दावोस दौऱ्यात ४० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप खोटा आहे. या दौऱ्यात ३२ कोटी रुपये खर्च आला आहे. ही परिषद चार दिवसांची होती. येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनला १६ कोटी खर्च आला. या दौऱ्यात एक कोटी ३७ लाख रुपयांचे सामंजस्य करार झाले. २०२२ मध्ये ८७ हजार कोटींचे, तर चालू वर्षी एक लाख ३७ हजार कोटींचे १९ सामंजस्य करार झाले. या माध्यमातून एक लाख रोजगार मिळणार आहेत. ७७ टक्के उद्योजकांना देयकरार पत्र देण्यात आले, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “अजित पवारांबरोबर गेलेले सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात”, जयंत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले, “काहीजण…”

पुणे दौऱ्यावर आल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री सामंत बोलत होते. ते म्हणाले, ‘दावोस दौऱ्यात झालेल्या खर्चाबाबतचा आरोप खोटा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा कोणाच्या ट्विटमुळे नव्हे, तर नागपुरातील प्रचंड पाऊस आणि राज्यातील आंदोलनांमुळे रद्द झाला. कोणी कुणाच्या पैशांवर दौरे केले, हे गेल्या २५ वर्षांचे काढवे लागेल.’

दरम्यान, ठाकरे सरकारच्या काळात १४ महिने मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक न झाल्याने रोजगार बुडाले. मात्र, आता महायुती सरकारच्या काळात तिमाहीत आपले राज्य गुंतवणुकीत अग्रणी राहील. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जातील. महायुतीला लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा मिळतील. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही जागावाटपाबाबत योग्य निर्णय घेतील. तिन्ही नेत्यांना राज्याची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती माहिती आहे. शिवसेनेच्या कोणत्या नेत्याला कुठे उमेदवारी द्यायची, हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री शिंदे यांनाच असेल, असेही सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे: धायरीत तीन कारखान्यांना आग

शिवसेना केवळ बाळासाहेबांची! शिवसेना ही जशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वडिलांची नाही, तशीच ती इतरही कुणाच्या वडिलांची नाही. ती केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि त्यांच्या विचाराचे खरे वारस आम्ही आहोत, असेही उद्योग मंत्री सामंत यांनी या वेळी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Davos visit cost 32 crore says industry minister uday samant pune print news psg 17 zws