मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरण मोहीम राबवण्यात येणार असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तर इतरांना दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादीच्या नूतनीकरणाबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असा आदेश राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत निवडणूक आयुक्त मदान यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधला. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सल्लागार दिलीप शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावीत. आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरुस्त्याही करता येतील. या कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाबरोबरच विविध कल्पक बाबींचाही अवलंब करावा, असे मदान यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voter registration drive in maharashtra from 1st to 30th november zws
Show comments