कर्नाटकमध्ये उघडकीस आलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणामध्ये भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांचा सहभाग आढळून आल्यानंतर ते फरार झाले आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे जनता दल (सेक्युलर) पक्ष अडचणीत आला आहे. या कथित लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा हे कर्नाटकमधील हसन मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघातून ते भाजपा-जेडीएस युतीचे उमेदवारही आहेत. रेवण्णा यांच्या विरोधात पोलिसांकडून लुक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जेडीएस आणि त्यांचा सहकारी पक्ष भाजपामधील महिला नेत्या आता खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. त्यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपांसाठी कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशी इच्छा या महिला नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने या संदर्भात जेडीएस आणि भाजपामधील अनेक महिला नेत्यांशी बातचित केली आहे. या दोन्ही पक्षांमधील महिला नेत्यांनी प्रज्वल रेवण्णा यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, असे म्हणत त्यांच्या कृत्याचा निषेध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रज्वल रेवण्णा हसन मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. ते भाजपा-जेडीएस युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभा घेतली होती. या मतदारसंघातील मतदान पार पडल्याच्या दुसऱ्याच दिवशी लैंगिक शोषणाचे व्हिडीओ प्रसारित झाले. त्यानंतर प्रज्वल रेवण्णा यांनी परदेशामध्ये पोबारा केला. ते डिप्लोमॅटिक पासपोर्टवर जर्मनीला पळून गेल्याची माहिती आहे. त्यांच्याविरोधात आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडून ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ जारी केली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याविषयी खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. प्रज्वल यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असे मत जेडीएसच्या आमदार करेम्मा आणि शारदा पूर्या नाईक यांचे आहे. प्रज्वल यांच्याविरोधात विशेष तपास पथकाकडून तपास केला जातो आहे. मात्र, त्यांच्या तपासातील सत्य बाहेर यायच्या आधीच त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे या दोन्हीही महिला आमदारांनी प्रकर्षाने सांगितले.

हेही वाचा : ‘एवढ्या’ दागिन्यांची सरकारच करतंय चोरी; पंतप्रधानांचा कुणावर आरोप?

“एक महिला नेत्या म्हणून मी या प्रकरणाचा निषेध करते”, असे करेम्मा म्हणाल्या. शारदा पूर्या नाईक म्हणाल्या की, प्रज्वलने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे व्हिडीओ पहिल्यांदा समोर आले तेव्हा ते ऐकून त्यांना जबर धक्का बसला. आता या प्रकरणातील तपास कशाप्रकारे पुढे जातो, त्याकडे आमचेही लक्ष आहे, असे त्या म्हणाल्या. या सेक्स स्कँडलमधील पीडित महिलांना न्याय मिळायला हवा, असे विधान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केले आहे. “मला जेवढे समजते त्यानुसार, या प्रकरणामध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाला आहे आणि कायद्याने त्यांच्याबरोबर न्याय व्हायला हवा. या प्रकरणातील आरोपीला अत्यंत कठोर अशी शिक्षा व्हायला हवी”, असे मत भाजपाच्या आमदार शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी मांडले आहे. याबाबत विचारले असता भाजपाच्या विद्यमान खासदार आणि उमेदवार शोभा करंदलाजे म्हणाल्या की, “कायदा त्याचे काम करेल आणि आरोपीला नक्कीच शिक्षा होईल.” या प्रकरणी भाजपाच्या महिला नेत्या चढाओढीने मत व्यक्त करत असल्या तरीही जेडीएसच्या महिला आघाडीमध्ये कमालीची शांतता आहे. जेडीएस महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या प्रभावती जयराम यांना या प्रकरणाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, “मला या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही.” कर्नाटकच्या माजी मंत्री आणि जेडीएस महिला आघाडीच्या माजी प्रमुख लीलादेवी आर प्रसाद यांनी मूळ मुद्द्याला बगल देऊन पक्षाच्या प्रतिमेचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, “मला देवेगौडा यांच्याबद्दल वाईट वाटत आहे. राष्ट्रीय नेता म्हणून असलेल्या त्यांच्या प्रतिमेला या प्रकरणामुळे हादरे बसत आहेत.”

हेही वाचा : अखिलेश यादवांचा इंडिया आघाडीला प्रस्ताव; म्हणाले, “सीबीआय-ईडी सगळेच…”

दुसरीकडे, या प्रकरणाचा भाजपाबरोबरच्या युतीवर आणि निवडणुकीच्या निकालावर काहीही परिणाम होणार नाही, असे मत जेडीएस नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे. शशिकला जोल्ले म्हणाल्या की, “या प्रकरणामुळे जेडीएस-भाजपा युतीवर परिणाम होणार नाही. तसेच निवडणुकीच्या निकालावरही काहीही नकारात्मक परिणाम होणार नाही.” दोन्हीही पक्षांनी प्रज्वल रेवण्णा यांच्यापासून अंतर राखले असल्याचेही त्या म्हणाल्या. एकीकडे भाजपाने पंतप्रधान मोदींची सभा घेत प्रज्वल रेवण्णा यांचा धुमधडाक्यात प्रचार केलेला असला, तरीही काँग्रेसवर टीका करण्याची संधी दवडली नाही. मतदानाच्या आधीच लैंगिक छळाचे व्हिडीओ प्रसारित झालेले असतील तर प्रज्वल रेवण्णा यांना देशाबाहेर का पळून जाऊ दिले, असे म्हणत भाजपाने काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajwal revanna sexual assault allegations jds women wing silent bjp vsh