रेश्मा राईकवार

रोज न चुकता भेटणाऱ्या दोन बायका, दोघींच्या कामाचं, गरजांचं स्वरूप वेगळं… तरीही आपण जे करतो आहे त्यातून अर्थार्जनाबरोबरच समाधानही मिळावं ही आस त्या दोघींच्याही मनात असते. घरातली कामं उरकून कामावर जाणारी ‘बाई’ आणि उदरनिर्वाहासाठी का होईना तिने घरात मागे ठेवलेला पसारा आवरत तिचं घर सांभाळणारी कामवाली ‘बाई’ या दोन बायकांची नाचानाच, धावपळ सारखीच असते. समाजाची रचना, आर्थिक स्तर यामुळे वरवर दिसणारं दोघींमधलं अंतर पुसून त्यांच्या अंतर्मनाची हाक ऐकवायला लावणारं ‘घुमा’ख्यान दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी मार्मिकपणे रंगवलं आहे.

कथेच्या अनुषंगाने चित्रपटाची मांडणी (ट्रीटमेंट) कशी करायची? याचा बारकाईने विचार करत त्यानुसार सतत प्रयोग करत राहणारा दिग्दर्शक ही परेश मोकाशी यांची ओळख आहे. त्यामुळे साहजिकच सध्या मराठीत स्त्रीप्रधान चित्रपटांची चलती असल्याने ‘नाच गं घुमा’ असं शीर्षक असलेला चित्रपटही त्याच प्रवाहातील पुढचं पान ठरणार नाही याची पुरेपूर काळजी लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी घेतलेली आहे. म्हणजे ते जाणीवपूर्वक केलेलं नसलं तरी घराघरात घडणारी, दिसणारी, अनुभवायला मिळणारी दोन बायकांची रोजची गोष्ट सांगताना ती कंटाळवाणी होणार नाही, फार उपदेशात्मक असणार नाही तर चार क्षण विरंगुळ्याचे देता देता मनातली गोष्ट सहज पोहोचेल अशा पद्धतीने चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे क्वचित अतिशयोक्ती वाटू शकेल अशा पद्धतीने अक्षरश: कधी नाचत, कधी गात या घुमांची मन की बात आपल्यापर्यंत पोहोचते. चित्रपटाची कथा खरोखरच साधी-सरळ आहे. त्यात अनपेक्षित धक्के, वळणं वगैरे फार नाहीत. तरीही राणी आणि आशाताई या दोघींची गोष्ट शेवटपर्यंत आपल्याला धरून ठेवते.

हेही वाचा >>> मृण्मयी देशपांडेने पहिल्या पगारातून घेतलं होतं बाबांना खास गिफ्ट, आई म्हणालेली, “मी आयुष्यात एवढी मोठी रक्कम…”

बँकेत काम करणाऱ्या राणीची (मुक्ता बर्वे) एकच तक्रार आहे. तिच्याकडे येणारी मदतनीस आशाताई (नम्रता संभेराव) वेळेवर येत नाहीत. एकतर उशिरा येतात, वर कामाच्या वेळी फोनवर बोलत राहतात. म्हणजे कामासाठी बाई असूनही राणीला रोज बँकेत पोहोचायला उशीर होतो आणि पुढे साहेबांचा ओरडा खाण्यापासून सगळी कामं रखडतात. तर आशाताईंनाही राणी विनाकारण तक्रार करत नाही आहे याची पुरेपूर जाणीव आहे. पण काही केल्या त्यांना सकाळी वेळेवर येणं शक्य होत नाही आहे. आशाताईंची अडचण आणि राणीची तक्रार या दोन्हींचा गुंता कदाचित परस्पर संवादातून सुटू शकला असता, पण तसं होत नाही. वाद वाढत जातात आणि एका क्षणी रागाच्या भरात राणी आशाताईंना कामावरून काढून टाकते. आशाताईंना कामावरून काढून टाकल्याने राणीचे प्रश्न सुटतात का? तिला नवीन मदतनीस मिळते की अजून नवा काही अनुभव वाट्याला येतो? आशाताईंचं पुढे काय होतं? त्यांच्या अडचणींवर त्यांना मार्ग मिळतो का? असा एकेक धागा जोडत लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी या दोन घुमांची आपापलं आयुष्य सावरण्यासाठी चाललेली नाचानाच, घरातल्या प्रत्येकाला सांभाळून घेताना त्यांची होणारी दमछाक, स्वत:ची स्वप्नं, इच्छा-आकांक्षा यांच्याकडे होणारं दुर्लक्ष अशा कित्येक गोष्टींची जाणीव करून दिली आहे.

