ठाणे : महाविकास आघाडीत भिवंडीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला असला तरी ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांची भूमिका काय राहील हे महत्त्वाचे असेल.

भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी महायुतीतर्फे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदारसंघांचा समावेश आहे. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. या मतदारसंघातून २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे हे निवडून आले होते. परंतु २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा पराभव होऊन भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे निवडून आले. या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस पक्षाकडून भिवंडीच्या जागेवर दावा करण्यात येत होता.

हेही वाचा – शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरे विरोधाची तलवार म्यान

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यांनी शरद पवार यांच्यामार्फत उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. याशिवाय, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गावर राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक लावून वातावरण निर्मिती केली होती. तसेच ही जागा काँग्रेसला मिळाली नाही तर राजीनामा देऊ, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला होता. यामुळे भिवंडी जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार या पक्षात गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा सुरू आहे. परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बोलणीत ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला देण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्याशी संपर्क साधला. परंतु त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

हेही वाचा – राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

तिरंगी लढत होण्याची शक्यता

भिवंडी लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी महायुतीने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरविले आहे. तर, महाविकास आघडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे हे दोघे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. तसेच काँगेसकडून उमेदवारी नाही मिळाली तरी निवडणूक लढविणार असल्याचे नीलेश सांबरे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.