दत्ता जाधव, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : सुएझ कालवा वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून द्राक्ष वाहतूक करावी लागत आहे. युरोपला निर्यातीसाठीचा काळ २५ दिवसांवरून ३५ दिवसांवर गेला आहे. रंगीत द्राक्षांची टिकवण क्षमता कमी असल्यामुळे निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली आहे. हिरव्या द्राक्षांचे दर टिकून आहेत. वाहतूक दर प्रती कंटेनर २५०० डॉलरवरून ५५०० रुपयांवर गेला आहे. डिसेंबरअखेरपासून द्राक्ष निर्यात सुरू झाली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे सुएझ कालव्यातून होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून द्राक्ष वाहतूक करावी लागत आहे.

हेही वाचा >>> विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”

सुएझ कालव्यातून युरोपात द्राक्षे पोहोचण्यासाठी २२ ते २५ दिवस लागत होते, आता ३२ ते ३५ दिवस लागला आहे. परिणामी प्रति कंटनेर वाहतूक भाडे २५०० डॉलरवरून ५५०० डॉलरवर गेले आहे. रंगीत प्लेम, जम्बो, रेड ग्लोब, रुबी सिडलेस या वाणांच्या द्राक्षांची टिकवण क्षमता ४० दिवसांपर्यंत असल्यामुळे युरोपातील ग्राहकांच्या हातात जाईपर्यंत द्राक्षे खराब होत आहेत. अन्य रंगीत द्राक्षांच्या तुलनेत क्रिमसन (लाल) आणि हिरव्या रंगाच्या थॉमसन सिडलेस जातीच्या द्राक्षांची टिकवण क्षमता ६० दिवस असल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे दर टिकून आहेत. हिरव्या रंगाच्या द्राक्षांना प्रति किलो ६५ ते ७५ रुपये दर मिळत आहे. अन्य रंगीत द्राक्षांची निर्यात अडचणीची असल्यामुळे क्रिमसन (लाल) द्राक्षांना प्रति किलो ११५ ते १४० रुपये दर मिळत आहे, अशी माहिती निफाड (नाशिक) येथील निर्यातदार अक्षय सांगळे आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संचालक चंद्रकांत लांडगे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multi color grapes export demand decline at global level pune print news dbj 20 zws