नागपूर : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात जरांगे यांची भूमिका साकारणारे अभिनेते रोहन पाटील यांनी चित्रपटादरम्यान आलेले अनुभव माध्यम प्रतिनिधींना सांगितले. जरांगे पाटील यांनी २० ते २५ दिवस उपाशी राहून आंदोलन केले आहे मात्र चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या निमित्ताने दोन दिवस उपाशी राहिलो तर प्रचंड त्रास झाला. त्यामुळे जरांगे पाटील यांचा संघर्य काय आहे हे चित्रपटाच्या निमित्ताने  कळले,असे  रोहन पाटील म्हणाला.

हेही वाचा >>> अकोला : अवैध सावकारीविरोधात छापेमारी, आणखी तीन ठिकाणी…

मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न  करता ज्यांनी अनेक आंदोलन,उपोषण करून  आपले घरदार पणाला लावले, अशा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘ संघर्ष योध्दा: मनोज जरांगे पाटील ‘ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना ज्या दिवशी लाठीहल्ला झाला त्यावेळी आंदोलनात सहभागी असल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रथम भेट झाली. त्यापूर्वी त्यांना कधी भेटलो नव्हतो. मात्र त्यानंतर त्यांचा समाजासाठी संघर्ष बघितला आणि त्यांच्या संघर्षमय जीवनावर चित्रपटाची निर्मिती होत असल्याचे कळताच आणि मला विचारणा केल्यावर मी ती भूमिका आनंदाने स्वीकारली. त्यांच्यासोबत एक महिना राहून त्यांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी झालो.  भूमिकेचा अभ्यास केला आणि त्या दृष्टीने तयारी केली.

हेही वाचा >>> अरुण गवळीच्या सुटकेबाबत आता सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार…

चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. मी माझ्या भूमिकेला न्याय देऊ शकलो किंवा नाही हे प्रेक्षक ठरवतील. मात्र त्यांचा संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून घरोघरी पोहचू शकणार आहे. चित्रपटाची निर्मिती करण्याच्या आधी जरांगे पाटील यांना चित्रपटासंदर्भात विचारणा केली तर सुरुवातीला नकार दिला होता. मात्र त्यांची समजूत काढल्यानंतर आणि त्यांचा संघर्ष समाजापर्यंत पोहचविण्याचा आमचा उद्देश असल्याचे सांगितले , तेव्हा त्यांनी परवानागी दिली, असे  पाटील यांनी सांगितले. मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो की मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली. आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी  भूमिका  केल्या आहेत. पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खुप काही देऊन गेली आहे. संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहचलेले आहेत. त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केला आहे आणि त्यांची सुद्धा मला तेवढीच साथ लाभली आहे, असेही पाटील म्हणाले.