डॉ. श्रीरंजन आवटे

पूर्वग्रहांचे चष्मे आपण फेकून देऊ तेव्हा धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचे खरे स्वरूप ध्यानात येईल.

धर्मनिरपेक्षतेचे भारतीय प्रारूप लक्षात आले की त्याबाबतचे गैरसमज सहज दूर होतात. एकदा मूळ संकल्पना स्फटिकस्वच्छरीत्या स्पष्ट झाली की त्याबाबतचे भ्रम गळून पडण्यास मदत होते. याबाबतचे मूलभूत गैरसमज दूर केले पाहिजेत.

१. धर्मनिरपेक्षता हे तत्त्व धर्मविरोधी आहे. धर्मनिरपेक्षता राज्यसंस्थेला आणि व्यक्तीला नास्तिक होण्यास भाग पाडते –

हा एक भ्रम आहे. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व राज्यसंस्थेला धर्मापासून अंतर राखण्याचा निर्देश करते. हे अंतर वेगवेगळ्या प्रकारे राखले जाते. पाश्चात्त्य देशांत धर्म आणि राज्यसंस्था यांच्या अधिकारक्षेत्राची काटेकोर विभागणी आहे. भारतात राज्यसंस्था धर्माच्या क्षेत्रात हस्तक्षेप करते. राज्यसंस्था सामाजिक सुधारणेसाठी आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आग्रही राहते. धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था ही नास्तिक नसते तर ती धर्म हे प्रमाण मानत नाही, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

हेही वाचा >>> संविधानभान : भारतीय धर्मनिरपेक्षतेचे प्रारूप

धर्म हा कायद्याच्या राज्याचा स्रोत असू शकत नाही. तसेच भारतातील धर्मनिरपेक्षता व्यक्तीला नास्तिक होण्यास भाग पाडत नाही. एखादी व्यक्ती हिंदू/ मुस्लीम/ ख्रिश्चन/ बौद्ध धर्माचे पालन करते आणि ती धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा स्वीकार करते, यात कोणताही अंतर्विरोध नाही. धर्माचे पालन करणे आणि धर्मनिरपेक्ष असणे यात काहीही विसंगत नाही. धर्मनिरपेक्ष असण्यासाठी धर्माला नाकारण्याची आवश्यकता नाही. धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी नास्तिक असण्याची पूर्वअटदेखील नाही. भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व संविधानाच्या अनुच्छेद २५ मध्ये स्पष्ट होते. प्रत्येकाला आपापल्या सदसद्विवेकबुद्धीने वागण्याचे स्वातंत्र्य आहे. मुख्य म्हणजे भारतीय धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व हे धर्माचे महत्त्व मान्य करत त्याबाबत नियमन करते, हे विशेष.

२. धर्मनिरपेक्षता हे पाश्चात्त्य खूळ आहे. भारतीय धर्मनिरपेक्षता हे पात् अंधानुकरण आहे –

भारतीय धर्मनिरपेक्षतेचे प्रारूप हे युरोप किंवा अमेरिकेकडून उसनवारीने घेतले आहे, हा सर्वांत मोठा गैरसमज आहे. केवळ धर्मनिरपेक्षताच नव्हे; लोकशाही, स्वातंत्र्य, समता, न्याय ही सारीच मूल्ये जणू पाश्चात्य राष्ट्रांची भारताला देणगी आहे, असेही चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रारूप हे पाश्चात्त्यांहून निराळे आहे. ते आपण घडवलेले आहे. भारतातील बहुविध धर्मांची गुंतागुंत, त्यांच्यातले ताणेबाणे लक्षात घेऊन तयार केलेली संरचना आहे. पाश्चात्त्य संरचनेला आपण टाळले नाही किंवा आहे तसे स्वीकारलेही नाही. भारताच्या वातावरणाला अनुकूल अशी धर्मनिरपेक्षतेची मांडणी भारताच्या संविधानकर्त्यांनी केली. भारताला धार्मिक विविधतेची आणि सलोख्याची मोठी परंपरा आहे. गंगा-जमनी तहजीबमुळे आणि इंद्रधनुषी रंगांमुळेच भारताच्या मातीत विविधता, सलोखा जोपासला गेला आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेसाठीच्या जमिनीची आधीच मशागत झालेली आहे. त्यामुळे हे तत्त्वच पाश्चात्त्य खूळ आहे किंवा त्यांचे अंधानुकरण आहे, हे चुकीचे ठरते.

हेही वाचा >>> संविधानभान: लोकशाहीचे व्याकरण..

३. धर्मनिरपेक्षता हे अल्पसंख्याकांना खूश करण्याचे तंत्र आहे –

धर्मनिरपेक्षतेबाबतचा हा आणखी एक गैरसमज. या तत्त्वामुळे अल्पसंख्याकांचे लाड केले जातात. त्यांचे लांगूलचालन केले जाते, असेही म्हटले जाते. अनेकदा अल्पसंख्याक समूह अधिक असुरक्षित असतात कारण बहुसंख्याकांकडून त्यांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे अल्पसंख्य समुदायांना न्याय्य वागणूक मिळण्याकरता विशेष तरतुदींची आवश्यकता असते. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांचा आपण स्वीकार करत असू तर अल्पसंख्याकांच्या आवाजाला पुरेसा न्याय दिला पाहिजे, हे मूलभूत तत्त्व आहे. किंबहुना एखाद्या देशात अल्पसंख्याकांना कशी वागणूक दिली जाते ही लोकशाहीची लिटमस टेस्ट असते. अल्पसंख्य धार्मिक समूहांना योग्य प्रकारे वागणूक दिली जाते तेव्हाच धर्मनिरपेक्ष लोकशाहीची स्थापना होऊ शकते.

आपले वेगवेगळ्या रंगांचे पूर्वग्रहाचे चष्मे आपण फेकून देऊ तेव्हा धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे खरे स्वरूप आपल्या ध्यानात येईल. संविधानकर्त्यांना हा देश धर्मनिरपेक्ष हवा होता कारण हे तत्त्वच मानवतेची हाक आहे.

poetshriranjan@gmail.com