नंदुरबार – धुळ्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातही भाजप उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाची नाराजी उफाळून आली असून पालकमंत्री अनिल पाटील यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी खासदार डाॅ. हिना गावित यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. आम्हाला विश्वासात घेऊन भाजपचा स्थानिक उमेदवार काम करेल, याची हमी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांमधील बेबनाव उघड होत आहे. उत्तर महाराष्ट्रही त्यास अपवाद नाही. धुळे मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार डाॅ. सुभाष भामरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोर नाराजीचा सूर लावल्यानंतर तोच अनुभव मंत्री पाटील यांना नंदुरबार येथील राष्ट्रवादीच्या बैठकीत आला.

हेही वाचा – शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरे विरोधाची तलवार म्यान

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात उमेदवार खासदार गावित यांच्याबरोबर शिंदे गटाचे संबंध ताणले गेले असतानाच आता महायुतीतील दुसरा मोठा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतूनही खासदार गावित यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे. नंदुरबारमध्ये पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी भाजपविरोधात आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. महायुती म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपशी जुळवून घेत असताना त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार मांडण्यात आली. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हमी घेण्यास तयार आहोत, पण स्थानिक भाजप उमेदवार त्यांचा स्वभाव बदलून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतील, याची हमी कोण घेईल, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

मंत्री पाटील यांनी, तुमचा नेता या सर्वांना पुरुन उरणारा असल्याने काळजी करण्याची गरज नाही, असे पदाधिकाऱ्यांना समजावले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अडचणींची सोडवणूक करण्याची क्षमता आमच्यात आहे. त्यामुळे स्थानिक नेत्याकडे नव्हे तर, पक्षप्रमुख अजित पवार यांच्या शब्दांचा मान राखून आपल्याला महायुतीत काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नाराजीच्या अनुषंगाने लवकरच भाजपच्या वरिष्ठांबरोबर चर्चेनंतर समन्वय समिती तयार करुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे मंत्री पाटील, भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यात बैठक झाली.

हेही वाचा – राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

उमेदवारांविषयी सर्वांचे समाधान करु न शकल्याने काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे. उमेदवार आपल्या कामात येईल अथवा कामात आलेला नसेल, या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपल्या पक्षनेतृत्वाच्या शब्दानुसार काम करावे लागणार आहे. – अनिल पाटील (मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री, नंदुरबार)