श्याम मनोहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१.

तिघे सकाळचा पहिला चहा घेत होते. सकाळ खास होती. नवऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या पहिल्या दिवसाची पहिली सकाळ होती. मुलीची एमटेकची परीक्षा संपल्यानंतरची पहिली सकाळ होती. बायकोची दोघांमुळे आपोआप पहिली सकाळ झाली होती. आदल्या दिवशी संध्याकाळी नवऱ्याचा निरोप समारंभ झाला होता. प्राचार्यांच्या हस्ते सत्कार झाला होता. प्राचार्यांनी नवऱ्याला शेकहँड करून भावी जीवनाला शुभेच्छा दिल्या होत्या.

नवऱ्याचे सहकारी भाषणात म्हणाले होते : प्राध्यापक सुतार सरांची एक गोष्ट आहे. सुप्रसिद्ध आहे. अद्भुत आहे. आत्ता ती गोष्ट सांगायचा मला मोह आवरत नाही. सुतार सर आपल्या कॉलेजात सर्व्हिसला लागून तीन वर्षे झाली होती. तेव्हाची गोष्ट. ब्रिटिश कौंसिलने मराठीच्या प्राध्यापकांची एक कार्यशाळा आयोजिली होती. मराठीच्या प्राध्यापकांनी साहित्याचा तत्त्वज्ञानात्मक प्रकल्प सबमिट करायचा. त्यावरून प्राध्यापकांची कार्यशाळेसाठी निवड ठरणार होती. निवडलेल्या प्राध्यापकांच्या प्रकल्पाची कार्यशाळेत चर्चा होणार. ऑक्सफर्ड विद्यापीठातले साहित्य आणि तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक कार्यशाळेत मार्गदर्शन करणार. मित्रहो, ऑक्सफर्डचे प्राध्यापक कोण? चक्क मराठी भाषिक. प्राध्यापक चिखले. सुतार सरांनी प्रकल्प पाठवला. तेवीस प्राध्यापकांची निवड झाली होती. ज्युनिअर कॉलेजमधल्या फक्त सुतार सरांची निवड झाली होती. सुतार सरांचा विषय होता. साहित्यातील विशेषणांचे कार्य. सुतार सरांचा निबंध इंग्रजीत अनुवादित झाला, ऑक्सफर्डच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.

सुतार सर, ही अद्भुत गोष्ट मराठीच्याच काय, सर्व प्राध्यापकांच्या कित्येक पिढ्यांत बोलली जाईल. सुतार सरांना खरे तर विद्यापीठाने आवर्जून मानाने बोलवायला हवे होते, पोस्ट द्यायला हवी होती. ही आपली स्वत: सुतार सर आनंदाने ज्युनिअर कॉलेजमध्ये राह्यले. सुतार सरांचा आपल्याला सहवास मिळाला, हे आपले भाग्य सुतार सरांचे क्रिएटिव्ह आयुष्य वेगळ्या प्रकारे चालूच राहिले. सुतार सर महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख प्रकाशकांचे सल्लागार, क्रिएटिव्ह एडिटर म्हणून गेली कित्येक वर्षे कार्यरत आहेत. त्याचे क्रिएटिव्ह लाइफ चालूच राहणार आहे. आपण त्यांच्या क्रिएटिव्ह लाइफला शुभेच्छा देऊ या. सलाम करू या. सुतार सरांच्या क्रिएटिव्ह लाइफची आणखी एक गोष्ट सांगायचा मला मोह होतोय. सुतार सर, तुमची परवानगी न घेता बोलतोय. मला मोह आवरत नाहीय. सुतार सरांना यापुढे शेती करायचीय ते शेत घेणाराहेत. सुतार सर विद्यार्थीप्रिय होते, ते आनंदी आहेत, त्यांच्या कुटुंबात मी अनेकदा सहभागी झालोय. ते कुटुंब आनंदी वृत्तीचे आहेत. त्यांची मुलगी. एमटेक होतेय. बर्लिन विद्यापीठात पीएच.डीचे तिचे जुळलेय. सुतार सरांचे कौटुंबिक जीवन आनंदाचे आहे, सुतार सरांचे जीवन आनंदात जावो, सुतार सरांचे शेतीचे ते जुळवणारच. सुतार सर क्रिएटिव्ह शेतकरी होणार… सुतार सर, तुमची आम्हाला नेमहीच आठवण राहणार, आमच्या तुम्हाला शुभेच्छा, सदिच्छाच काय… आमचा तुम्हाला सलाम! धन्यवाद.

