नागपूर: लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मैत्री राजकारणात सर्व परिचित होती. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. जोशी यांच्या निधनामुळे जोशी – गडकरी यांच्या मैत्रीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

सहा महिन्यांपूर्वी गडकरी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबल डेकर बस सेवा सुरु केली. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात मनोहर जोशी यांचा उल्लेख केला होता. शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असताना मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात वृद्धांसाठी राज्यात एका योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेचा मनोहर जोशी यांना आनंद व दु:ख दोन्ही होते.

हेही वाचा – “…तर रवी राणांची बायको त्यांना निवडणुकीपूर्वी सोडून जाणार,” ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे अजब विधान

गडकरी म्हणाले, मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांनी राज्यात वृद्धाश्रमाची योजना आणली. वृद्धाश्रमाच्या योजनेमुळे वृद्धांना आधार मिळणार असल्याने त्यांना या योजनेचा आनंद होता. परंतु आपल्या सुसंस्कृत राज्यात वृद्धांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महाराष्ट्रात वृद्धाश्रम काढण्याची सरकारवर पाळी आल्याचे जोशी यांना दु:ख होते. त्यामुळे प्रत्येकाने आपले आई-वडील आणि वृद्धांना चांगली वागणूक द्यायला हवी, असेही गडकरी म्हणाले होते.

हेही वाचा – ‘‘मोदी सरकारने स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करण्याची शिवसेनेची सूचना नाकारली होती,” उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, “आमचे सरकार आले तर…”

जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला नितीन गडकरी यांनी २५ मे रोजी सकाळी त्यांची भेट घेतली होती. जोशी यांच्या निधनाने आपण एका सुसंस्कृत नेत्याला मुकलो, अशा शब्दांत गडकरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. गडकरी यांचा अपघात झाला तेव्हा मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी त्यांना रुग्णालयात भेटायला गेले होते. या दोन नेत्यांचे अनेक किस्से आहेत.