महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून (७ डिसेंबर) सुरू झालं आहे. यानिमित्त सर्वच आमदार नागपुरात दाखल झाले आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यादेखील विधीमंडळात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी गोऱ्हे यांनी शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांना बळीचा बकरा बनवलं आहे, असं वक्तव्यही केलं. शिवसेना पक्ष फूटला त्या काळात काय-काय घडलं, याबाबत त्या बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा दोन ते तीन आठवडे आमचा त्यांच्याशी संवाद थांबला होता. आम्हा सगळ्यांचाच एकमेकांशी फार संवाद होत नव्हता. त्यामुळे पक्षात कोण काय करतंय याबाबत काहीच माहिती नव्हती. बहुसंख्य आमदार नाराज होते. कारण, त्यांना निधी दिला जात नव्हता. त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नव्हती. सर्वकाही धक्कादायक वाटत होतं. अशा काळात कोणीतरी एकत्र येण्याचा, सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंही आम्हाला वाटत होतं. याच काळात खासदार संजय राऊत तुरुंगातून सुटून बाहेर आले.

विधान परिषदेच्या उपसभापती म्हणाल्या, संजय राऊत तुरुंगाबाहेर आल्यानंतर मी स्वतः त्यांच्याशी बोलले. मी त्यांना म्हटलं, तुम्ही आत्ताच तुरुंगाबाहेर आलेले आहात. अशा काळात इतक्या टोकाची भूमिका का घेताय. कारण नसताना अतिआक्रमकपणे बोलण्यापेक्षा वेगळ्या प्रकारेही बोलता येईल. वैचारिक मतभेत वेगळ्या पद्धतीने मांडता येतील. तुम्ही यावर विचार करा. त्यावर संजय राऊत मला म्हणाले, माझं आयुष्य मी समर्पित केलंय, त्यामुळे मी असंच बोलणार.

हे ही वाचा >> “आम्ही त्यांच्याशी कुठलीही…”, नवाब मलिकांवरून महायुतीतल्या कथित मतभेदांनंतर अजित पवार गटाचं स्पष्टीकरण; म्हणाले…

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, संजय राऊत यांचं बोलणं हे पक्षश्रेंष्ठींना आवडणारं होतं, त्यांना ते पटणारं होतं. पक्षश्रेष्ठींना स्वतःला जे बोलायचं नव्हतं, बोलता येत नव्हतं ते सगळं संजय राऊतांना बोलायला लावलं जात होतं. माझं असं मत आहे की, पक्षश्रेष्ठींनी संजय राऊतांना बळीचा बकरा केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neelam gorhe says uddhav thackeray used sanjay raut for his benefit asc