नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचे अनेक किस्से आहेत. ज्या अपेक्षेने हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले, त्याची पूर्तता करण्यात येथील धुरिणींना अपयश आले असून ‘एमबीबीएस’ परीक्षेत सुवर्णपदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांला हे विद्यापीठ पदवीप्रमाणपत्रही वेळेवर देऊ शकत नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. मुलाचे पदवीप्रमाणपत्र मिळावे यासाठी आई-वडिल विद्यापीठाचे उंबरठे झिजवत असून विद्यापीठातील अधिकारी वेगवेगळी कारणे सांगून ‘तारिख पे तारिख’ देण्याचे काम करीत आहेत. यामुळे अमेरिकेत पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळूनही पदवी प्रमाणपत्राअभावी मुलाचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी कुलगुरुंच्या दालनासमोर उपोषण करण्याचा निर्धार त्याच्या वडिलांनी केला आहे.
महाराष्ट्रातील अभिमत विद्यापीठे वगळता सर्व वैद्यकीय महाविद्यालये आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या एमबीबीएस परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना नियमानुसार एक वर्षांची ‘इंटर्नशीप’ पूर्ण करावी लागते. त्यानुसार मुंबईतील महापालिकेच्या केईएम रुग्णालय व जीएस वैद्यकीय महाविद्यालयामधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या देवेन परमार (नाव बदलले आहे) याने पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासंदर्भात विद्यापाठीकडे आवश्यक अर्जही केला. त्यानुसार १० मे २०१३ रोजी पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यास त्याला सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र देवेनचे छायाचित्र उपलब्ध नसल्यामुळे प्रमाणपत्र देता येणार नाही, असे विद्यापीठाने देवेनच्या घरी दूरध्वनी करून कळविले.  पदवीदान समारंभाला उपस्थित राहू नये, असेही त्याला सांगण्यात आले. हा धक्का पचवून त्याच्या वडिलांनी तात्काळ स्पीड पोस्टने छायाचित्र पाठवले तसेच मूळ अर्जासोबत असलेल्या छायाचित्राचे काय झाले, याची चौकशी केली असता विद्यापीठाकडूनच छायाचित्र गहाळ झाल्याचे सांगण्यात आले.

प्रमाणपत्र मिळेपर्यंत उपोषण
देवेनला अमेरिकेत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्यामुळे तो अमेरिकेला गेला. मात्र पदवी प्रमाणपत्र न दिल्यास प्रवेश रद्द केला जाईल असे त्याला सांगण्यात आले. गेला महिनाभर देवेनचे वडील सातत्याने विद्यापीठात दूरध्वनी करून पदवी प्रमाणपत्र कधी देणार, अशी विचारणा करीत आहेत. गेल्या आठवडय़ात त्यांनी पुन्हा विद्यापीठाशी संपर्क साधला असता, पदवी प्रमाणपत्राच्या छपाईचे काम महाराष्ट्राबाहेरील छापखान्यात असून त्यांचे काम समाधानकारक नसल्यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तसेच आणखी १५ दिवसांनी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. हे उत्तर ऐकून त्यांच्यावर हतबुद्ध होण्याची वेळ आली. पदवी प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यास मुलाचे वर्ष वाया जाणार हे स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांनी उद्यापासून विद्यापीठात जाऊन प्रमाणपत्र मिळेपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.