मुलगी म्हणाली, ‘‘आज मी माझा काहीही प्रोग्रॅम ठेवलेला नाहीय. नो इंटरनेट, नो व्हॉट्स अॅप, नो फ्रें डस्. माझा मोबाइल स्विच्ड ऑफ. आज आपण तिघे. एकत्र पूर्ण दिवस.’’
बायको म्हणाली, ‘‘मी माझा मोबाइल आत्ताच बंद करते. आज फक्त तिघे.’’
मुलगी म्हणाली, ‘‘पप्पा, आता तू ते तुझे क्रिएटिव्ह एडिटर वगैरे कायमचे बंद कर. खराखुरा पूर्ण सेवानिवृत्त.’’
नवरा म्हणाला, ‘‘बेटी, फार्म हाऊस घ्यायचेय. शेती करायचीय. शेतीचे स्थिर झाले की इतर बंद’’
बायको म्हणाली, ‘‘बेटी, सायन्सचे प्राध्यापक ट्युशन्स घेतात. सोशॉलॉजीचा एक प्राध्यापक रविवारी मुलामुलींना क्रिकेट शिकवतो. प्रत्येक प्राध्यापक काही ना काही साइड बिझनेस करतो. काहींचे डबल इंजिन असते. तुझा पप्पा मराठीच. मराठीला ट्युशन्स नसतात. मी गृहिणी. तुझ्या पप्पाला क्रिएटिव्ह एडिटरचे काम मिळाले. क्रिएटिव्हली पैसा मिळवला. आता तुझा पप्पा क्रिएटिव्ह शेतकरी होणार. शेती घ्यायचीय. पैसा हवा ना?’’
मुलगी म्हणाली, ‘‘पप्पा, आज नाही कसलेच काम. आज तिघे एकत्र.’’
नवरा म्हणाला, ‘‘मान्य. आज तिघे एकत्र.’’ तू उद्या सोमवारी रिटायर्ड व्हायला हवा होतास. आजची रविवारची तुझी सुट्टी वाया गेली.’’
बायको म्हणाली, ‘‘खरंच की आजची सुट्टी वाया गेली.’’
नवरा हसत म्हणाला, ‘‘उलट आहेय, आज रविवार आणि सेवानिवृत्तीचा पहिला दिवस दोन्ही सुट्ट्या एकदम.’’
बायको म्हणाली, ‘‘आजचा रविवारचा पगार नाहीच. फुकट सुट्टी.’’
मुलगी म्हणाली, ‘‘आजच्यापास्न पेन्शन मिळणारच.’’
बायको म्हणाली, ‘‘बेटी, तुझा पप्पा सोमवारी उद्यानंतर मंगळवारी रिटायर्ड झाला असता तर रविवारचा पगार मिळाला असता.’’
मुलगी म्हणाली, ‘‘मम्मी, आता तू असले हिशोब पुरे कर हं. मी युरो पाठवीन. हिशोब बंद मम्मी, आता तू तुझ्या माइंड्स लाइफ जग. व्यक्तीचे माइंड्स लाईफ ईज व्हेरी इंपोर्टंट.’’

