तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या भाष्यानंतर वाद निर्माण झाला आहे. सनातन धर्माचे उच्चाटन करायला हवे, असे ते काही दिवसांपूर्वी म्हणाले. मात्र हा मुद्दा अजूनही मागे पडलेला नाही. भाजपाचे नेते हाच मुद्दा पुन्हा-पुन्हा उपस्थित करत विरोधकांच्या इंडिया या आघाडीचादेखील हाच अजेंडा आहे का? इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत आहेत. असे असतानाच भाजपाने उदयनिधी यांनी वरील विधान केलेल्या कार्यक्रमातीलच आणखी एका नेत्याचा व्हिडीओ समोर आणला आहे. तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तमिळनाडूचे उच्चशिक्षण मंत्री के पोनमुडी सनातन धर्मावर भाष्य करताना दिसत आहेत. दरम्यान, उदयनिधी, पेनमुडी यांच्यानंतर आता सनातन धर्मावर भाष्य करताना भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीदेखील नवे वादग्रस्त विधान केले आहे. सनातनविरोधात जो बोलेन त्याची जीभ हासडू तसेच त्याचे डोळे बाहेर काढू असे शेखावत म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गजेंद्र सिंह शेखावत यांचे वादग्रस्त विधान

दरम्यान, उदयनिधी यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानानंतर केंद्रीय नेते गजेंद्र सिंह शेखावत यांनी नवे वादग्रस्त विधान केले आहे. जो सनातन धर्माच्या विरोधात बोलेन त्यांची जीभ कापली जाईल, त्या व्यक्तीचे डोळे बाहेर काढले जातील, असे शेखावत म्हणाले आहेत. राजस्थान राज्यातील बारमेर जिल्ह्यात ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते. याच भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. “त्यांनी दिलेल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला उभे राहावे लागेल. जो कोणी सनातन विरोधात बोलेन आम्ही त्यांची जीभ बाहेर काढू. सनातनविरोधात उठणारे डोळेदेखील आम्ही बाहेर काढू. जी व्यक्ती सनातनविरोधात बोलेन ती राजकीय स्थान राखू शकणार नाही. ते आपली संस्कृती आणि इतिहास यावर हल्ला करू पाहात आहेत,” असे शेखावत म्हणाले.

उदयनिधी यांच्यासह पेनमुडी यांचे सनातन धर्मावर विधान

अण्णामलाई यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ २ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या ‘सनातन धर्म नष्ट करण्यासाठीची परिषद’ या कार्यक्रमातील आहे. हा कार्यक्रम तमिळनाडूतील काही पुरोगामी लेखक आणि कलाकारांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात पोनमुडी बोलताना दिसत आहेत. “आमच्यात काही मतभेद असले तरी सनातनला विरोध करण्याच्या बाबतीत आमच्यात ऐक्य आहे. समानता, अल्पसंख्याकांचे रक्षण, लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी इंडिया आघाडीतील प्रत्येकजण सनातन धर्माच्या विरोधात आहे. आम्हा २६ पक्षांचा हा समान उद्देश आहे,” असे पोनमुडी म्हणताना दिसत आहेत.

कठोर शब्दांत टीका करा, मोदींचे निर्देश

याच कार्यक्रमात बोलताना उदयनिधी यांनी सनातन धर्मावर भाष्य केले होते. उदयनिधी यांच्या या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना तसेच मंत्र्यांना या मुद्द्यावरून विरोधकांवर कठोर शब्दांत टीका करा, असे निर्देश दिले होते. उदयनिधी यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाल्याने तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी भाजपाच्या नेत्यांकडून उदयनिधी यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, असे म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

अण्णामलाई यांनी शेअर केला व्हिडीओ

के अण्णामलाई यांनी ११ सप्टेंबर रोजी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ‘त्यांनी हिंदुत्वाचे उच्चाटन करण्याचा इंडिया या आघाडीचा मुख्य अजेंडा दिसत आहे. या व्हिडीओतून इंडिया आघाडीचा खरा हेतू स्पष्ट होतो,’ असे कॅप्शन अण्णामलाई यांनी या व्हिडीओला दिले आहे.

काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे- जेपी नड्डा

पोनमुडी यांच्या विधानावर भाजपाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधकांच्या इंडिया या आघाडीने हिंदुत्वालादेखील मतांच्या राजकारणापासून दूर ठेवलेले नाही, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसने विचारपूर्वक केलेली ही रणनीती आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले. “इंडिया आघाडी आणि काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कोणत्याही धर्मावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्याचा अधिकार संविधान देते का? विरोधकांच्या आघाडीतील पक्षांना संविधानात असलेल्या तरतुदींबद्दल माहिती नाही का?” असे सवाल नड्डा यांनी उपस्थित केले आहेत. तसेच ‘महोब्बत की दुकान’च्या नावाखाली सनातन धर्माविरोधात द्वेष का पसरवला जात आहे, याचेही गांधी परिवाराने स्पष्टीकरण द्यावे, असेही नड्डा म्हणाले.

“विकास तसेच वारसा यावर जनतेला मते मागणार”

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. देशाची संस्कृती आणि वारसा यांचा रोज अपमान केला जात आहे. असे असताना काँग्रेस पक्ष शांत आहे. राजद पक्षाचे नेते चंद्रशेखर तसेच समाजवादी पार्टीचे नेते प्रसाद मौर्य यांनीदेखील हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथांबद्दल आक्षेपार्ह भाष्य केलेले आहे, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली. आगामी निवडणुकीदरम्यान भाजपा हा मुद्दा उपस्थित करणार आहे. आम्ही या निवडणुकीत ‘विकास’ तसेच ‘वारसा’ यावर जनतेला मते मागणार आहोत, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

उदयनिधी यांच्याकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

दरम्यान, स्टॅलिन यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर उदयनिधी यांनीदेखील हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मला जे विरोध करत आहेत, त्यांच्याविरोधात कोणाही पोलिसांत तक्रार देऊ नये, असे आवाहन त्यांनी त्यांच्या समर्थकांना केले आहे. रविवारी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपा पक्ष विषारी साप आहे, असे ते म्हणाले. तर एआयएडीएमके या भाजपाच्या मित्रपक्षाची तुलना त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याशी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aafter udhayanidhi stalin dmk leader k ponmudy comment on sanatan dharma controversial comment of gajendra singh shekhawat prd