रेश्मा राईकवार

स्वरगंधर्वाचा चरित्रपट उलगडायचा तर त्यातला गाण्यांचाच भाग सगळं व्यापून उरेल इतका मोठा. संगीतकार सुधीर फडके हे शब्द उच्चारल्यानंतर त्यांची गाणी एकामागोमाग एक प्रेक्षकांच्या ओठावर रुळणार हे स्वाभाविक आहे. त्यांनी संगीत दिलेली आणि गाजलेली अजरामर गाणी हे कितीतरी मोठं संचित. मात्र निव्वळ हे संचित म्हणजे बाबुजी नव्हे, याचं भान ठेवून त्यापलीकडे एक व्यक्ती म्हणून त्यांची झालेली जडणघडण, त्यांचे विचार, ऐन तारुण्यात त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि संकटांच्या या तप्त अग्नीत लखलखून निघालेलं स्वरगंधर्वांचं संगीत असे त्यांचे अपरिचित पैलू ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटातून लेखक – दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी लोकांसमोर आणले आहेत.

अलौकिक प्रतिभा असलेले संगीतकार सुधीर फडके यांनी गायलेल्या आणि संगीत दिलेल्या गाण्यांची यादीच इतकी मोठी… या प्रत्येक गाण्याची एक स्वतंत्र जन्मकथा असणारच. बाबुजींचे गदिमांशी जुळलेले सूर, आशा भोसले, लता मंगेशकर, माणिक वर्मा यांसारख्या दिग्गज गायक-गायिकांबरोबरचं त्यांचं काम हे सगळंच फार मोठं, भव्यदिव्य असं आहे. मात्र लोकांना परिचयाच्या असलेल्या या त्यांच्या चेहऱ्यामागची कथा सांगण्याची भूमिका इथे लेखक – दिग्दर्शक म्हणून योगेश देशपांडे यांनी घेतली आहे. बाबुजींचं संगीत हे रसिकांच्या मनात भिनलेलं आहे, मात्र त्या संगीतापलीकडे त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप वेगळं होतं. त्यांची जीवनातली तत्त्वं, निष्ठा, राष्ट्रवाद तितकाच प्रखर होता. किंबहुना त्यांच्या या प्रखर आणि खंबीर विचारांमुळेच प्रतिभावंतांच्या गर्दीत ते कसे उठून दिसले हे उलगडून सांगण्यावर योगेश देशपांडे यांनी अधिक भर दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा पट उलगडतानाही सुरूवात ‘वीर सावरकर’ या बाबुजींनी कठोर मेहनत घेऊन निर्मिती केलेल्या चित्रपटाच्या आठवणींपासून होते. सावरकर आणि संघविचारांचा त्यांच्यावर लहानपणापासूनच प्रभाव होता. संघाच्या तालमीत लहानाचे मोठे झालेल्या बाबुजींच्या मनाता राष्ट्रवादाचा विचार पक्का रुजलेला होता. सावरकरांशी झालेली त्यांची पहिली भेट, पहिल्याच भेटीत त्यांनी छोट्या राम फडकेचे केलेले कौतुक, त्यांनी भेट दिलेले पुस्तक ते कित्येक वर्षांनंतर तुझ्या तोंडून ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गाणं ऐकायचं आहे अशी विनंती करणारे आणि अखंड पाझरणाऱ्या अश्रूंबरोबर बाबुंजीचं गाणं मनात साठवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर पडद्यावर पाहताना त्या दोघांमधील नाते हे कुठल्याही चौकटींपलीकडचे होते हे जाणवल्याशिवाय राहात नाही.

हेही वाचा >>> Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान

बाबुजींची सगळीच गाणी वा त्यांचा इतिहास चित्रपटात घेणं शक्य नाही. ढोबळमानाने या चित्रपटाच्या पूर्वार्धात लहानपणीचा राम फडके, त्याच्या गोड गळ्याने ऐन तारुण्यात त्याला मिळालेली सुधीर ही नवी ओळख ते अगदी कमी कालावधीत चिकटलेले बाबुजी हे नाव, गायक-संगीतकार होण्याचा टिपेचा संघर्ष हा सगळा प्रवास अनुभवायला मिळतो. तर उत्तरार्धात गदिमांबरोबर केलेली गाणी, ‘गीतरामायणा’ची जन्मकथा आणि आकाशवाणीवर ते सुरू होत असताना घडलेले नाट्य, बाबुजींच्या पत्नी ललिताबाई फडके यांच्याबद्दल परिचित नसलेल्या गोष्टी, ललिताबाईंमुळे किशोर कुमार यांच्याबरोबर असलेले घरोब्याचे संबंध, हिंदी चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून केलेले काम अशा अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून खऱ्या अर्थाने संगीतकार सुधीर फडकेंची चित्रपटसृष्टीतील वाटचाल पाहायला मिळते. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात बाबुजींची गाजलेली गाणी आणि त्या गाण्यांमागची कथा असा हातात हात घालून झालेला प्रवास पडद्यावर त्या सुरांच्या संगतीने अनुभवायला मिळतो. मात्र बाबुजींची गाणी अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकाला आपल्याबरोबर घेऊन पुढे जात राहतात. स्वतंत्रपणे त्यांचं गाणं घेण्यापेक्षा त्यांचा संघर्षाचा काळ दाखवताना त्या पार्श्वभूमीवर बाबुजींची कित्येक अवीट गाणी एकामागोमाग एक प्रेक्षकांना ऐकवत त्यांच्याशी जोडून ठेवण्याचा योगेश देशपांडे यांचा प्रयोग प्रभावी ठरला आहे.

