नेटफ्लिक्सची ‘मनी हाईस्ट’ या वेबसीरिजचं भूत अजूनही प्रेक्षकांच्या डोक्यातून निघालेलं नाही. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने आपल्या अनोख्या पटकथेच्या जोरावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता पर्यंत या सीरिजचे ५ भाग प्रदर्शित झाले आहेत. याच्या शेवटच्या भागादरम्यान या सीरिजचे चाहते चांगलेच भावूक झाले होते. स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो. या लक्षवेधी चोरीने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सीरिजमधल्या प्रत्येक पात्राला भारतीय प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. प्रत्येक शहरावरून दिलेलं प्रत्येक पात्राला नाव आणि त्याची खासियत अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. याच पात्रांपैकी एक अत्यंत लोकप्रिय असं पात्र म्हणजे ‘बर्लिन’. या पात्राची कथा खरंतर पहिल्या चोरीनंतर संपली होती. पण प्रेक्षकांनी ‘बर्लिन’ला जे प्रेम दिलं ते पाहता या सीरिजच्या मेकर्सनी पुढील भागातही बर्लिनला एका वेगळ्या पद्धतीने समोर आणलं. बर्लिनला सगळ्यांनी डोक्यावर घेतलं, त्याचं बोलणं, देहबोली, समोरच्याला संमोहित करणारं व्यक्तिमत्त्व आणि या सीरिजमधील त्याचं महत्त्व यामुळे बर्लिन लोकांच्या लक्षात आहे.

आणखी वाचा : संजय दत्तने हेअर कट बदलला अन् राजकुमार हिरानींना ‘लगे रहो मुन्नाभाई’ची स्क्रिप्ट पुन्हा लिहावी लागली

पाचवा सीझन संपल्यानंतरही ‘बर्लिन’ हा पुन्हा येणार अशी चर्चा सुरू होती. कित्येक फॅन्सना बर्लिनचा शेवटच कबूल नव्हता. आता मात्र खरंच ‘मनी हाईस्ट’ चाहत्यांसाठी नेटफ्लिक्सने खुशखबर दिली आहे. काही महिन्यांपूर्वी ‘बर्लिन’च्या स्पिनऑफ सीरिजची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती व निर्मात्यांनीही त्याची पुष्टी केली होती. आता तर चक्क नेटफ्लिक्सने या स्पिनऑफ सीरिजचं नवं पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे ‘मनी हाइस्ट’ व ‘बर्लिन’चे चाहते चांगलेच खुश झाले आहेत.

येत्या २९ डिसेंबरला ‘बर्लिन’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं नेटफ्लिक्सने जाहीर केलं आहे. इतकंच नव्हे तर या सीरिजमध्ये केवळ बर्लिनच नाही तर त्याच्या कुटुंबाचीही गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार असल्याचं या पोस्टवरुन स्पष्ट होत आहे. हे पात्र अजरामर करणारा अभिनेता पेड्रो अलोन्सो हाच बर्लिनच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्याबरोबर इतरही बरीच नवी पात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका आणखी भल्या मोठ्या चोरीला पूर्णत्वास नेण्यात बर्लिनचा हात असणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

फोटो : सोशल मीडिया

प्रेक्षक यासाठी चांगलेच उत्सुक आहेत, तर काहींनी या सीरिजमध्ये प्रोफेसरपण असावा अशी मागणी केलेली आहे. प्रोफेसरशिवाय ‘मनी हाइस्ट’चा विचारच करू शकत नाही असं काहींनी कॉमेंट करत लिहिलं आहे. आता नेमकं या सीरिजमध्ये काय काय पाहायला मिळणार ते २९ डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला समजेलच.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money heist spinoff series berlin will release in december on netflix avn