लोकसत्ता टीम

बुलढाणा : भरवेगातील वाहन अनियंत्रित होऊन उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. यातील एकाला जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी नजीक आज, बुधवारी १७ एप्रिलला सायंकाळी उशिरा ही भीषण दुर्घटना घडली. घटनेचा विस्तृत तपशील मिळाला नाही. प्राथमिक माहितीनुसार, देशमुख परिवारातील ८ सदस्य देऊळगाव राजा येथून स्कॉर्पिओ वाहनाने जात होते. दगडवाडी नजीक भरवेगातील हे वाहन अनियंत्रित झाल्याने उलटले. यामुळे वाहन रस्त्याखाली गेले. यातील तिघेजण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला जालना येथे तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.

आणखी वाचा-अमरावती : ‘रोडगा पार्टी’ जीवावर बेतली; दोन तरूण तलावात बुडाले

अपघातातील मृतांची संख्या चार

देऊळगाव राजा नजीकच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या चार झाली आहे. चौघांवर देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खैरव अंबाशी येथून आठ जण जालना येथे आयोजित लग्नासाठी स्कॉर्पिओने जात होते. दगडवाडी (ता. देऊळगाव राजा) येथे भरवेगात अनियंत्रित होऊन त्यांचे वाहन उलटले. यात वसंत देशमुख (४५), अशोक भीमराव नायक (६५), विलास जयवंत देशमुख (६३) हे जागीच ठार झाले. चालक योगेश लक्ष्मण देशमुख हा अत्यावस्थ झाल्याने त्याला जालना येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. गोपाळ आबाराव देशमुख (४३), शालिनी देशमुख (३४), मीरा संजय देशमुख (४०), अक्षरा संदीप देशमुख (१९) या जखमींवर देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.