बाबुजींनी संघाच्या शिस्तीत राहून शेवटपर्यंत राष्ट्रासाठी केलेले कार्य हाही भाग इथे विस्ताराने येतो. संघाचा कार्यकर्ता असल्याने देशभरात संगीतकार म्हणून संघर्ष सुरू असताना पावलोपावली त्यांना संघसेवकांची मदत मिळाली. कुठल्याशा कारणाने कुटुंबापासून दुरावलेल्या बाबुजींनी त्या काळात संघसेवक आणि तिथेच मिळालेल्या मित्रांची आयुष्यभर साथ लाभली. संगीतकार म्हणून यश मिळाल्यानंतरही बाबुजींनी ना राष्ट्रवादाचा वसा सोडला ना मित्रांची साथ. दादरा – नगरहवेली स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचा सहभाग, संगीत करतानाही तत्वांशी तडजोड न करणारा त्यांचा करारी बाणा आणि तितकेच मृदू, संयत बोलणे-वर्तन हे त्यांच्या स्वभावातले अजब मिश्रण याचीही ओळख दिग्दर्शकाने करून दिली आहे. चित्रपटाच्या लेखन- दिग्दर्शनाबरोबरच कलाकारांची अभ्यासपूर्ण केलेली निवड यामुळे चित्रपटाची परिणामकारकता अधिक वाढली आहे.

अभिनेता सुनील बर्वे यांनी सुधीर फडकेंची भूमिका त्यांच्या देहबोलीतील सूक्ष्म बारकाव्यांसह रंगवली आहे. एकीकडे कुठेही नक्कल वाटणार नाही याचं भान ठेवत त्यांनी आपल्या सहजशैलीत ही भूमिका रंगवली आहे. ललिताबाईंच्या भूमिकेत त्यांना अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची उत्तम साथ मिळाली आहे. गदिमा साकारणारे अभिनेता सागर तळाशीकर आणि सुनील बर्वे यांचे सुधीर फडके यांच्यातील प्रसंग अनुभवणं ही अनोखी पर्वणी ठरली आहे. बाबुजींच्या तरुणपणीची भूमिका साकारणाऱ्या आदिश वैद्या यांच्यापासून ते माणिक वर्मांच्या भूमिकेतील अभिनेत्री सुखदा खांडकेकर, आशा भोसले यांच्या भूमिकेतील अपूर्वा मोडक अशा प्रत्येक कलाकाराने जीव ओतून त्या त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनय आणि बाबुजींच्या अपरिचित व्यक्तित्वाची ओळख करून देताना त्यांच्या संघविचारांवर दिलेला अधिक जोर, गाण्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यातले राजकीय विचारधारा दर्शवणारे प्रसंग यामुळे काहीसा विस्कळीतपणा जाणवतो. शिवाय, गाण्यांचं चित्रण करताना बाबुजींचा मूळ आवाज वापरला असला तरी आवाज-चित्रणात जाणवणारी विसंगती अशा काही गोष्टी खटकतात. मात्र त्यांच्या अलौकिक प्रतिभेचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतानाच त्यांची जडणघडण, वैचारिक बैठक किंवा त्यांच्या संगीत प्रतिभेमागची त्यांचा विचार अशा पद्धध्दतीच्या विश्लेषक मांडणीमुळे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा अभ्यासपूर्ण चित्रपटाचा अनुभव घेतल्याचं समाधान मिळवून देतो.

स्वरगंधर्व सुधीर फडके

दिग्दर्शक – योगेश देशपांडे

कलाकार – सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, आदिश वैद्या, सागर तळाशीकर, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, मिलिंद फाटक, शरद पोंक्षे.