आयटी हब बनलेल्या पुण्यात मोठ्या प्रमाणात पब आणि क्लब्स आहेत. हे क्लब्स, पब्स दररोज गजबजलेले असतात. मात्र कल्याणीनगर भागात पोर्श कारच्या अपघातानंतर पुण्यातील अनेक पब आणि क्लब्समधील चित्र बदललंय. एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पुण्यातील पबमध्ये मद्यप्राशन करून पोर्श कारने प्रवास केला. या प्रवासावेळी त्याच्या कारने एका दुचाकीला धडक दिली ज्यामध्ये दोन संगणक अभियंत्यांचा (एक तरुण आणि एक तरुणी) जागीच बळी गेला. या घटनेमुळे पुण्यातील पब संस्कृतीवर बोट ठेवलं जाऊ लागलं. अनेक बार आणि पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य उपलब्ध करून दिलं जात असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पुणे पोलीस आणि महापालिकेने अशा पब्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अनेक पब्स सावधगिरी बाळगू लागले आहेत. पुण्यातील नवउद्योजक चिराग बडजात्या यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि म्हटलं आहे की पोर्श अपघातानंतर पुण्यातील पब रिकामे दिसू लागले आहेत. या पब्स, क्लब्समध्ये हायस्कूलसह महाविद्यालयीन विद्यार्थांना आता प्रवेश दिला जात नाही. महाराष्ट्रात मद्यपान करण्यासाठी २५ हे कायदेशीर वय आहे. पोर्श कारच्या अपघातानंतर या नियमाचं पालन होत नसलेल्या पब्स, क्लब्स आणि बारवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे २५ पेक्षा कमी वय असलेल्या तरुणांना पुण्यातील पब, क्लब किंवा बारमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. परिणामी हे पब ओसाड पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

चिरागने म्हटलं आहे की, पुण्यातील क्लब रिकामे आहेत. खरंतर जे लोक क्लब्स आणि पब्समध्ये गर्दी करतात त्याच मुलांना (हायस्कूल आणि महाविद्यालयीन विद्यार्थी) येथे प्रवेश दिला जात नाहीये. तसेच या क्लब्सधील बार परिसर वगळता इतर ठिकाणी मद्यपानाची व्यवस्था बंद केली आहे. ४०-५० वर्षांच्या लोकांनाही येथे प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र दाखवण्यास सांगितलं जात आहे.

हे ही वाचा >> शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार? शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “तो श्लोक अतिशय चांगला…”

दरम्यान, चिरागच्या पोस्टवर कमेंट करून अनेक तरुणांनी त्याच्या दाव्यांची पुष्टी केली आहे. तर काही तरुणांनी तक्रारीचा सूर आळवला आहे. एका तरुणाने कमेंट केली आहे की, “२५ पेक्षा कमी वय असल्यामुळे माझ्या एका मैत्रिणीला एका प्रसिद्ध क्लबने प्रवेश नाकारला.” अनेकांना या निर्णयाचा आनंद झाला. तर काहींना हे पटलेलं नाही. दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे की, “काही दिवसांत ही परिस्थिती पूर्ववत होईल”. अनेकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे की, पुण्यातील क्लब्समध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. अनेक पब्समध्ये २५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुणांना प्रवेश नाकारला गेला आहे.