नवरा म्हणाला, ‘‘नो. नो माइंड्स लाइफ आपले पंतप्रधान म्हणतात, आपले राष्ट्र समर्थ करायचेय. राष्ट्र हेच लाइफ.’’
बायको म्हणली, ‘‘राष्ट्र हेच लाइफ. आपले पंतप्रधान जे जे म्हणतात, ते ते मला सत्य. मला खुशाल कुणी म्हणू दे, मी पंतप्रधानांची अंधभक्त आहे. मी गर्वाने म्हणणार, मी पंतप्रधानांची अंधभक्त आहे.’’
मुलगी म्हणाली, ‘‘राष्ट्र हेच जीवन. आपण तिघेही पंतप्रधानांचे अंधभक्त आहोत. मम्मी, तू म्हणालीस तसे, गर्वाने म्हणायचे, आम्ही पंतप्रधानांचे अंधभक्त आहोत. पप्पा, तू आपल्या प्रिय पंतप्रधानांवर लेख लिही ना…’’
बायको म्हणाली, ‘‘शिवदास, खरंच तू आपल्या प्रिय पंतप्रधानांवर लेख लिही.’’
मुलगी म्हणाली, ‘‘दहा लेख लिही. पुस्तकच करायचे. पंतप्रधानांबद्दल अशी विशेषणे वापर, विरोधकांचे मेंदूच बंद होतील.’’
बायको म्हणाली, ‘‘पुस्तकच हवे.’’
नवरा म्हणाला, ‘‘नॉट नाऊ. आधी आता फार्महाऊस शेती. शेतीतून रोजगार निर्माण करायचे.’’
बायको म्हणाली, ‘‘रोजगार निर्माण करायचे. हे छान आहे. ग्रेट! चला, मजा आली. आता मी फिश आणायला जाते.’’
मुलगी म्हणाली, ‘‘खरंच की. आज रविवार फिश डे. आई, आज मी फिश करी करणार.’’
बायको म्हणाली, ‘‘ग्रेट, मी भाकरी करणार, भात करणार.’’
नवरा हसत म्हणाला, ‘‘मी तुमच्या हाताखाली.’’
बायको हसत म्हणाली, ‘‘डॉटर, युवर फादर ईज ए गुड बॉय.’’
मुलगी हसत म्हणाली, ‘‘मदर, तुझा हसबंड ईज अ गुड बॉय.’’
तिघांनी हात उंचावून हास्यकल्लोळ करत हवेत टाळ्या दिल्या.

२.

डायनिंग टेबलाशी तिघे खुर्च्यात सज्ज बसले होते.
नवरा म्हणाला, ‘‘थोडेसे लिहिलेय वाचू का?’’
बायको म्हणाली, ‘‘आपल्या प्रिय पंतप्रधानांवर?’’
मुलगी म्हणाली, ‘‘वाच, पप्पा.’’
नवरा वाचू लागला.
‘‘प्रिय पंतप्रधानजी, तुम्ही खूप बोलता.
तुमचे बोलणे, हाताचे, बोटांचे हावभाव, चेहऱ्यावरचे हावभाव, आवाजांचे चढउतार… अतिशय अतिशय मोहून टाकणारे असते. बोलताना तुम्हाला पाहात राहावे वाटते, तुमचा शब्दन् शब्द ऐकत राहावे वाटते.
भास्कराचार्य… आपले महान गणिती
प्रिय पंतप्रधानजी,
रामानुजन… मॅथॅमेटिक जिनियस ऑफ ऑल टाइम्स.
कालिदास, भवभूती, पाणिनी, बाण, कालिदासांचे शाकुंतल… जर्मन कवी गटे डोक्यावर घेऊन नाचला म्हणे. आणि मेघदूत आषाढस्य प्रथम दिवसे… ग्रेट! ग्रेट!
आणि वाल्मीकी! वाल्मीकीचा सृजनाचा क्षण!
सत्यजित रे
काव्यशास्त्र विनोदे न कालो गच्छति धीमताम्
प्रिय पंतप्रधानजी
कित्ती कित्ती आठवतेय!
मुलगी म्हणाली, ‘‘पप्पा, किती गोड मुद्दे काढलेस.’’
बायको म्हणाली, ‘‘सूचकता. तटस्थता आणि भावनाशीलताही.’’
मुलगी म्हणाली, ‘‘आता मस्त जेवायचे. रात्री आपल्या आवडत्या हॉटेलात स्नॅक्स.’’

३.

