कथित जमीन घोटाळा प्रकरणात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता असून अशा परिस्थिती कल्पना सोरेन या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाने याबाबत स्पष्टीकरण दिले असून ही एक अफवा आहे आणि यात कोणतेही तथ्य नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, कल्पना सोरेन नेमक्या आहेत कोण? आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा का सुरू आहे? याविषयी जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – इंडिया आघाडीला दुसरा धक्का, जागावाटपावर चर्चा चालू असताना समाजवादीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

कोण आहेत कल्पना सोरेन?

कल्पना सोरेन या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी आहेत. त्यांचा जन्म १९७६ साली रांची येथे झाले. पुढे त्यांचे बालपण ओडीशा येथे गेलं. कल्पना सोरेन या मध्यमवर्गीय कुटुंबातून असून त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्याचे वडील व्यावसायीक तर आई गृहीणी आहेत. कल्पना सोरेन यांनी अभियांत्रिकीमधून पदवीचे शिक्षण घेतले असून त्यांनी पुढे एमबीएसुद्धा केले. ७ फेब्रुवारी २००६ रोजी त्यांचा हेमंत सोरेन यांच्याशी विवाह झाला असून त्यांना निखील आणि अंश अशी दोन मुले आहेत.

कल्पना सोरेन या एक सामाजित कार्यकर्त्या असून त्यांनी नेहमीच राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्या एक शाळा देखील चालवतात तसेच त्यांना शेतीचीही आवड आहे. फर्स्टपोस्टने एनडीटीव्हीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या नावावर तीन व्यावसायिक इमारती असून त्यांची किंमत जवळपास ५ कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय त्या महिलांशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्येही सहभागी असतात.

कल्पना सोरेन यांच्या संपत्तीबाबत बोलायचं झाल्यास, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, कल्पना सोरेन यांच्या बॅंक खात्यात एकूण दोन लाख ५५ हजार २४० रुपये इतकी रक्कम असून त्यांच्याकडे एकूण ७० लाख किंमतीच्या विमा पॉलिसी आहेत. याशिवाय त्यांच्याकडे ३४ लाख रुपयांचे दागिणेही आहेत. कल्पना सोरेन या राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्या तरी त्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर हेमंत सोरेन यांना सल्ला देतात. एक वृत्तानुसार, मंगळावारी रांची येथे झालेल्या आमदारांच्या बैठकीतही त्या उपस्थित होत्या.

दरम्यान, कल्पना सोरेन यांच्या मुख्यमंत्री होण्यामध्ये काही कायदेशीर अडचणीही आहेत. कारण नियमानुसार, जर एखाद्या विधानसभेचा कालावधी संपायच्या एक वर्षाच्या आत जर एखादी जागा रिक्त होत असेल तर अशावेळी पोटनिडणूक घेता येत नाही. त्यानुसार झारखंड विधानसभेचा कालावधी संपायला आता केवळ एक वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. अशावेळी कल्पना यांचे आमदार होणे शक्य नाही. झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस म्हणजे नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत.

कल्पना सोरेन यांच्या मुख्यमंत्री होण्याची चर्चा का?

३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांना अटक केली जाऊ शकते, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. जर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली तर कल्पना सोरेन मुख्यमंत्रीपदी येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हेमंत सोरेन यांनी मात्र ईडीची कारवाई ही राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ईडीला लिहिलेल्या ईमेलमध्ये म्हटले की, “२ ते २९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान झारखंड विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. मी सध्या अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त आहे. याची माहिती तुम्हाला आहे. अशा परिस्थितीत मला ३१ जानेवारी रोजी चौकशीला बोलवण्याचा तुमचा निर्णय हा राजकीय दृष्ट्या प्रेरीत दिसतो. तुम्ही राज्य सरकारच्या कामात अडथळा निर्माण करत असून लोकप्रतिनिधींना त्यांचे काम करण्यापासून रोखण्याचा तुमचा प्रयत्न असल्याचे उघड झाले आहे.”

हेही वाचा – तमिळ स्टार ‘थलापथी’ विजयची राजकारणात एंट्री; विजयच्या राजकारणातील प्रवेशामागे कारण काय?

महत्त्वाचे म्हणजे, सोमवारी रात्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानावर ईडीने छापेमारी केली. त्यावेळी हेमंत सोरेन घरात नव्हते. मात्र हेमंत सोरेन यांची BMW कार आणि इतर कागदपत्रं ईडीने जप्त केली आहेत. त्यामुळे हेमंत सोरेन हे बेपत्ता असल्याची चर्चा होती. मात्र, काही तासांनंतर हेमंत सोरेन हे सरकारी वाहनातून आपल्या रांची येथील निवासस्थानी आले असल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर आपल्या गाडीतून त्यांनी माध्यमांना हात उंचावून दाखविला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is kalpana soren who name is in news for post chief minister of jharkhand spb
First published on: 31-01-2024 at 15:56 IST