सोलापूर बाजार समिती निवडणूक, सिद्धरामेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असणारी, शेतकऱ्यांचे शोषण करणारी औलाद म्हणून विरोधक सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपल्या विरोधात एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या या विरोधकांना ठेचून काढल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा आक्रमक निर्धार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे.

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकारमंत्री देशमुखप्रणीत सिद्धरामेश्वर बाजार समिती बचाव पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे सोमेश्वर मंदिरात झाला. त्या वेळी देशमुख यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर विखारी शब्दांत टीकास्त्र सोडले. आपल्या विरोधातील पॅनेलमध्ये आपल्याच पक्षाचे पालकमंत्री विजय देशमुख हे उभे आहेत. त्याचा अजिबात उल्लेख न करता सहकारमंत्र्यांनी मोघम भाष्य केले. राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार, महापौर शोभा बनशेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक नेते शिवानंद दरेकर, डॉ. चनगोंडा हविनाळे आदींची उपस्थिती होती. या प्रचार सभेच्या शुभारंभप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याप्रमाणेच पाशा पटेल यांनीही पालकमंत्री विजय देशमुख यांच्या विरोधात भाष्य करण्याचे कटाक्षाने टाळले. पाशा पटेल यांनी तर हे पक्षांतर्गत राजकारण असून, आपणास त्याची माहिती नसल्याचे सांगून हात वर केले. मात्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष पवार व शहराध्यक्ष प्रा. निंबर्गी या दोघांनी पालकमंत्र्यांवर घणाघाती टीका करण्याची संधी सोडली नाही.

सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांसाठी कृषिउत्पन्न बाजार समिती केंद्रबिंदू असताना गेल्या पन्नास वर्षांत बाजार समितीच्या कारभारामुळे शेतकरी सुखी झालाच नाही. म्हणूनच आपण पणन खात्याचे मंत्री झाल्यानंतर जाणीवपूर्वक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला. दलालांच्या विळख्यातून बाजार समित्या बाहेर काढल्या. आपल्याकडे जोपर्यंत अधिकार असेल तर तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार सहकारमंत्र्यांनी बोलून दाखविला. बाजार समितीची ही निवडणूक आपली स्वत:ची नाही तर सामान्य शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्यावर सुडाचे राजकारण केले जात असलेला आरोप खोडून काढताना देशमुख यांनी, आपण सुडाचे राजकारण कधीही केले नाही. उलट, विरोधकांनीच असे सुडाचे राजकारण केले आहे. कुंभारी गावात आपण उभारलेले वैद्यकीय महाविद्यालय दुसऱ्यांनी सुडापोटी पळविले, असा प्रतिहल्ला त्यांनी केला.

पाशा पटेल यांनी आपल्या घणाघाती भाषणात शेतकऱ्यांच्या उरावर येणाऱ्यांचा शेतकऱ्यांनीच बंदोबस्त करावा. मतांसाठी शेतकऱ्यांचा भाव काढण्याची ज्यांनी हिंमत केली, त्यांची या निवडणुकीत शेतकऱ्यांनीच जिरवावी, असेही आवाहन केले.

पालकमंत्र्यांवर टीका

या सभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी या दोघांनी पालकमंत्री देशमुख यांना ‘लक्ष्य’ केले. पालकमंत्री हे कर्ण म्हणून तिकडे कौरवांची बाजू घेत आहेत. ते लुटारूंच्या टोळीची सोबत करीत आहेत, असा आरोप पवार व निंबर्गी यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cooperative minister subhash deshmukh in solapur for agriculture produce market committee election
Show comments