नाशिक : पक्ष संघटन मजबुतीसाठी शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा दिंडोरी तालुक्यातील वणीजवळ कांदे , टॉमॅटो रस्त्यावर फेकून अडविण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून पवार यांना काळे झेंडेही दाखविण्यात आले. वणी पोलिसांनी संबंधितांना तातडीने ताब्यात घेतले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार हे पक्ष संघटनेसाठी प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले.  सकाळी त्यांचे ओझर विमानतळावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांचा ताफा दिंडोरीकडे निघाला. दिंडोरी, अवनखेड, लखमापूर फाटा, वणी येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर अजित पवार हे वणीजवळील सप्तशृंगी गडाकडे मार्गस्थ होत असताना वणी-कळवण चौफुलीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष शाम हिरे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संतोष रेहरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकत ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी शेतकऱ्यांनी कांदा निर्यात शुल्क मागे घ्यावी, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतल्यानंतर अजित पवार यांचा ताफा सप्तशृंगी गडाकडे रवाना झाला. काही दिवसांपासून टोमॅटोला भाव मिळेनासा झाला आहे  सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी सांगितले. पवार यांच्या समवेत खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार दिलीप बनकर आदी नेते उपस्थित होते.

रस्त्यावर टोमॅटो फेकल्याने भाव वाढणार नाही- अजित पवार

 कळवण तालुक्यातील शेतकरी आणि कृतज्ञता सोहळय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा आणि टोमॅटो रस्त्यावर फेकून भाव वाढणार नाहीत, असे सुनावले. एखाद्या पिकाला चांगला भाव मिळाला की सर्व शेतकरी त्याच पिकाची लागवड करतात. परिणामी पिकाचा पुरवठा वाढला की भाव घसरतात. सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Throw onions tomatoes in front of ajit pawar convoy incidents in nashik district ysh