Premium

अजित पवार गटाचे मोहरे टिपण्यासाठी शरद पवार गटाची मोर्चेबांधणी

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर सहभागी झाले होते.

Absence Chief Minister Eknath Shinde two programs President Draupadi Murmu Nagpur
राष्ट्रपतींच्या उपराजधानीतील दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दांडी, चर्चांना उधाण… (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नाशिक: राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात सभा घेतली होती. आता त्यांच्या गटाने विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या आदिवासीबहुल दिंडोरी मतदार संघात शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर सहभागी झाले होते. खुद्द पाटील यांनी एका ट्रॅक्टरचे सारथ्य केले. नंतर शेतकऱ्यांसोबत भोजन केले. अजित पवार गटाचे एकेक मोहरे टिपण्यासाठी शरद पवार गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांच्यासह अजित पवार गटात गेलेले जिल्ह्यातील पक्षाचे सहाही आमदार ग्रामीण भागातील आहेत. तेथील मतदार प्रामुख्याने शेतकरी आहेत. दुष्काळाच्या सावटात अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले. कृषिमालाचे घसरलेले दर, जाहीर होऊनही न मिळालेले कांदा अनुदान, शेती व शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे आक्रोश मोर्चातून मांडत शरद पवार गटाने शेतकऱ्यांना साद घातली. शरद पवार यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध उभे रहा, ज्याच्यावर अन्याय झाला, त्यांच्यामागे जाण्याची शिकवण दिली. पण काहीजण सत्तेत गेले अन ते पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेत असल्याचा दाखला दिला गेला. आम्ही शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना भेटून जाणून घेत असल्याचे पाटील यांनी सांगितले. अजित पवार गटाने जुने दाखले देत शरद पवार यांना लक्ष्य करण्याचे धोरण ठेवले. शरद पवार गटाने मात्र बंडखोरी करणाऱ्यांच्या मतदारसंघात आपला पाया बळकट करण्यावर भर दिला आहे. राज्यातील वित्त व कृषी ही दोन्ही खाती अजित पवार गटाकडे आहेत. तो धागा पकडून आर्थिक तिजोरी तुमच्याकडे, कृषिमंत्रीपद तुमच्याकडे मग शेतकऱ्यांसाठी तिजोरी मोकळी का करत नाही, असे प्रश्न करत त्यांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न मोर्चातून झाले.

हेही वाचा… ठाण्यात कंटेनर शिवसेना शाखांवरून वाद

राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर गेल्या जुलैमध्ये शरद पवार यांची राज्यातील पहिली जाहीर सभा भुजबळांच्या येवला मतदारसंघात झाली होती. या गटाचा मोर्चा आता विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या आदिवासी राखीव दिंडोरीकडे वळला आहे. पाचवेळा आमदार राहिलेले झिरवाळ प्रत्यक्षात कुणालाही भेटले तरी एकदम साधे वाटतात. पांढरा कुर्ता-पायजमा, डोक्यावर गांधी टोपी. ग्रामीण बाजात ते संवाद साधतात. एखाद्या सोहळ्यात सहजपणे वाद्यावर ताल धरतात. पहाटेच्या शपथविधीवेळी राष्ट्रवादीच्या गायब झालेल्या आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. हॉटेलमधून सुटका झाल्यानंतर माझी छाती फाडली तरी पवारसाहेबच दिसतील, असे त्यांनी म्हटले होते. सलग दुसऱ्यांदा बंडखोरी करणाऱ्या झिरवाळांच्या मतदार संघात पाटील यांनी त्यांच्याबाबत कुठलेही वक्तव्य केले नाही. केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर टिकास्त्र सोडले. शरद पवार आणि अजित पवार गटातील फरक मांडला. भुजबळांनंतर अजित पवार गटाचे झिरवाळ हे स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ नेते. त्यांच्या दिंडोरी मतदार संघात शरद पवार गटाने सरकारविरोधात वातावरण तयार करण्यावर लक्ष दिले. अर्थात, त्याची धग शेवटी झिरवाळांना बसणार आहे.

आमचा पक्ष आदिवासी बांधव व शेतकऱ्यांसाठी काय करत आहे, हे त्यांना कळायला हवे म्हणून आक्रोश मोर्चासाठी दिंडोरीची निवड करण्यात आली. झिरवाळांचा मतदारसंघ असल्याने ही निवड झालेली नाही. भुजबळ, झिरवाळ आणि अन्य जे आमदार राष्ट्रवादी सोडून गेले, त्यांचा विषय आमच्यासाठी संपला आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाण्यासह आदिवासीबहुल भागातही आम्हाला पक्षाचा विस्तार करायचा आहे. – कोंडाजी आव्हाड, (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट)

शरद पवार यांची सभा झाल्यानंतर या गटाचे कुणी प्रमुख नेते नाशिकमध्ये आले नव्हते. खूप महिन्यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्यांदा दौरा केला. ज्या ठिकाणी शरद पवार गटाला आमचे आव्हान वाटते, तिथे त्यांना तयारी करावी लागते. ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यात मोर्चेबांधणी असे काही नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मागील काही महिन्यांत दोन, तीन वेळा नाशिकमध्ये येऊन गेले. कळवणसह अन्य भागात सभा झाल्या. उभयतांनी राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आमची सर्व तालुक्यांमध्ये तयारी सुरू आहे. – ॲड. रवींद्र पगार (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp sharad pawar group formation against ajit pawar group print politics news dvr

First published on: 02-12-2023 at 14:24 IST
Next Story
ठाण्यात कंटेनर शिवसेना शाखांवरून वाद