कुलदीप घायवट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोर पिसारा फुलवून थुई-थुई नाचत असल्याचे दृश्य अनेकांनी पाहिले असेल. त्यामुळे मोराचे कुतूहल खूप वाटते. मात्र असा एक आणखी पक्षी आहे, जो शेपटीचा पिसारा करून अतिशय सुंदर नृत्य करतो. त्याचबरोबर त्याचे सुरेल व गोड आवाजात गाणे सुरू असते. या पक्ष्याचे नाव आहे नाचण.

सदा आनंदी वृत्ती आणि अतिशय चपळ पक्षी अशी त्याची ओळख. तो जंगलात, दाट झाडीत, उद्यानात, परसबागेत दिसतो. झाडांच्या फांदीच्या टोकाजवळ बसणे याला विशेष आवडते. मुंबईत वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी आढळून येतात. प्रत्येकाचे आकारमान, रंग, रुप, आवाजाच्या शैलीने त्यांचे अस्तित्व वेगळे दिसून येते. त्याचप्रमाणे उद्यान, बागा, घराभोवतीच्या झाडांमध्ये गडद तपकिरी रंगाचा पक्षी नाचण पक्षी दिसून येतो. हा पक्षी चिमणीहून थोडा मोठा आणि बुलबुलपेक्षा थोडा लहान आकाराचा असतो. पण त्यांची शेपटी मात्र लांब असते. साधारण त्यांची लांबी १५ ते २१ सेंमी असते.

नाचण पक्ष्यांचा पोटाचा रंग पांढरा व छातीवर पांढरे ठिपके असतात. गळ्यावर पांढरा पट्टा आणि भुवया ठळक व पांढऱ्या रंगाच्या असतात. पाठीचा भाग काळसर, तपकिरी आणि करड्या रंगाचा असतो. याची शेपटी लांब आणि पिसारलेली असते. शेपटीच्या मधोमध असलेली दोन पिसे तपकिरी रंगाची व उर्वरित पिसांच्या टोकाचा रंग पांढरा असतो. शेपटी बहुदा उभारलेली व तिची पिसे जपानी पंख्यासारखी पसरलेली असतात. हा पक्षी एका जागेवर कधीही स्वस्थ बसत नाही. वारंवार उड्या मारून जागा बदलत असल्याने, त्याचे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर नाचणे सुरू असते. त्याच्या या सवयीमुळे त्याला नर्तक, नाचरा, नाचण अशी नावे प्रचलित झाली. या पक्ष्याचा पिसारा उभ्या पंख्यासारखा दिसतो आणि तो हवेतील कीटक खातो म्हणून त्याला इंग्रजीत ‘व्हॉइट स्पॉटेड फॅनटेल फ्लॅयकॅचर’ असे म्हणतात. तसेच फांद्यावरून शेपटी वर-खाली करत, शेपटीची उघडझाप करण्याची क्रिया सतत सुरू असताना अनेकदा मंजुळ व सुरेल आवाज काढत असतो. तर, काही वेळा चक-चक असा एक प्रकारचा कर्कश आवाजही तो काढतो.

हेही वाचा >>> गोरेगावमधील ‘त्या’ सोसायट्यांना अखेर एकत्रित पुनर्विकास करावा लागणार! व्यावसायिक सदनिकाधारकांच्या स्वतंत्र पुनर्विकासाच्या प्रयत्नांना सुरुंग

नाचण पक्षी साधारणपणे पानझडीच्या जंगलात दिसून येतो. देशात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात व दक्षिण भारतात हा पक्षी आढळतो. डोंगराळ भागात सुमारे १,८३० मीटर उंचीपर्यंत हा पक्षी दिसून येतो. तर, ऑस्ट्रेलिया, थायलंड, व्हिएतनाम, आग्नेय आशियातील काही प्रदेशातही तो आढळतो. नाचण पक्ष्याचे मुख्य खाद्या उडणारे कीटक आहे. हा उडत असलेल्या माश्या, मच्छर व इतर किडे पकडून खातो.

विणीच्या हंगामात झाडाच्या फांद्यामध्ये, जमिनीपासून सुमारे २ ते ३ मीटर उंचीवर घरटे बांधतो. घरटे बांधण्यासाठी गवत, काड्या, धागे यांचा वापर करून सुंदर वाटीसारखे घरटे तयार करतो. तर, घरट्याला बाहेरून कोळिष्टकाने मढवले जाते. मादी एका वेळी २ ते ३ अंडी घालते.

गुलाबीसर पिवळट, अंड्याच्या रुंद बाजूकडे बारीक बारीक, तपकिरी रंगाच्या ठिपक्यांची वर्तुळाकार नक्षी असते. घरटे बांधणे, अंडी उबविणे, पिल्लांना भरविणे ही सर्व कामे नर व मादी दोघेही करतात. नाचण पक्षी कीटक खात असल्याने, कीटकांच्या संख्या मर्यादित ठेवून अन्नसाखळी सुरळीत राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्यामुळे घराच्या आजूबाजूला नाचण पक्षी असल्यास माशा, मच्छर व इतर कीटकांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fantail bird existence in mumbai facts about fantail bird zws