हेमंत ढोमे व क्षिती जोग मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. अभिनयाबरोबरच दोघे दिग्दर्शन व चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘झिम्मा २’ चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. हेमंत व क्षिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. आता दोघांच्या नव्या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर साल २०१२ मध्ये हेमंत व क्षितीने लग्नगाठ बांधली. क्षितीचे आई-वडीलही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. क्षिती प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग व अभिनेत्री उज्ज्वला जोग यांची लेक आहे. दरम्यान, नुकतेच क्षितीचे आई-वडील लेकीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होते. सासू-सासरे घरी आल्याच्या आनंदात हेमंतने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

हेमंतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, यामध्ये हेमंतबरोबर क्षिती व तिचे आई-वडील दिसून येत आहेत. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, ‘सासू-सासरे येती घरा तोचि दिवाळी दसरा.’ हेमंतची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. हेमंत व त्याच्या सासू-सासऱ्यांमध्ये मैत्रिपूर्ण नाते आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्याने त्या दोघांचे कौतुकही केले आहे. दरम्यान, या नव्या फोटोमुळे त्यांच्यातील बॉंडिंग दिसून येत आहे.

हेही वाचा- आलू टिक्की, कुल्फी, पाणीपुरी अन्…! लखनऊमध्ये मुग्धा-प्रथमेशची खाद्यसफर; फोटो शेअर करीत म्हणाले…

क्षितीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नाटक, मालिका व चित्रपटांच्या माध्यमातून क्षिती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. आत्तापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीबरोबरच क्षितीने बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटात तिच्याबरोबर रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांची प्रमुख भूमिका होती; तर हेमंत अभिनेत्याबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहे. आत्तापर्यंत त्याने अनेक चित्रपटांमध्ये अभिनयाबरोबरच दिग्दर्शनही केले आहे.