उत्तर दुपारी तिघांचा चहा. नवरा म्हणाला, ‘‘वाचू?’’
‘‘वाच, वाच’’ दोघी एकदम म्हणाल्या इ. स. २०२०.
१ – ‘‘जय श्रीराम म्हणा. म्हणा. तोंड बंद नाही ठेवायचे. म्हणा, जय श्रीराम.’’
चाचरत – ‘‘जय श्रीराम.’’
२- ‘‘तुमच्या कादंबरीत आमच्या देवदेवतांचे तुम्ही विद्रूप चित्रण केलेय.’’
कादंबरी काळाशी धसमुसलेपणा केला गेला. कादंबरीकाराचा शर्ट फाडला गेला. कादंबरीकाराच्या चेहऱ्याला काळे पासले गेले.
इ. स. २०४७
१- ‘‘जय श्रीराम, म्हणा.’’
‘‘श्री गुरुदेव दत्त.’’
जोरात- ‘‘जय श्रीराम म्हणा.’’
जोरात- ‘‘श्री गुरुदेव दत्त.’’
आणखी जोरात : ‘‘जय श्रीराम, म्हणा.’’
आणखी जोरात : ‘‘श्री गुरुदेव दत्त.’’
दोघे एकमेकांवर तुटून पडले. दोघांनी एकमेकांचे कपडे फाडले, बोचकारे काढले, गुद्दे घातले, एकमेकांच्या अंगावर थुंकले.
गर्दी बघत होती.
२ – ‘‘तुम्ही श्रद्धावान आहात.’’
‘‘होय, मी कट्टर श्रद्धावान आहेच.’’
‘‘तुम्ही देवभक्त आहात.’’
‘‘होय, मी कट्टर देवभक्त आहे.’’
‘‘तुमच्या अंत:करणात देव आहे.’’
‘‘होय,माझ्या अंत:करणात देव आहे.’’
‘‘आम्हाला तुमच्या अंत:करणातला देव बघायचाय. कपडा काढा. फाडा छाती. बघू दे आम्हाला तुमच्या अंत:करणातला देव. फाडा छाती. फाडा. फाडा. आम्हीच आता तुमची छाती फाडतो.’’
नको. नो हो अशा गोष्टी. नको नको. दु:ख होतेय. भीती वाटतेय.
नवरा स्फुंदून स्फुंदून रडू लागला.
मुलीने, बायकोने नवऱ्याला कुशीत घेतले, त्याच्या केसातून चेहऱ्यावरनं हात फिरवले.
‘‘पप्पा, शांत हो, शांत हो’’
‘‘शांत हो. शांत हो’’
‘‘पप्पा, पाणी घे. पी’’
नवऱ्याने पाणी प्याले, म्हणाला, ‘‘अजून थोडे उरलेय. वाचतो.’’
‘‘हं.’’
कोणत्याही काळात – साहित्यकारांनी लिखाणासाठी कोणताही साहित्यप्रकार, कोणताही विषय, कोणत्याही घटना, कोणतीही पात्रे, कोणतीही शैली घ्यावी. अभिव्यक्तिस्वातंत्र्य ज्ञानापर्यंत न्यावे.
परम ईश्वरकारांनी अमृत अनुभवापर्यंत जावे.
शांती. शांती. शांती.
शांती अवघड गोष्ट आहे.
त्याआधी ज्ञान, अमृत अनुभव याची तळमळ हवी.

४.

रात्री आठला तिघे त्यांच्या आवडत्या हॉटेलात.
मुलीने ऑर्डर दिली.
नवरा म्हणाला, ‘‘बौद्धिक काम हेच खरे काम. यापुढे मी बौद्धिक काम केवळ करणार.’’
मुलगी म्हणाली, ‘‘ग्रेट.’’
नवरा म्हणाला, ‘‘मला किती जमेल, कसे जमेल. मी त्यात अडकणार नाही. पूर्ण जागा राहून बौद्धिक काम करणार. बाकी काही नाही.’
बायको म्हणाली, ‘‘माझेच चुकले. शिवदास, मी तुला उगाच संसारात कारण नसताना अडकवले. माझेच चुकले. शिवदास, मी तेव्हाच तुला बौद्धिक काम करायला लावायला हवे होते. माझेच चुकले. आता चूक कळतीय. असंच होतं. चूक नंतर कळते. आता मी चूक करणार नाही. तू बौद्धिक कामच करायचेस’’
स्कॅक्स आले.

५.

तिघे घरी आले.
बायको म्हणाली, ‘‘आज तिघांनी हॉलमध्ये एकत्र झोपायचे.’’
‘‘ग्रेट.’’ मुलगी म्हणाली.’’
lokrang@expressindia.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First story in a series of three stories written by veteran writer shyam manohar mrj
Show comments