धाराशिव : महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला आहे. मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवाराची निवड करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून धाराशिव लोकसभेसाठी भाजपालाच उमेदवारी द्या, अशी मागणी केली आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात आजवर कमळ या चिन्हावर भाजपाने केवळ एकवेळा निवडणूक लढवली आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ. विमल मुंदडा या भाजपाच्या कमळ चिन्हावर त्यावेळी उमेदवार होत्या. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि युतीच्या राजकारणात धाराशिव लोकसभेची जागा शिवसेना पक्षाकडे गेली. आजवर झालेल्या एकूण १७ लोकसभा निवडणुकांपैकी अकरावेळा काँग्रेसने, पाचवेळा शिवसेनेने तर एकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघात विजय हस्तगत केला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक शक्ती आता पूर्वीच्या तुलनेत खूप कमी झाली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सशक्त राष्ट्रवादी अशक्त बनली आहे. त्यात पुन्हा राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यामुळे आणखी दुरावस्था झाली आहे. भाजपाची संघटनात्मक शक्ती यापूर्वी कधीच नव्हती, अशा स्थितीत आहे. त्यामुळे कमळ चिन्हावर धाराशिव लोकसभा जिंकणे सहज शक्य होईल, असा दावाही या शिष्टमंडळाने फडणवीस यांच्याकडे केला आहे.

आणखी वाचा-अहमदनगरमधून उमदेवारी जाहीर होताच निलेश लंकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

शनिवारी मुंबई येथे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या नेतृत्वाखालील भाजप पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. धाराशिवची जागा भारतीय जनता पार्टीलाच सोडावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, अनिल काळे, सुधीर पाटील, नेताजी पाटील, विनोद गपाट, बसवराज मंगरूळे, गुलचंद व्यवहारे यांच्यासह दत्ता कुलकर्णी, दत्ता देवळकर आदी प्रमुख पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.