मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू केले. त्याची दखल घेऊन, परिवहन विभागाचा कारभार सांभाळणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, तोडगा न निघाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत, सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व इतर काही मुद्दय़ांबाबत सकारात्मकता दर्शवण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> जरांगे यांची आज सहकाऱ्यांशी चर्चा; उपोषण सोडण्याबाबत दुपारपर्यंत निर्णय; सरकारकडून ठोस कृतीची अपेक्षा

मात्र, त्यावर रात्री उशिरापर्यंत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, असे संघटनेकडून सांगण्यात आले. त्यामुळे, मंगळवारीही उपोषण सुरू राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.  या उपोषणामुळे राज्यभरातील एसटी बस सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.मागण्यांकडे सरकारने डोळेझाक केल्यास १३ सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्हा पातळीवर एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी होऊन बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indefinite hunger strike of st employees continues ysh