पालघर: पालघर लोकसभेची उमेदवारी भाजपाने नाकारल्यानंतर देखील विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपामध्ये आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे. राज्यपातीवर सक्रियपणे कार्यरत होण्यासाठी त्यांना राज्यात मंत्रीपद व आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येते.

पालघर मतदारसंघात आपलीच उमेदवारी निश्चित असल्याचे राजेंद्र गावित यांनी स्वत:च जाहीर केले होते. पालघरची जागा भाजपा अथवा शिवसेना यापैकी कोणत्याही पक्षाने लढवली तरीही मलाच उमेदवारी देण्यात येईल, असे गावित दावा करीत होते. पालघरची जागा शिवसेनेकडून भाजपच्या वाट्याला गेल्यानंतरही गावित यांना भाजपने उमेदवारी नाकारली. कामगिरी समाधानकारक नसल्याचे तसेच मतदारांमध्ये त्यांच्याविषयी पसंतीचे वातावरण नसल्याबाबत सर्वेक्षणाचा अहवाल आल्याचा दाखला देत गावित यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

हेही वाचा – अखिलेश यादवांच्या मुलीने प्रचारसभांमध्ये वेधले लक्ष; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अदिती?

उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी तसेच महायुती घटक पक्षाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहण्याचे टाळले होते. मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून राजेंद्र गावित यांचे राज्यात पुनर्वसन करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करण्यास तयारी दर्शवल्याचे समजते. राजेंद्र गावित यांच्या वैयक्तिक प्रभावाची मत भाजपाला या निवडणुकीत मिळावीत या दृष्टीने ही खेळी केल्याचे सांगण्यात येते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद व आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे भाजपातर्फे आश्वासन दिल्याचे गावित यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते.

राजेंद्र गावित यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांची यांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वीपर्यंत भाजपाला उमेदवारीसाठी अयोग्य वाटणाऱ्या उमेदवाराला भाजपाने लागली स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून खासदारकीच्या कार्यकाळातील अकार्यक्षम असल्याचा डाग भाजपाचे वॉशिंग मशीन धुवून टाकेल, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

खासदार गावित यांच्यामुळे भाजपाला फायदा होईल का?

गावित यांनी आपल्या वैयक्तिक संपर्क आधारे जव्हार, मोखाडा भागात जम बसविला होता. शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेल्या संस्थेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू होते. बंदरपट्टीच्या भागांमध्ये गावित यांचा वैयक्तिक संपर्क दांडगा असून सुख- दुःखात, विविध स्पर्धांच्या आयोजनादरम्यान ते आवर्जून उपस्थित राहत असत. गेल्या २० वर्षांपासून राजेंद्र गावित हा पालघर भागातील परिचित चेहरा असून त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी भाजपाने ही खेळी केल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – ‘गांधीनगर’वर भाजपाचे लक्ष; शाह आधीचा विक्रम मोडीत काढणार? काँग्रेसचे गणित काय?

राजेंद्र गावित यांनी प्रवेश करताना त्यांचे वैयक्तिक संबंध असणारे निकटवर्तीय कार्यकर्ते यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस भाजपा, शिवसेना, शिवसेना शिंदे गट व पुन्हा भाजप असा सन २०१८ पासूनचा सहा वर्षांतील राजेंद्र गावित यांचा विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवास झाला आहे. गावित यांचे निकटवर्ती मानले जाणारे शिवसेने शिंदे गटाचे प्रवक्ते केदार काळे यांनी याप्रसंगी राजेंद्र गावित यांच्या जोडीला पक्षप्रवेश करण्यास नाकार दिल्याचे समजते.

या प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यातील चुरशीच्या निवडणुकीमधे एक नवी कलाटणी मिळाली आहे. पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या पक्ष प्रवेशाने गावित यांचे समर्थक प्रचारात सक्रिय होऊन डॉ. हेमंत सवरा यांना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचे खासदार गावित यांनी आवर्जुन सांगितले.