पंतप्रधान पदाचा निर्णय लोकसभा निवडणुकीनंतर ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावर अलिकडच्या काळात पहिल्यादांच उघड भाष्य केले.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावर संदिग्धता कायम ठेवल्याने काँग्रेसकडून खरगेंऐवजी राहुल गांधींच्या नावाला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे राहुल गांधींनी जाहीरपणे सांगितलेले नाही. यापूर्वी ‘इंडिया’च्या बैठकीमध्ये खरगेंच्या नावाला पाठिंबा देण्यात आला असला तरी, आता काँग्रेसने पुन्हा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींचे नाव पुढे केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?

‘इंडिया’तील घटक पक्षांच्या नेत्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर दूरचित्रवाणी माध्यमातूनही बैठक झाली होती. या बैठकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’चा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच इतर नेत्यांनीही पाठिंबा दिला होता. दलित समाजातील खरगे हे मोदींविरोधात पंतप्रधान पदाचे तगडे उमेदवार ठरू शकतील असे मानले जात होते. मात्र, राहुल गांधींनी शुक्रवारी पक्षाच्या मुख्यालयातील कार्यक्रमामध्ये खरगेंचे नाव घेणे टाळले. ‘इंडिया’च्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान पदाचा निर्णय घेतला जाईल असे राहुल गांधींचे म्हणणे असले तरी, ‘इंडिया’च्या बैठकीमध्येच खरगेंच्या नावावर सहमती झाली होती. आता मात्र काँग्रेसच नव्हे तर, ‘इंडिया’तील एकाही नेत्याकडून खरगेंचे नाव घेतले जात नाही. भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील ‘इंडिया’चा संयुक्त उमेदवार म्हणून खरगेंचा विचार केला जात नसल्याचे दिसू लागले आहे.

हेही वाचा – घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

पंतप्रधान पदासंदर्भात खरगेंनाही विचारण्यात आले होते मात्र, त्यावर आधी लोकसभेची निवडणूक तर जिंकू द्या, त्यानंतर पंतप्रधान पदाचा निर्णय घेऊ, असे म्हणत खरगेंनी स्वतःबद्दल बोलणे टाळले होते. काँग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणुकीत तारांकित प्रचारकांच्या यादीमध्ये पक्षाध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगेंचे नाव पहिल्या क्रमांकावर असले तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख पी. चिदम्बरम यांनी जाहीरनाम्यातील मुद्द्यांवर पत्रकारांना माहिती दिली. त्यावर जाहीरनाम्यातील मुद्दे महत्त्वाचे आहेत पण, राहुल गांधींनी जाहीरनाम्याला बगल देत भाजप व मोदींना लक्ष्य केले. भाजपने राजकीय निधी पुरवठ्यावर मक्तेदारी निर्माण केली आहे. इतर पक्षांचे आर्थिक स्रोत बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसची बँक खाती गोठवली, लोकांवर दबाव टाकून, त्यांना धमकी देऊन निधी ओरबाडला जात आहे. या भाजपच्या मक्तेदारीविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.