Boxer Vijender Singh Joins BJP आगमी लोकसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक आहेत. निवडणूक तोंडावर असतांना काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बॉक्सिंगमधील भारताचे पहिले ऑलिम्पिक मेडल विजेते विजेंदर सिंग यांनी भाजपाची वाट धरली आहे. कालच विजेंदर सिंग यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पोस्ट शेअर करत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. विजेंदर सिंग यांनी मोदी सरकारवर टीका करणारा राहुल गांधी यांनी अपलोड केलेला एक व्हिडिओ रिपोस्ट केला होता. त्याच्या दुसर्‍याच दिवशी विजेंदर सिंग भाजपात सामील झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या काही दिवस अगोदरच विजेंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विजेंदर सिंग यांचा निर्णय आश्चर्यकारक आहे, कारण ते सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आले आहेत. शेतकरी आंदोलन असो किंवा कुस्तीपटूंचे आंदोलन, या सर्व प्रकरणात त्यांची भाजपाविरोधी भूमिका राहिली आहे.

भाजपा नेते विनोद तावडे यांनी भाजपाच्या मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश केला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

२०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती निवडणूक

२०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून, दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपाच्या रमेश विधुरी यांनी त्यांचा पराभव केला. या जागेवरून आम आदमी पक्षाचे उमेदवार राघव चड्ढा हे दुसरे मोठे नाव होते. त्या निवडणुकीत विजेंदर फार वाईटरीत्या पराभूत झाले होते. इतर दोन स्पर्धकांच्या तुलनेत ते बरेच मागे राहिले. एकूण मतांपैकी त्यांना केवळ १३.५६ टक्के मते मिळाली होती. भाजपा विजेंदर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्येदेखील त्यांना मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या हेमा मालिनी यांच्या विरोधात उभे करणार असल्याची चर्चा होती.

प्रवेशामागील कारण काय?

विजेंदर सिंग हरियाणातील एक जाट चेहरा आहे. भाजपाला आशा आहे की, त्यांच्या प्रवेशाने जाट समुदायाची मते भाजपाच्या खात्यात पडतील. विजेंदर सिंग हरियाणातील भिवानी जिल्ह्याचे रहिवासी आहेत. २०२२ मध्ये त्यांनी भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अद्याप तरी भाजपा त्यांना उमेदवारी देणार की नाही, यावर कोणतीही चर्चा नाही.

विजेंदर सिंग पूर्वी राजकारणापासून लांब होते. परंतु, अनेकदा काँग्रेसशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे दिसून आले. २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्स दरम्यान, राहुल गांधी त्यांची मॅच पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर राहुल गांधीसह ते अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. याशिवाय, विजेंदर यांची पत्नी अर्चना यांचे वडील उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील काँग्रेसचे प्रभावी कार्यकर्ते होते. विजेंदर यांचे २०१९ च्या निवडणुकीतील पदार्पण आश्चर्यकारक होते. त्याच काळात विजेंदर लॉस एंजेलिसमध्ये यूएस प्रो-बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणार होते. मात्र, दुखापतीमुळे त्यांना बाहेर पडावे लागले. विजेंदर पक्षात सामील झाल्याच्या काही दिवसानंतर काँग्रेसने त्यांना दक्षिण दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली होती.

हेही वाचा: वर्षांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता; ‘या’ गावाने का टाकला निवडणुकीवर बहिष्कार?

२०१९ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही, विजेंदर काँग्रेसच्या बाजूने अनेक मुख्य मुद्द्यांवर बोलत आले आहेत. भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरुद्ध लैंगिक छळाच्या आरोपांवरून जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सामील होणारे ते पहिले खेळाडू होते. त्यावेळी विजेंदर यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींचे मौन निंदनीय असल्याचे म्हटले होते. “या प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. हरियाणातील भिवानी येथील मुलगा असल्याने मी आयपीसीच्या योग्य कलमांतर्गत कारवाईची मागणी करतो,” असे विजेंदर म्हणाले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi close one boxer vijender singh joins bjp rac
First published on: 03-04-2024 at 21:21 IST