मराठी भक्तिसंगीताला नवे वळण देणारे संगीतकार रामभाऊ फाटक यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या (२१ ऑक्टोबर) प्रारंभानिमित्ताने त्यांनी मराठी भावगीत आणि भक्तिसंगीताला दिलेल्या योगदानाचे स्मरण..

आकाशवाणी या जनमाध्यमाने संगीतावर जेवढे उपकार केले आहेत, त्याला तोड नाही. अनेक कलावंतांचे हुन्नर जपत त्यांच्या सर्जनाला प्रोत्साहन देणारा आकाशवाणीवरील काळ आता इतिहासजमा झाला असला तरीही त्यामुळे संगीताच्या क्षेत्रात नवा इतिहास घडला, हे विसरता येणार नाही. सुधीर फडके यांच्या ‘गीतरामायण’ या साप्ताहिक गीतमालिकेने जो अभूतपूर्व इतिहास घडवला, तो केवळ माध्यमाचा पोहोच खूप होता म्हणून नाही, तर त्या गीतांच्या शब्दस्वरांना अभिजातता होती म्हणून. रामभाऊ फाटक यांच्यासारख्या कलावंत हृदयाच्या व्यक्तीला आकाशवाणीवर काम करायला मिळावं असं वाटणं त्यामुळेच शक्य झालं असावं. रामभाऊंनी गीतरामायणाच्या गीतमालिकेतील काही गीतं गाऊन आपला सुरेल सहभाग नोंदवला होताच. पण त्यांचा मूळचा पिंड संगीतकाराचा. शब्दांची सुरेख जाण असल्यानं त्यांना स्वरांच्या बंधनात गुंफताना फुलपाखराला जपावं इतक्या हळुवारपणे त्यांच्याकडे लक्ष देणारे रामभाऊ म्हणूनच आपला वेगळा ठसा उमटवू शकले. भावगीतांच्या दुनियेत स्वत:ची वेगळी वाट निर्माण करता करता भक्तिसंगीताच्या क्षेत्रात त्यांना अजरामर होण्याइतकं काम करता आलं. याचं श्रेय त्यांच्या स्वररचनांना आहेच; पण त्याहूनही त्यांच्या या रचना गाण्यासाठी त्यांना लाभलेल्या पं. भीमसेन जोशींच्या प्रज्ञावान गायकीलाही आहे.

त्याकाळी आकाशवाणीवर दर रविवारी ‘स्वरचित्र’ हा कार्यक्रम सादर होत असे. लोकप्रिय गीतांच्या कार्यक्रमांइतकाच श्रोतृवर्ग याही कार्यक्रमाला मिळत राहिला, कारण तो नव्या सर्जनाचा एक पाठ होता. नवे गीत आणि नवी स्वररचना असं त्याचं स्वरूप असे. अनेक गीतकारांना आणि नव्या दमाच्याच काय, पण कीर्तिवंतांनाही या कार्यक्रमासाठी आपल्याला बोलावणं यावंसं वाटत असे. आकाशवाणीचा संगीत विभाग हा इतर कोणत्याही विभागापेक्षा जरा वेगळा आणि लक्षात येणारा विभाग. कलाकारांची वर्दळ आणि सतत नावीन्याचा ध्यास असणारे कार्यक्रम संयोजक यामुळे या विभागाची चमक नेहमीच वाढलेली. संगीत पोहोचण्यासाठी त्याकाळी असलेल्या अन्य माध्यमांच्या तुलनेत आकाशवाणीचे महत्त्व फारच मोठे. जाहीर कार्यक्रम किंवा संगीत महोत्सव त्याकाळी फार मोठय़ा संख्येनं होत नसत. कारण तेव्हा संगीत ही ‘कमॉडिटी’ व्हायची होती. रसिकांनी स्वरांत चिंब होऊन न्हाऊन निघावे, एवढीच काय ती अपेक्षा असे. आकाशवाणीनं अभिजात संगीताला आपल्या पदराखाली घेऊन हे काम मोठय़ा प्रमाणावर केलं. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाला आलेल्या महत्त्वामुळे रामभाऊंनी ते पूर्ण करता करताच ग्वाल्हेर गायकीचे धडे घ्यायला सुरुवात केली. पुण्यातल्या भास्करराव गोडबोले यांच्याकडे तालीम घेता घेता आपल्यातील कलावंताची वाट मोकळी करण्यासाठी रामभाऊ तेव्हा प्रयत्नशील होते. साक्षात् बालगंधर्वानी नाटक कंपनीत येण्याचे निमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी नकार दिला असला तरीही संगीताची ओढ मात्र कमी होण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे शिक्षकी पेशा पत्करूनही १९४५ मध्ये एचएमव्हीनं त्यांची पहिलीवहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली आणि रामभाऊंना आपलं सुखनिधान सापडलं.

