Loksabha Election 2024 केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा मध्य प्रदेशमधील गुना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशातील गुना मतदारसंघ गेल्या ३७ वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाच्या तीन पिढ्यांकडे होता. ग्वाल्हेर घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वतः काँग्रेस नेते म्हणून २००२ ते २०१९ पर्यंत चार वेळा या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत मात्र शिंदे यांचा भाजपाच्या के. पी. यादव यांच्याकडून १,२५,५४९ मतांनी पराभव झाला. मार्च २०२० मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गुना येथे सुरू असलेल्या त्यांच्या प्रचार सभेदरम्यान शिंदे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला. त्यांनी परत ही जागा मिळवण्याविषयी, आव्हानांविषयी आणि मध्य प्रदेश भाजपामध्ये सुरू असलेल्या तणावाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आणि काँग्रेसवर टीकाही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीवनाचे ध्येय लोकांची सेवा करणे

तुम्ही तुमची कौटुंबिक जागा परत मिळविण्यासाठी गुना लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत आहात, पूर्वीच्या निवडणूक लढतीतून तुम्हाला काय शिकायला मिळाले? यावर शिंदे म्हणाले की, जागा पुन्हा मिळवायची आहे, म्हणून मी निवडणूक लढवत नाही आहे. मी एक लोकसेवक आहे आणि माझ्या जीवनाचे ध्येय लोकांची सेवा करणे आहे, त्यासाठी राजकारण हे केवळ एक माध्यम आहे. लोकांनी मला चार वेळा निवडून दिले आहे. गेल्या निवडणुकीत मला लोकांचे आशीर्वाद मिळाले नाहीत. कदाचित माझे काही चुकले असावे. मी त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी अधिकृतरीत्या त्यांचा प्रतिनिधी नसलो तरी पाच वर्षांत त्यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे. ग्वाल्हेर-चंबळचे लोक माझे कुटुंब आहेत.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी पत्नी सुनीता यांनी केलेला अर्ज फेटाळला? काय आहे नियम?

मध्य प्रदेश भाजपा खासदारांमध्ये तणाव

गुनाचे विद्यमान खासदार के. पी. यादव यांच्याऐवजी भाजपाने तुमची निवड केली आहे. आता यादव यांचे काय होणार? यावर ते म्हणाले, भाजपा हा एक असा पक्ष आहे, ज्यात प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रचंड आदर आहे. आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहोत. मध्य प्रदेशमधील खासदारांमध्ये सुरू असलेल्या तणावाविषयी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, “सबको अपनाओ, दिमाग से मत अपनाओ, दिल से अपनाओ. (प्रत्येकाचा मनापासून स्वीकार करा)”

प्रत्येक राजकीय प्रतिस्पर्ध्याचा आदर महत्त्वाचा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेही निवडणुकीच्या रिंगणात परतले असून ते राजगड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ग्वाल्हेर-चंबळ भागात ते तुमचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जातात. यावर शिंदे म्हणाले, मला माझ्या स्वतःच्या निवडणुकीची काळजी आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने राजकीय प्रतिस्पर्ध्याचा आदर केला पाहिजे.

हेही वाचा : भाजपा नेत्यांनाही नकोयत ३७० खासदार!

काँग्रेसकडे देशाला देण्यासारखे काहीच नाही

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेविषयी प्रश्न केला असता ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, मी इतर लोकांवर काहीही बोलू इच्छित नाही. काँग्रेसकडे विचारधारा, नेतृत्व आणि संसाधनांची कमतरता आहे. काँग्रेसकडे देशाला देण्यासारखे काहीच नाही. जात जनगणनेला काँग्रेसने फार पूर्वीपासून विरोध केला आहे. मंडल आयोगाला विरोध केला आहे. आज काँग्रेस जात जनगणनेबद्दल बोलत आहे. काँग्रेसला आता लोकांना फसवू शकणार नाही. देशातील नागरिक सुजाण आहेत, त्यांना खरे खोटे ओळखता येते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyotiraditya scindia interview congress bjp ideology rac