अलिबाग- आगामी निवडणुकांचे मैदान मारण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सध्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून चकाकते भव्य चषक आणि लाखो रुपयांची बक्षिसे वाटून ही नेतेमंडळी या निवडणुकांच्या तोडांवर जणू मतांची बेगमीच करत असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही यावर्षी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकेकाळी उरुस किंवा जत्रांचे निमित्त साधून ही नेतेमंडळी मतदारराजाशी सलगी करण्याचा प्रयत्न करत असत. या धार्मिक – सांस्कृतिक उपक्रमांची जागा आता क्रिकेट, कबड्डी, यासारख्या क्रीडा स्पर्धांनी घेतली आहे.

हेही वाचा – विविध समूह घटकांचा विश्वास संपादन करण्यावर अजित पवार गटाचा भर

गावागावात क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन सुरु झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हे या स्पर्धांचे वैशिष्ट्य ठरत आहे. आयपीएलच्या धर्तीवर निरनिराळ्या संघांची निवड करून भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. भले मोठे क्रिडांगण, प्रेक्षक गॅलरी, स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण, पंचांना रिव्ह्यू घेण्याची सुविधा अशा सुविधा जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथमच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रात्रदिवस चालणाऱ्या या स्पर्धांना खेळाडू आणि प्रेक्षकांचाही उंदड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अलिबागच्या क्रिडा भवन मैदानावर तीन दिवसीय क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन केले होते. यानंतर माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या कुटुंबाच्या वतीनेही क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आता शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटनेच्या पिएनपी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कुरूळ येथील आझाद मैदानावर ही स्पर्धा खेळवली जात आहे. शेकापच्या या स्पर्धेनंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनीही साई क्रिडा मंडळाच्या वतीने अलिबाग प्रिमिअर लीग स्पर्धेचे आयोजन केले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची आमदार चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या सर्व स्पर्धांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

हेही वाचा – नगरमध्ये निवडणुकीपूर्वी पाणी प्रकल्पावरून राजकीय वादाची चिन्हे

या स्पर्धांच्या आयोजनामुळे स्थानिक खेळाडूंना आपली चुणूक दाखवण्याची संधी तर मिळतेच आहे. त्याचबरोबर ज्या संघातून खेळाडू खेळत आहेत त्या संघव्यवस्थापनाकडून त्यांना चांगला मोबदलाही दिला जात आहे. त्यामुळे खेळाडूही चांगलेच खूश आहेत. एकूण आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भव्य क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा सपाटा सर्वच राजकीय पक्षांनी लावला आहे. मतांची बेगमी करण्यासाठी या स्पर्धांमधून बक्षिसांची साखर पेरणी केली जात आहेत. पण याचा मतदारांवर कितपत प्रभाव पडेल आणि निवडणुकीत काय फायदा होईल हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An attempt to garner votes by organizing a cricket tournament in raigad print politics news ssb
Show comments