त्यांचं आकाशवाणीत येणं स्वाभाविक ठरलं आणि पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगांवकर यांच्यासारख्या प्रतिभावंतांच्या सहवासात त्यांच्या सर्जनाला नवनवे धुमारे फुटू लागले. नियमांच्या पोलादी चौकटीत राहूनही आपली प्रतिभा विस्कटू न देण्याचं कसब रामभाऊंनी अंगी बाणवलं आणि त्यातून आकाशवाणीच्या श्रोत्यांना अनेक नव्या कल्पनांना सामोरं जाता आलं. हे सुरू असताना भावगीतांच्या दुनियेतील त्यांची मुशाफिरी सुरूच राहिली. आणि ‘डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको’, ‘दिसलीस तू फुलले ऋतू’, ‘अंतरीच्या गूढ गर्भी’ यांसारखी त्यांनी स्वरबद्ध केलेली भावगीतं रसिकांच्या पसंतीला उतरू लागली होती. मृदू स्वभाव आणि संतवृत्ती यामुळे रामभाऊंना सरकारी खाचाखोचांपेक्षाही स्वरांच्या खाचाखोचांमध्ये अधिक रस वाटत असे. भक्तिसंगीताचा प्रांत त्यांना जवळचा वाटण्याचं हेही एक मुख्य कारण. त्यांचं आणि भक्तिसंगीताचं सुदैव असं, की साक्षात् भीमसेनी स्वरांनी ते परिपूर्ण झालं.

महाराष्ट्रातील लोकसंगीत परंपरेत देवळात गायल्या जाणाऱ्या संगीताचं महत्त्व अनन्यसाधारण. एकतारीवर गायलं जाणारं हे संगीत महाराष्ट्रापुरतं अभिजात म्हणावं असं होतं. रागसंगीतातील अनेक अवघड वाटा-वळणं इथं अगदी सुभग होऊन प्रकट व्हायची. कीर्तन किंवा भजन या प्रकारात शब्दांचं महत्त्व अनन्यसाधारण. कारण त्यात विचार असे. हा विचार संगीतातून सादर करणं हे वरवर सोपं वाटणारं काम; पण प्रत्यक्षात अतिशय अवघड. त्यामुळेच कीर्तनकारांनाही संगीताचा स्वतंत्र अभ्यास करण्याची आवश्यकता न वाटती तरच नवल. कितीतरी कीर्तनकारांनी या संगीताला वरच्या पातळीवर नेऊन ठेवलं आणि त्यामुळेच महाराष्ट्र प्रांती कानसेनांचा दर्जा अन्य कोणत्याही ठिकाणांपेक्षा वरचा असा राहिला. रामभाऊंनी ही वाट चोखाळायची ठरवली आणि त्यातून परंपरागत भक्तिसंगीताला एक नवं परिमाण मिळालं.

