घाटकोपरमधील दुर्घटना घडल्यानंतर याप्रकरणातील आरोपी भावेश भिंडे बेपत्ता आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातो आहे. मात्र, भावेश भिंडेच्या शेवटच्या लोकेशनबाबत आता माहिती पुढे आली आहे. त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांकडून भावेश भिंडेचा शोध घेतला जातो आहे. घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या मुलूंड येथील घरी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तो घरी आढळून आला नाही. ज्यावेळी पोलिसांनी त्याचे शेवटचे लोकेशन शोधले, त्यावेळी त्यांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक भावेश भिंडेचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले. मात्र, त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही.

हेही वाचा – घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत जबाबदार असलेले भावेश भिंडे कोण? बेकायदेशीर बोर्डची लिम्का बुकमध्ये का झाली होती नोंद?

यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले, की भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन आम्हाला लोणावळ्यात आढळून आले होते. मात्र, त्यानंतर त्याचा फोन बंद आहे. त्याला पकडण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल.

भावेश भिंडे नेमका कोण आहे?

मुंबईत १३ मे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेले होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे होर्डिंग इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लावले होते. भावेश भिंडे हा या कंपनीचा संचालक आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या ८८ झाली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एक निवेदन जारी करून हे जाहिरात फलक त्यांच्या परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. BMC ने जारी केलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, पंत नगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग हे अनधिकृत असून यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली नव्हती. हे होर्डिंग सुमारे १७,०४० स्क्वेअर फूट मोठे असून याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणूनही नोंद केली गेली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai hoarding collapse accused bhavesh bhinde last traced in lonavala near pune said mumbai police spb