पुण्यात शुक्रवारचा संपूर्ण दिवस पावसाच्या नावे ठरला. पहाटेपासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली आणि रात्रीपर्यंत त्याची संततधार सुरूच होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या पावसाची नोंद ४०.१ मिलिमीटर इतकी झाली. धरणांच्या क्षेत्रातही मोठी हजेरी लावल्याने पाणीसाठय़ात वाढ होऊन पाण्याबाबत काही प्रमाणात सुरक्षितता लाभण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शहरातील जनजीवन मात्र पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पुण्यात शनिवारीसुद्धा पाऊस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यात या हंगामात पहिल्यांदाच सर्वदूर आणि इतका दमदार पाऊस पडला. पावसाचा हंगाम अधिकृतरीत्या संपायला केवळ दोन आठवडे उरलेले असताना शुक्रवारी या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुण्याच्या पावसामध्ये असलेली तूटही बऱ्याच प्रमाणात भरून निघाली. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुण्यात शुक्रवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर त्याची संततधार सुरूच होती. अधूनमधून मोठय़ा सरी बरसत होत्या. सायंकाळनंतरही पावसाचा जोर कायम होता. पुणे वेधशाळेत म्हणजे शिवाजीनगर भागात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या पावसाची नोंद ४०.१ मिलिमीटर, तर लोहगाव येथे त्याची नोंद ३१.६ मिलिमीटर इतकी झाली.
पावसामुळे शहरातील वाहतुकीचा मात्र बोजवारा उडाला. अनेक रस्त्यांवर पाणी वाहिले. ते साठून राहिल्याने वाहनांना मार्ग काढणे अवघड बनत होते. त्याचा परिणाम म्हणून वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र शहरात जागोजागी पाहायला मिळत होते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. ससून रुग्णालयाच्या आवारात वडाचे एक मोठे झाड उन्मळून पडले. त्याचबरोबर स्वारगेट, सिंहगड रस्ता, सहकारनगर भागातही झाडे पडल्याच्या घटना घडल्या. पुण्यात दीड दिवसांच्या गणपतींची संख्या मोठी असते. त्यांचे विसर्जन  करतानाही नागरिकांनी शुक्रवारी पावसांच्या सरींचा अनुभव घेतला.
पुण्यासाठी पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रातही शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. विस्तृत पाऊस पडल्याने पुण्याच्या धरणांच्या साठय़ात चांगलीच वाढ होण्याची शक्यता असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याबाबत नेमकी स्थिती शनिवारी सकाळपर्यंत स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणाच्या क्षेत्रात ४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पानशेत (६९ मिलिमीटर), वरसगाव (६८), टेमघर (६३) या धरणांच्या क्षेत्रातही पावसाने चांगली हजेरी लावली.
पिंपरी-चिंचवड परिसर आणि पुणे जिल्ह्य़ाच्या अनेक भागांमध्ये दमदार पाऊस पडला. पवना धरणाच्या क्षेत्रात ८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे नदीच्या पात्रात भरपूर पाणी आले होते. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत असलेल्या केजूदेवी बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत होते.
तूट भरून निघाली
पुणे शहरातील पावसात गेल्या आठवडय़ापर्यंत मोठी तूट होती. ती गेल्या आठवडय़ात भरून निघाली. शुक्रवारच्या पावसाने ती आणखी कमी झाली. १ जूनपासून आतापर्यंत पुण्यात ४६७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ २५ मिलिमीटरने कमी आहे. आठवडय़ापूर्वीपर्यंत ही तूट १५० मिलिमीटरपेक्षा जास्त होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain monsoon traffic jam
Show comments