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा भीमसेनजींचा अभंग ‘स्वरचित्र’मध्ये पहिल्यांदा सादर झाला. त्याची स्वररचना होती रामभाऊंची. अगदी ऐनवेळी मूळ निवडलेली कविता बदलून रामभाऊंनी नामदेवांचा अभंग निवडला होता. या गीताबद्दल त्यांनी ‘स्वरयात्रा’ या त्यांच्या पुस्तकात लिहिलंय- ‘पलीकडच्या स्टुडिओत अरविंद गजेंद्रगडकर पंडितजींना चाल सांगत होते. पेटी त्यांच्यापाशी होती. मी दुसऱ्या स्टुडिओतील छोटय़ा ऑर्गनवर बोटे टाकली. मुखडय़ाला साजेसा पहिला अंतरा तयार झाला. मध्य सप्तकातील स्वरांनी दुसऱ्या अंतऱ्याला आकार आला.. पंडितजी चाल शिकण्याच्या मूडमध्ये होते. तालीम सुरू झाली. चाल सांगता सांगता चालीला आणखी डौल यायला लागला. स्वरालंकार अधिक पक्के होऊ लागले. पंडितजींच्या भरदार, घुमारेदार आणि गहिऱ्या आवाजाने तर स्वर जास्त जास्त जिवंत होऊ लागले. अभंग सांगायला फारसा वेळ लागला नाही. एकतर गाणे फार लहान होते. शास्त्रीय संगीताची बैठक आणि चौकट पक्की होती. विशेष म्हणजे पंडितजींना अभंगाची चाल भिडली असावी. रिहर्सल संपली. भीमसेन खूश दिसले. अनुभवामुळे त्यांना गाण्याच्या यशाचा अंदाज आला असावा. मला म्हणाले, ‘रामभाऊ, तुम्ही चाल फारच अप्रतिम बांधली आहे. मी त्याचं काय करतो बघा.’ पुढे काय झालं, हे मी सांगायचं कारण नाही.’ या अभंगानंतर भीमसेनजींच्या स्वरात रामभाऊंनी अनेक भजनं आणि अभंग गाऊन घेतले. त्यांची लोकप्रियताही इतकी वाढली, की रागगायनाच्या मैफलीतही पंडितजींना या अभंगांची फर्माईश हमखास व्हायची. पुढे तर त्यांनी ‘संतवाणी’ आणि ‘अभंगवाणी’ या नावाचे केवळ भक्तिसंगीताचे स्वतंत्र कार्यक्रमच केलं. त्यालाही मिळालेला भरभरून प्रतिसाद त्यांच्या जनप्रियतेचं दर्शन घडवणारा होता.

रामभाऊंना स्वरांच्या स्वभावांचा उत्तम अंदाज होता. गीतातल्या शब्दांना असलेल्या स्वरांच्या अस्तराचा त्यांचा शोध महत्त्वाचा होता. त्यामुळेच त्यांनी बांधलेल्या कोणत्याही रचनांमध्ये शब्दांचे महत्त्व कमी झाले नाही. उलट, ते स्वरांमध्ये असे काही चपखल बसले, की त्यामुळे त्यांचा अर्थ अधिक प्रवाही झाला. सुधीर मोघे यांचं ‘सखी मंद झाल्या तारका’ हे गीत रामभाऊंनी भीमसेनजींकडून गाऊन घेतलं. या गीतानं मराठी भावसंगीतात अतिशय मानाचं स्थान मिळवलं, याचं कारण शब्द, भाव आणि स्वर यांचा अनोखा मिलाफ त्यामध्ये झाला. भीमसेनजी तेव्हा अभिजात संगीताच्या मैफलीचे बादशहा होते. भारतभर भ्रमण करत आपली कला सादर करण्यात मग्न होते. अशा व्यस्ततेतूनही भावगीत गाण्याचं आव्हान त्यांनी लीलया स्वीकारलं आणि ‘स्वरचित्र’मध्ये ते सादरही झालं. या गीताची ध्वनिमुद्रिका काढायचं ठरलं तेव्हा पंडितजींना बराच काळ सवड मिळाली नाही. सुधीर फडके यांच्या आवाजात ते ध्वनिमुद्रित झालं. आकाशवाणीवर सादर झालेलं भीमसेनजींच्या आवाजातलं हे गीत काळाच्या ओघात लुप्त झालं, तरीही रसिकांच्या मनात मात्र ते रुंजी घालतच राहिलं. नव्या तंत्रांच्या आगमनानंतर ते गीत पुन्हा प्रकाशात आलं आणि आता ते सहजपणे उपलब्धही होऊ शकतं. एखाद्या गीतावर दोन मातब्बरांची मुद्रा उमटण्याची अशी ही विरळा घटना. रामभाऊंना आपण प्रकाशात येतो की नाही, याचं सोयरसुतक कधी नव्हतं. त्यांना स्वर-शब्दांच्या खेळात रममाण होणचं अधिक आवडत असे. त्यांच्या जन्मशताब्दीला प्रारंभ होत असताना त्यांच्या या कर्तृत्वाची आठवण करणं म्हणूनच अगत्याचं ठरतं.

मुकुंद संगोराम – mukund.sangoram@expressindia.com