अर्थात, स्त्रीचं भावविश्व उलगडणारा हा चित्रपट अति भावनिक नाट्यांत अडकत नाही. या चित्रपटात येणारी प्रत्येक व्यक्तिरेखा तिचा एक सहजस्वभाव घेऊन येते. यात कोणीही मुद्दाम वाईट वागणारं नाही, पण मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा यात सुंदर वापर करून घेतला आहे. त्यामुळे आपल्याला आशाताईंची गरज असली तरी कल्याणीच्या मदतीने तुम्हालाच कशी कामाची गरज आहे हे भासवत त्यांना पुन्हा घरी घेणारी राणी, बायकोच्या ताटाखालचं मांजर होऊ नकोस हे सुनवणारी आई आणि जरा कणा दाखवा म्हणणारी सासू या अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने गंमत आणतात. कामावरची बाई निघून गेल्यानंतर राणीची होणारी अवस्था ही गाण्याच्या माध्यमातून छान मांडली आहे. त्या तुलनेत आशाताईचं पात्र बरंचसं वास्तवाला धरून वागतं. या व्यक्तिरेखांची गंमत आणि या साध्या-सरळ कथेतली रंजकता वाढवण्यासाठी मध्येच काहीसं नाटकी ढंगातलं पात्रांचं वागणं, त्यासाठी गडबडगीतासारख्या गाण्यांची केलेली पेरणी या सगळ्याचा खुबीने परेश मोकाशी यांनी वापर करून घेतला आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना त्यातली ही अवास्तविकता नजरेआड होते, त्यातली गंमत प्रेक्षक अनुभवत राहतो.

दिग्दर्शकीय मांडणीबरोबर कलाकारांची निवड आणि त्यांचा सहज अभिनय याचाही मोलाचा वाटा आहे. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव ही या चित्रपटातली मुख्य जोडी आहे. या दोघींनीही एकमेकींच्या नात्यातले ताणेबाणे आपापल्या स्वभावासह आणि त्यातल्या विनोदाच्या जागाही अचूक पकडत रंगवले आहेत. सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे यांनी त्यात उत्तम भर घातली आहे. तर बायकांच्या या गर्दीत राणीच्या नवऱ्याच्या भूमिकेत सारंग साठ्येनेही आपले अस्तित्व प्रभावीपणे दाखवून दिले आहे. ‘नाच गं घुमा’ची गाणी पडद्यावरही सुरेख चित्रित झाली आहेत. अर्थात, सगळीकडे पाहुणे कलाकार म्हणून परिचयाचे येणारे चेहरे वा तेच तेच चेहरे नक्की टाळता आले असते. मात्र चित्रपटाची मांडणी, त्याची गाणी सगळं एका सूत्रात पण वेगळा बाज घेऊन करण्याचा प्रयत्न यामुळे या घुमांची नेहमीची परिचित गोष्टही आपल्याला थेट मुद्द्यापर्यंत पोहोचवते. हा मुद्दा काय हे समजून घेण्यासाठी ‘नाच गं घुमा’ची सुफळ संपूर्ण कहाणी पडद्यावर अनुभवायला हवी.

नाच गं घुमा

दिग्दर्शक – परेश मोकाशी कलाकार – मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुप्रिया पाठारे, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, मायरा वायकूळ, सुनील अभ्यंकर.