समाजवादी पक्षाचे संभल येथील खासदार शफीकुर रहमान बुर्के यांचे मंगळवारी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. मुरादाबाद येथील सिद्ध हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शारीरिक कमजोरी आणि जुलाबाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनीच्या संसर्गाने त्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शफीकुर रहमान यांचा जन्म ११ जुलै १९३० रोजी झाला. चौधरी चरणसिंग यांच्याबरोबर त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. बाबरी मशीद कृती समितीचे ते निमंत्रकही होते. मुस्लिमांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि स्वच्छ प्रतिमेसाठी त्यांची देशभर ख्याती होती. त्यांनी समाजवादी पक्षाच्या स्थापनेदरम्यान मुलायमसिंह यादव यांच्याबरोबर काम केले होते आणि त्यांना सपाचे संस्थापक सदस्यही म्हटले जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः जातीआधारित जनगणनेच्या मागणीवर नितीश कुमार शांत का? एनडीएत जाताच बदलली भूमिका?

लोकसभा निवडणुकीत ५ वेळा विजयी

सध्या संभलचे सपा खासदार असलेले बुर्के यांनी ५ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यांनी १९९६, १९९८ आणि २००४ मध्ये तीन वेळा सपाकडून मुरादाबाद लोकसभा मतदारसंघ जिंकला. यानंतर २००९ मध्ये बसपाच्या तिकिटावर संभल लोकसभेतून विजयी झाले. तसेच २०१९ मध्ये ते पुन्हा सपाच्या तिकिटावर संभलमधून विजयी झाले. १९९९ च्या मुरादाबाद आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते संभल मतदारसंघातून केवळ ५१७४ मतांच्या फरकाने पराभूत झाले.

हेही वाचाः राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला उधाण? आता निकालाकडे सर्वांचे लक्ष!

संभल मतदारसंघातून चार वेळा आमदार निवडून आले

याशिवाय शफीकुर रहमान बुर्के हे संभल मतदारसंघातून ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते एकदा यूपी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते. १९७४ ते १९७७, १९७७ ते १९८०, १९८५ ते १९८९ आणि त्यानंतर १९९१ पर्यंत ते आमदार होते. त्यांच्या नातवाने २०२२ च्या मुरादाबाद विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. २०२२ मध्ये बुर्के यांनी त्यांचा नातू झियाउर रहमान बुर्के यांना सपाकडून तिकीट मिळवून मुरादाबादच्या कुंडरकी मतदारसंघातून आमदार केले होते. शफीकुर रहमान बुर्के यांनी कुंडरकी मतदारसंघातून आपल्या नातवाला विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती.

पीएम मोदींनीही बुर्केंचे कौतुक केले

पंतप्रधान मोदींनीही एकदा बुर्के यांचे कौतुक केले होते. २०२३ मध्ये नवीन लोकसभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुर्के यांच्या सभागृहातील निष्ठेबद्दल त्यांचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, ९३ वर्षांचे असूनही डॉ. शफीकुर रहमान बुर्के या सभागृहात बसले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhal sp mp shafiqur rahman passed away breathed his last at the age of 94 vrd
First published on: 27-02-2024 at 18:25 IST