गेल्या काही दिवसांपासून बहुजन समाज पार्टीचे (बसपा) खासदार दानिश अली वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होते. दरम्यान, बसपाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बसपाने सांगितले आहे. दरम्यान, दानिश अली यांनी मात्र पक्षाने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दानिश अली अनेक कारणांमुळे चर्चेत

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणातील आरोपांमुळे लोकसभेने निलंबनाची कारवाई केली आहे. दानिश अली यांनी मात्र या निर्णयाला कठोर विरोध केला. एका महिला खासदाराला अशा प्रकारे निलंबित करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले होते. या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांना उद्देशून संसदेत काही आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यानंतरही दानिश अली चर्चेत आले होते. सध्या हे प्रकरण विशेषाधिकार समितीपुढे प्रलंबित आहे.

महुआ मोईत्रा यांचे समर्थन केल्यामुळे पक्ष नाराज

मिळालेल्या माहितीनुसार दानिश अली यांनी महुआ मोईत्रा यांचे समर्थन केल्यामुळे पक्ष त्यांच्यावर नाराज होता. याच कारणामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दानिश अली यांनी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर अमरोली या मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. याआधी ते संयुक्त जनता दल (एसजेडी) पक्षात होते.

२०१९ साली बसपाकडून तिकीट

दानिश अली यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात काम केले, असा आरोप बसपाने केला आहे. निलंबनाच्या पत्रात बसपाने दानिश अली यांच्याविषयी सविस्तर लिहिले आहे. दानिश अली हे २०१८ सालापर्यंत एच. डी. देवेगौडा यांच्या पक्षात कार्यरत होते. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी देवेगौडा आणि बसपा यांच्यात युती झाली होती. त्यामुळे २०१९ साली बसपाने दानिश अली यांना तिकीट दिले होते. बसपाने दानिश अली यांना निलंबनाच्या पत्रात याचीच आठवण करून दिली आहे.

“तुम्ही पक्षविरोधी कारवायांमध्ये सामील”

“मी पक्षाच्या हिताचे काम करेन तसेच पक्षाच्या धोरणांची अंमलबजावणी करेन, अशी खात्री तुम्ही दिली होती, त्यानंतरच तुम्हाला बसपाचे सदस्यत्व देण्यात आले. त्यानंतर तुम्हाला अमरोहा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले. तुम्ही सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहात. मात्र, तुम्ही पक्षविरोधी कारवायांमध्ये सामील आहात, त्यामुळे पक्षाच्या हितासाठी तुम्हाला निलंबित करण्यात आले आहे”, असे पक्षाने म्हटले आहे.

मायावती यांचे आभार- दानिश अली

दानिश अली यांनी मात्र पक्षाने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. “मला मायावती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने तिकीट दिले होते. मी खासदार व्हावे यासाठी त्यांनी मला पाठिंबा दिला होता, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी मला संसदेत पक्षनेता म्हणून नियुक्त केले होते. मला बसपात नेहमीच प्रेम आणि पाठिंबा मिळाला. मात्र, मायावती यांनी घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे”, असे दानिश अली म्हणाले.

“भविष्यातही विरोध कायम राहणार”

“मी पक्ष बळकट व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. मी पक्षाच्या धोरणाविरोधात कधीही काम केलेले नाही. अमरोहा मतदारसंघातील लोक याचे साक्षीदार आहेत. मी भाजपाच्या लोकविरोधी धोरणाला कायम विरोध केला आहे. भविष्यातही माझा हा विरोध कायम राहील”, असेही दानिश अली यांनी सांगितले.

“…तर मी शिक्षा भोगायला तयार”

“काही निवडक भांडवलदारांकडून सार्वजनिक संपत्तीची लूट केली जात आहे, याला मी नेहमीच विरोध करत आलो आहे. हा विरोध करणे जर गुन्हा असेल, तर मी हा गुन्हा केलेला आहे. या गुन्ह्यासाठी मी शिक्षा भोगायला तयार आहे. मी सदैव अमरोहा मतदारसंघातील लोकांच्या बाजूने असेन”, असे आश्वासनही दानिश अली यांनी दिले.

महुआ मोईत्रा यांच्याबाबत दानिश अली काय म्हणाले?

दरम्यान, महुआ मोईत्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर दानिश अली यांनी प्रतिक्रिया दिली होती. “एखाद्या महिला लोकप्रतिनिधी विरोधात अशा प्रकारचा अन्यायकारक निर्णय घेतला जात असेल, तर त्या विरोधात उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे”, असे दानिश अली म्हणाले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsp suspends danish ali from party for supporting mahua moitra prd