नागपूर: उपराजधानीत गंभीर संवर्गातील गुन्हे वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता वाढली आहे. त्यातच ताजबाग परिसरातील एका ग्राहकाने झोमॅटोवर पेस्ट्रीचा ऑर्डर दिला. वितरण प्रतिनिधी पेस्ट्री देण्यासाठी ग्राहकाकडे गेला असता चक्क त्याला चाकूच्या धाकावर लुटले गेले.

कमलराव नथ्थूराम सिन्हा (२१) रा. येरखेडा, नवीन कामठी, नागपूर असे झोमॅटोच्या वितरण प्रतिनिधीचे नाव आहे. तर रिजवान उर्फ रिज्जू रहमत बेग (१९) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिजवान याने झोमॅटो ॲपवरून २ मे रोजी दुपारी पेस्ट्रीचा ऑर्डर केला. ही पेस्ट्री सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीतील यासीन प्लाॅट, फारूख पानठेल्याचे मागे, ताजबाग येथे उपलब्ध करण्यास कळवले गेले.

हेही वाचा – जहाल नक्षल समर्थकास अटक, दीड लाखांचे होते बक्षीस

दरम्यान नेहमीप्रमाने कमलराव सिन्हा हे पेस्ट्री घेऊन निश्चित पत्यावर पोहचले. परंतु आरोपीने चाकूचा धाक दाखवून झोमॅटोच्या वितरण प्रतिनिधीचा भ्रमनध्वनी, ५०० रुपये रोख, पेस्ट्री असा एकूण २४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. कमलराव यांनी लगेच पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभिर्य बघत गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरू झाला. दरम्यान आरोपी पळून अमरावतीतील गाडगे नगर हद्दीत लपल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून तेथे आरोपीला अटक केली.

पोलिसांनी आरोपीला हिसका दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे शाखेने आरोपीला पुढील तपासासाठी सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई नागपूर पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्ता (डिटेक्शन), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रमेश ताले, वैभव बारंगे, सतिश, युवानंद, पुरूषोत्तम, चेतन यांनी सायबर चमूच्या मदतीने केली.

हेही वाचा – गडचिरोली : क्रिकेटवर ‘ऑनलाईन’ जुगार; आणखी दोघांवर गुन्हा

गृहमंत्री फडणवीसांच्या शहरात चालले काय?

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात हल्ली खुनासह इतरही घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता चक्क झोमॅटोच्या वितरण प्रतिनिधीला चाकूच्या धाकावर लुटल्याने शहरातील विविध भागात घडीच्या काट्यावर विविध साहित्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी धावणाऱ्या हजारो वितरण प्रतिनिधींमध्ये भिती आहे.