पुणे: कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्श मोटारीची तात्पुरती नोंदणी रद्द करण्याचे पाऊल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) उचलले आहे. या मोटारीची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला याबाबत नोटीस बजावली जाणार आहे. मोटारीची तात्पुरती नोंदणी रद्द झाल्यानंतर तिची पुढील १२ महिने नोंदणी करता येणार नाही.

कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने पोर्श मोटार भरधाव वेगाने चावलून अपघात केला होता. त्यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. हा अपघात घडला त्या वेळी मोटारीला नोंदणी क्रमांक नव्हता. ही मोटार बंगळुरूमधून खरेदी करण्यात आली होती. या मोटारीची किंमत पावणेदोन ते अडीच कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तेथील वितरकाने या मोटारीची तात्पुरती नोंदणी करून ती पुण्यात पाठविली. मोटारीची तात्पुरती नोंदणी १८ मार्चला झाली होती. या नोंदणीची मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वैध आहे.

Pune accident case : तांत्रिक बिघाड असतानाही अल्पवयीन मुलाच्या ताब्यात मोटार दिल्याचे उघड

पोर्श मोटार पुण्यात आल्यानंतर १८ एप्रिलला नोंदणीसाठी ती पुण्यातील आरटीओमध्ये नेण्यात आली. तिथे आरटीओतील निरीक्षकाने तिची तपासणी केली. तिच्या नोंदणीसह इतर शुल्क अशी १ हजार ७५८ रुपयांची रक्कम न भरल्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता आरटीओने या मोटारीची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला याबाबत नोटीस बजावण्याचे पाऊल उचलले आहे. या मोटारीची तात्पुरती नोंदणी रद्द केली जाणार आहे. त्यानंतर १२ महिने या मोटारीची नोंदणी करता येणार नाही, अशी माहिती आरटीओतील सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> Pune Accident : अजित पवार गटाचे आमदार आरोपीच्या अटकेनंतर मध्यरात्री पोलीस ठाण्यात का गेले? ठाकरे गटाचा सवाल

अपघातातील पोर्श मोटारीची तात्पुरती नोंदणी रद्द केली जाणार आहे. या मोटारीची मालकी असलेल्या कंपनीला नोटीस बजावण्यात जाणार आहे. याबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार आम्ही पावले उचलत आहेत. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी