‘लोकरंग’ (२६ नोव्हेंबर) मध्ये ‘संविधान राखण्याची जबाबदारी’ हा अरविन्द पी. दातार यांचा लेख वाचला. ‘लोकशाही प्रजासत्ताक’ असलेली राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारली. या घटनेचे ७५ वे वर्ष सुरू झाले आहे. ‘संविधान दिनी’ कोणतीही शासकीय जाहिरात दिलेली दिसत नाही. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की, ‘लोकशाही प्रजासत्ताक’ मान्य आहे की नाही? बहुतेक राजकीय पक्षांना लोकशाही प्रजासत्ताक मान्य नसावे, असे स्पष्ट दिसते. राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द समावेश करणाऱ्या राजकीय पक्षाला लोकशाही प्रजासत्ताकाबद्दल आस्था वाटत असेल असे वाटत नाही. काही राजकीय पक्षांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये मान्य नसल्याचे दिसते. त्यामुळे त्या पक्षांना राज्यघटनेबद्दल आस्था असेल, असे वाटत नाही. जे राजकीय पक्ष हुकूमशाही विचारसरणीचे आहेत. त्यांना लोकशाही प्रजासत्ताक राज्यघटनेबद्दल आदर वाटण्याचा प्रश्नच येत नाही. अनुसूचित जातींनी अनुच्छेद १७ चे समर्थन करणारा मोर्चा काढल्याचे आठवत नाही. त्यामुळे त्यांनाही राज्यघटनेबद्दल आदर आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे जवळजवळ सर्वच भारतीयांना लोकशाही प्रजासत्ताकाची राज्यघटना मान्य आहे, असे म्हणता येणार नाही. कारण बहुसंख्य लोकांना अनेक वर्षांपासून गुलामगिरीत राहण्याची सवय झालेली आहे. त्यांना लोकशाही प्रजासत्ताकात गुदमरल्यासारखे होत असेल? त्यामुळे लोकशाही प्रजासत्ताकाचे समर्थन करणारे किती भारतीय लोक आहेत? हा एक प्रश्न निर्माण होतो. बोटांवर मोजण्याइतके विचारवंत जर लोकशाही प्रजासत्ताकाचे समर्थन करत असतील तर त्यांच्या पाठीमागे लोक येतील असे वाटत नाही. कारण जनसामान्यात मिसळून त्यांना लोकशाही प्रजासत्ताकाचे महत्त्व पटवून देणे अवघड आहे. त्यामुळे लोकशाही प्रजासत्ताक असलेली राज्यघटना फार काळ टिकेल असे वाटत नाही. आजपर्यंत टिकली त्याबद्दल सर्व भारतीयांचे आभारच मानायला हवेत. लोकशाही प्रजासत्ताक नष्ट झाले तरी जगातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीबद्दल व्यक्त केलेले विचार मार्गदर्शक ठरतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘लोकशाही प्रजासत्ताक’ बळकट व्हावे म्हणून लोकशाही विचारसरणीचा बौद्ध धर्म आपल्या लाखो अनुयायांना दिला. त्यामुळे ते ‘आधुनिक बुद्ध’ म्हणून देखील ओळखले जातील आणि त्यांचा बौद्ध धर्म ‘आंबेडकर बुद्धिझम’ म्हणून जगात ओळखला जाईल.- युगानंद गुलाबराव साळवे, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा