टँकर लॉबीचे चांगभलं
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाणीकपातीला असलेला विरोध लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने सुरू केलेली अघोषित पाणीकपात नवी मुंबईकारांना आता जाणवू लागली आहे. ऐरोली सेक्टर- चार व कोपरखैरणे सेक्टर- दोन येथे ऐन डिसेंबरमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. याची तक्रार करण्यास गेलेल्या नागरिकांना टँकर मागवा, असा सल्ला दिला जात असल्याने अधिकारी व टँकर लॉबीचे काही साटेलोटे आहे का, अशी शंका रहिवासी घेत आहेत.
यंदा कमी पावसामुळे सर्वच जिल्ह्य़ांत पाणीटंचाईचे गहिरे संकट उभे राहणार आहे. त्यामुळे अनेक स्थानिक प्राधिकरणांनी आतापासूनच पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे. जलसंपन्न पालिका असे बिरुद लावणारी नवी मुंबई पालिका हीसुद्धा त्याला अपवाद नाही. पालिकेच्या मालकीचे खालापूर तालुक्यात मोरबे धरण असल्याने पालिकेवर पाणीकपातीचे संकट उभे राहिलेले नाही. नवी मुंबईत ही कपात सर्वप्रथम एमआयडीसीने केली असून त्यांच्या बारवी धरणातून येणाऱ्या पाण्याला कात्री लावली आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील झोपडपट्टी व औद्योगिक भाग आठवडय़ातून दोन दिवस पाणीटंचाई अनुभवत आहेत. या क्षेत्राला बारवी धरणाचे पाणी जवळचे असल्याने पालिकेने त्यांचे पाणी घेणे पसंत केले आहे. त्यामुळे या क्षेत्रावर पाणीकपातीचे पहिले संकट कोसळले आहे. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच पालिकेच्या नगरी वसाहतीत पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. ऐरोली सेक्टर- चार येथील साईदर्शन सोसायटीत मध्यंतरी चार दिवस पाणी गायब झाले होते. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी पाणी विभागाकडे विचारणा केल्यानंतर टँकर मागवा असा सल्ला देण्यात आला. हीच स्थिती कोपरखैरणे सेक्टर- दोनमधील रहिवाशांची असून हळूहळू सर्व शहर पाणीकपातीच्या छायेखाली येणार आहे. मोरबे धरणात केवळ मार्च महिन्यापर्यंत पुरेल इतकाच साठा असल्याने पाणीकपातीचा निर्णय प्रशासन घेणार आहे. हा निर्णय जाहीरपणे घेतला गेला नसला तरी प्रशासनाने पाणीकपातीची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे.