अमरावती : महाराष्ट्रातील सत्ता हातून गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भ्रमिष्ट झाले असून वारंवार खोटे बोलण्याची त्यांना सवय लागली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दर्यापूर येथील प्रचारसभेत केली.

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करून फडणवीस स्वत: दिल्लीत जातील, असे फडणवीस यांनी सांगितले होते, पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. हा दावा खोडून काढताना फडणवीस म्हणाले, मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करेन असे कधीही म्हटले नाही. अडीच-अडीच वर्षांसाठी शिवसेना व भाजपचा मुख्यमंत्री होईल, हे अमित शहांसोबतच्या चर्चेत ठरले होते, असे उद्धव ठाकरे आधी म्हणाले होते. आता त्यांनी दुसरी कथा लोकांना सांगितली आहे. ती पूर्णपणे खोटी आहे.

हेही वाचा >>> कापूस, सोयाबीनच्या दराचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानीच पश्चिम विदर्भातील चित्र

उद्धव ठाकरे हे पुत्रप्रेमात आकंठ बुडाले आहेत. सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांची चिंता आहे, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांच्यासाठी धावपळ करायची आहे, उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांचाच विचार करतात, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वकाळ जनतेच्या हिताचा विचार करतात, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

शरद पवारांना एवढे साधे कळत नाही?

अयोध्येतील राम मंदिरात सीतेची मूर्ती नाही. त्यामुळे देशातील महिला नाराज झाल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले. पण अयोध्येतील मूर्ती ही प्रभू श्रीरामांच्या बालवयातील आहे, त्या ठिकाणी सीतामाता कशा असतील? एवढे साधे भानदेखील शरद पवार यांना नाही अशी टीका फडणवीस यांनी केली.