रित करायच्या असलेल्या दृश्य प्रतिमा अशातून एक तासांचा माहितीपट निर्माण करणं हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. दरम्यान आशा गांधी यांचं निधन झालं. मात्र काहीही करून १५ मे २०२२ ला हा माहितीपट पूर्ण करायचा या उद्देशानं मी माझ्या टीमसहित कामाला लागलो. शंभर वर्षांचे उत्साही आप्पा आमच्याबरोबर शांतिवन पनवेल, माणगाव, पोलादपूर येथे शूटिंगला आले. त्यांनी सांगितलेल्या आठवणी, आजच्या राजकीय परिस्थितीबद्दलची परखड मतं आम्ही चित्रबद्ध केली आणि १५ मे २०२२ ला ‘मारू जीवन एज मारी वाणी’ चं पहिलं प्रदर्शन झालं.

या दोन्ही माहितीपटांनी मला या माध्यमात काम करण्याची ऊर्जा मिळवून दिली. गेले अनेक वर्षं मनात घोळत असलेला विषय मी माहितीपटाच्या रूपानं प्रत्यक्षात आणण्याचं ठरवलं. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बंगाली दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष हा माझ्या आवडीच्या दिग्दर्शकांपैकी एक. २०१३ मध्ये त्याचं निधन झालं तेव्हा त्याच्या दिग्दर्शकीय शैलीचा वेध घेणारा एक लेख मी लिहिला होता. या लेखावर आधारित माहितीपटाची निर्मिती करण्याचा निर्णय मी घेतला. कोलकाता येथे होणाऱ्या फिल्म सोसायटीच्या एका वार्षिक सभेला जाण्याची संधी मला मिळाली. या निमित्तानं कोलकाता शहरात भटकंती करून ऋतुपर्णोशी संलग्न असणाऱ्या कलावंतांना भेटून त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवावी असं ठरवलं. पत्रकार सोवन तरफदार, दिग्दर्शक अर्जुन दत्ता, राजादित्य बॅनर्जी, कवी सुवादीप चक्रवर्ती, ऋतुपर्णोच्या चित्रपटांचं संकलक अर्घ्यकमल मित्र आणि गुरू सिबाजी बंडोपाध्याय यांनी या कामी मला मदत केली. कोलकाता येथील प्रकाशचित्रणकार जॉयदीप भौमिक याच्याबरोबर दोन दिवस संपूर्ण कोलकाता फिरून मी चित्रीकरण पूर्ण केलं.
ऋतुपर्णोच्या चित्रपटांचं गारुड केवळ बंगालीच नव्हे तर इतर प्रदेशातील प्रेक्षकांच्या मनावर अजूनही आहे हे मला यानिमित्तानं उमजलं. मधुर पडवळ या गुणी संगीतकारानं बंगाली लोकसंगीताचा साज या माहितीपटाला चढवला आणि माझ्या मनातील ‘इन सर्च ऑफ ऋतुपर्णो’ साकार झाला. त्याला महोत्सवांमधून सुखावह प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा…पेशवाईतील समाजाचे वस्तुनिष्ठ दर्शन

आजही आपल्याकडे ओटीटी किंवा दूरदर्शनवर अशा प्रकारच्या माहितीपटांचे प्रक्षेपण करणारी व्यवस्था उभी राहिलेली नाही. माहितीपटांचं वितरण करून निर्मात्यांना आर्थिक पाठबळ देणारी व्यवस्था आपल्याकडे उभी राहिली तर उत्तम दर्जाचे अनेक माहितीपट निर्माण होऊ शकतील. अर्थात सद्या:स्थितीत तुटपुंज्या आर्थिक पाठबळावर एखाद्या विषयाचा ध्यास घेतलेली मंडळी निष्ठेने माहितीपट निर्माण करत आहेतच.

माहितीपट निर्मितीनंतर मी कथात्म चित्रपटाकडे वळण्याचा विचार करत असतानाच अरुण सरनाईक यांसारख्या दिग्गज गायक कलाकाराचं आयुष्य माहितीपटाच्या रूपात चित्रित करण्याची संधी चालून आली आहे. माहितीपट निर्मितीचा हा प्रवास अनुभवविश्व संपन्न करीत सुरूच राहणार आहे.

हेही वाचा…लक्षणीय कथात्मक प्रयोग…

‘एशियन फिल्म फेस्टिव्हल’चे संचालक. नॉर्वेमधील ‘ट्रॉम्सो’ आणि दक्षिण आफ्रिकेतील ‘इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये भारतीय ज्युरी म्हणून काम. ‘इन सर्च ऑफ ऋतुपर्णो’ या माहितीपटाची आंतरराष्ट्रीय माहितीपट महोत्सवासाठी निवड.

santosh_pathare1@yahoo.co.in